गोडी अपूर्णतेची...

editorial dipti gangawne write article in pahatpawal
editorial dipti gangawne write article in pahatpawal

मानवी संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या वाटचालीनंतरही विश्‍वाबद्दलचे आपले कुतूहल ओसरलेले नाही. गेल्या चार-पाच शतकांमध्ये तर सृष्टीची अनेक गुपिते माणसाने आपल्या बुद्धीच्या बळावर उकलली. पण, ज्याप्रमाणे जेवढे उंच शिखर आपण गाठू तेवढे क्षितिज आणखी दूर जाते, त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रत्येक नवा टप्पा आपल्याला अज्ञाताच्या विस्ताराची अधिकाधिक प्रखर जाणीव करून देत राहतो. पुरेशा ज्ञानाअभावी आपण ज्याला ‘गूढ’ किंवा ‘चमत्कार’ मानू अशा अगणित गोष्टींनी, घटनांनी जग आजही भरलेले आहे. एका अर्थी या विश्‍वाचे अस्तित्व हाच एक मोठा चमत्कार आहे. अपरिमित वैविध्य दर्शविणारे सजीव आणि निर्जीव अस्तित्वाचे अगणित प्रकार आणि तरीही त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या आंतरक्रियांमधली सूत्रबद्धता आणि नियमबद्धता याला चमत्कार नाही तर काय म्हणायचे? पण या विश्‍वामध्ये सगळ्यात नवलपूर्ण काय असेल तर माणूस! आपल्या जाणिवेच्या आधारे या अफाट विश्‍वाला आपल्या कवेत घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा, बिनपंखांचा पण दोन पायांचा म्हटले तर एक शूद्र जीव! हा जीव आपल्या सामर्थ्याच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो आणि त्याच वेळी ज्या सृष्टीतून त्याचे सृजन झाले, त्याच सृष्टीत विनाशकारी उलथापालथही घडवून आणू शकतो. विश्‍वात ठायीठायी विलसणाऱ्या सौंदर्याचा जाणीवपूर्वक आस्वाद घेऊ  शकतो. तसेच कलात्मक संवेदनशीलतेने सौंदर्याची निर्मितीही करू शकतो. हा छोटा जीव आपण विश्‍वाचाच एक अंश आहोत, याचे भान बाळगून विश्‍वातले आपले स्थान निश्‍चित करू पाहतो. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधता शोधता त्याला एकूण अस्तित्वाबद्दलच प्रश्‍न पडतात आणि त्यांच्या उत्तरांच्या शोधात तो गर्क होतो. या शोधचक्रात कधी त्याला अर्थ गवसतात, तर कधी तोच भवतालाला अर्थ देतो. कधी निरर्थकाच्या भोवऱ्यात गरगरतो, तर कधी अर्थशून्यतेच्या प्रत्ययाने हताश होतो. कधी अर्थशून्यतेचा स्वीकार करतो, तर कधी तिच्यावर मात करण्याचा खटाटोपात अनर्थाला जन्म देतो. फार पूर्वीच्या काळापासून स्वतःच्या स्वरूपाबद्दल माणसाला पडलेले कोडे हे तत्त्वज्ञ, धर्मज्ञ, वैज्ञानिक, कलावंत सगळ्यांनाच स्वतःकडे आकर्षित करून घेते. पण सर्वांना समजेल, पटेल असे उत्तर काही हाती येत नाही आणि माणसाची जिद्द त्याला हारही मानू देत नाही. प्रयत्नांचा प्रवाह सतत वाहतच राहतो. त्यातील काही लक्षणीय प्रयत्न विचारांच्या इतिहासावर कायमचे ठसे ठेवून गेले आहेत. सुप्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ कान्ट यांचे तत्त्वज्ञान हा असाच एक अमीट ठसा आहे. आपल्या तीन प्रमुख ग्रंथांमध्ये कान्ट यांनी प्रत्येकी एक एक प्रश्‍न हाताळला. माणसाला कशाचे ज्ञान होऊ शकते? माणसाचे वर्तन कसे असायला हवे? आणि माणूस कशाची आशा करू शकतो, हे ते तीन प्रश्‍न! कान्ट यांचे असे मत होते, की या तीन प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला मिळाली तर माणूस काय आहे, या प्रश्‍नाचे उत्तर त्यातच मिळालेले असेल. माणसाची ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता ही जी तीन मूलभूत रूपे आहेत, त्यांच्याशी हे प्रश्‍न संबंधित आहेत. यातील प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न माणसाच्या क्षमता आणि मर्यादा यांच्यावर प्रकाश टाकतो. कान्ट यांनी या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे आज स्वीकारली जात नसली, तरी त्या अक्षरातून मिळणारी अंतर्दृष्टी मोलाची आहे. त्याहीपेक्षा मोलाचे आहे ते त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांतून माणूस जाणणाच्या प्रयासांना होणारे दिशादिग्दर्शन! प्रश्‍न आहेत म्हणून उत्तरे शोधण्याच्या खटाटोपाला अर्थ आहे. हा शोध आहे म्हणूनच जीवनात रस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com