भारताच्या हितरक्षणाचा वेगळा कोन

dr ashok modak
dr ashok modak

भारताने स्वतःच्या सरहद्दीभोवती चौकोनी आकृतिबंध साकारताना सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. याखेरीज वायव्येस आविष्कृत होणाऱ्या आणखी दोन चौकोनांमुळे भारताचे हितच साधले जाणार आहे.  

भा रताच्या आग्नेयेला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार देशांचा चौकोनी आकृतीबंध उदय पावला आहे व जगात या चौकोनामुळे खळबळ माजली आहे. भारताच्या दृष्टीने चीनच्या आक्रमक व्यूहरचनेला समर्पक उत्तर देण्यासाठी हा चौकोनी आकृतिबंध नक्कीच हितकारक आहे. पण गेल्या महिन्यात आपल्या देशाच्या वायव्य कोपऱ्यातही आणखी दोन चौकोनी आकृतीबंध प्रकटले आहेत.

Financial action task force म्हणजे FATF  नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून पाकिस्तानवर काही आर्थिक निर्बंध लादले जातील व दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला वठणीवर आणले जाईल अशी आशा यामुळे पल्लवीत झाली आहे. विस्मय या गोष्टीचा की चीनने FATF या संस्थेच्या पाकिस्तानबाबतच्या या धोरणाचे समर्थन केले आहे. तसेच या संस्थेच्या उपाध्यक्षपदी विराजमान होण्यास संमती दिली आहे. ही संस्था ज्या देशाच्या पुढाकाराने जन्मास आली, तो देश म्हणजे अमेरिका, संस्थेचा उपाध्यक्ष म्हणजे चीन आणि ज्या दोन देशांना पाकिस्तानवर निर्बंध लादले गेले तर खरा दिलासा मिळेल ते दोन देश म्हणजे अफगाणिस्तान आणि भारत अशा चार देशांच्या सहकार्यातून साकार होत असलेला चौकोन आपल्या दृष्टिकोनातून कळीची भूमिका बजावणार आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान, तसेच तुर्कमेनिस्तान या देशांचे अध्यक्ष व पाकिस्तानचे पंतप्रधान या तिघांबरोबर भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांची बैठक झाली. म्हणजे तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत या चार देशांचा चौकोनही भारताच्या वायव्येस आविष्कृत झाला आहे. या चार देशांच्या आद्याक्षरांना एकत्र करून जो ‘तापी’ प्रकल्प कार्यरत होणार आहे, त्यातून मध्य आशियातील प्रवाही खनिजसंपदा भारताला उपलब्ध होणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान सरकारने व तिथे धुडगूस घालणाऱ्या ‘तालिबानी’ दहशतवाद्यांनीही ‘तापी’ पाइपलाइनला शुभेच्छा दिल्या आहेत. चीन सरकारनेही ‘तापी’ प्रकल्प आणि स्वतःचा ‘वन बेल्ट वन रोड’ यांच्यात सामंजस्य असावे अशी भूमिका घेतली आहे. ‘तापी’ पाइपलाइन काही पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात नाही व म्हणून या वाहिनीला चीनकडून पाठिंबा मिळाला. मदतीचा हात लाभला तर भारताकडूनही चीनचे स्वागतच होणार यात शंका नाही. मुळात Financial action task force या संस्थेच्या उपाध्यक्षपदी स्थानापन्न होण्यास चीनने संमती दिली असून भारताने चीनला शुभेच्छा दिल्या आहेतच. सारांश, भारताच्या वायव्येस आविष्कृत होत असलेले दोन्ही चौकोन भारताच्या भल्याचेच आहेत. एका चौकोनामुळे पाकिस्तानातील ‘अल कायदा’, ‘लष्करे तैयबा’, ‘तालिबान’ या दहशतवादी संघटनांना पाकिस्तान सरकार कडेखांदी घेणार नाही. भारत व अफगाणिस्तान या दोन्ही देशांकडे रक्तपिपासू दहशतवादाची ‘निर्यात’ करणार नाही, तर दुसऱ्या चौकोनामुळे मध्य आशियातील मौलिक खनिज संपत्तीची मात्र भारतात आयात होऊ शकेल. वायव्य दिशेचे हे दोन चौकोन भारताच्या ईशान्येला उभ्या राहिलेल्या उपरोल्लेखित चौकोनाला पूरक ठरणार आहेत.

चीनने आखलेल्या व्यापक व्यूहरचनेतल्या एका मार्गामुळे प्रशांत महासागर व बाल्टिक सागर जोडले जाणार आहेत. दुसऱ्या एका मार्गाद्वारे चीनचे आरमार पाकिस्तानच्या ग्वादार बंदरातून पर्शियन आखातात व दक्षिणेस खाली उतरून हिंदी महासागरात प्रवेश करू शकेल, तर तिसरा महान रेशीम मार्ग पीत समुद्रातून तैवानच्या सामुद्रधुनीतून दक्षिण चीन सागरात, तर पुढे मलाक्काच्या सामुद्रधुनीतून हिंदी महासागरात ईशान्य आफ्रिकेच्या जिबुती बंदरापर्यंत धडक मारू शकेल. चीनच्या या महत्त्वाकांक्षी विळख्यामुळे सारे जग कासावीस झाले आहे. या जगाला धीर देण्यासाठीच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान व भारत या चार देशांचा चौकोन अवतीर्ण झाला आहे. म्हणजे ट्रान्स पॅसिफिक व्यूहरचनेतून ज्या अमेरिकेने काढता पाय घेतला, तीच अमेरिका या चौकोनात सहभागी झाली आहे. अशा चौकोनामुळे फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया या देशांना अभय मिळाले आहे. जगातले सारे जलाशय आपल्याच स्वामित्वाचे या भूमिकेतून चीनचे नौदल उच्छाद मांडत आहे. या उच्छादांना काटशह देण्यासाठी भारताच्या आग्नेय दिशेस एक समर्थ चौकोन रचण्यात आला आहे. यातून प्रशांत महासागर व हिंदी महासागर एकमेकांशी गुंफले जातील. हिंदी महासागरात मॉरिशसच्या अलीकडे दिएगो गार्सिया बेटावरच्या अमेरिकी युद्धतळाला पूरक भूमिका पार पाडली जाईल. तीही या चौकोनी आकृतिबंधाकडूनच.
भारताने स्वतःच्या सरहद्दीभोवती असे चौकोनी आकृतिबंध उभे करतानाच स्वतःच्या पारंपरिक मित्राशी म्हणजे रशियाशी व खुद्द चीनशीही दोस्तीचे पाश विणले जावेत व सलोख्याचे संबंध कायम राहावेत ही दक्षता घेतली आहे. RIC म्हणजे रशिया, इंडिया व चीन या तीन देशांचा त्रिकोण व ब्राझील तसेच दक्षिण आफ्रिका याही देशांना सामावून घेणारा BRICS नामक पंचकोन विसविशीत होणार नाहीत, अशी सावधगिरीही भारताने दर्शविली आहे.

आर्य चाणक्‍याने आपल्या कौटिल्य नीतीच्या माध्यमातून भारतवर्षाने स्वतःच्या आजूबाजूस मंडलाकार रचना उभ्या केल्या पाहिजेत, हे मार्गदर्शन कित्येक शतकापूर्वीच करून ठेवले आहे. या मार्गदर्शनाची वर्तमानकाळातली प्रासंगिकताच चौकोनी आकृतिबंधातून प्रकटली आहे. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात आपले परराष्ट्र धोरण पूर्वाभिमुख झाले, ते वर्तमानात अधिक सक्रिय तर झालेच, पण act east policy आता प्रभावी कृतीत रूपांतरीत झाली आहे. इंदिरा गांधींच्या व्यवहार्य, तसेच चैतन्यशील परराष्ट्र धोरणाचा नवा कालोचित आविष्कार सद्यःस्थितीत अनुभवास येत आहे. भारताच्या अवतीभवती चौकोनी आकृतिबंध उभे करून विद्यमान पंतप्रधानांनी इंदिराजींच्या उपक्रमशीलतेत मौलिक भर घातली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र जागतिक स्तरावर प्रकटावा हाच आपला मनोदय आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘पाकिस्तानला अर्थसाह्य नाकारणार, पाकिस्तानला धडा शिकवणार’ अशी घोषणा केली, तेव्हा भारताने शंका व्यक्त केली. खुद्द अमेरिकी नागरिकांनीही अविश्‍वास प्रकट केला, तर पाकिस्तानात अंगार उसळला. आपण अर्थातच केवळ शंका न वर्तविता चौकोनी, त्रिकोणी व पंचकोनी आकृतिबंध विणले जावेत, म्हणून पावले उचलली. या व्यूहरचनेतून भारताच्या सरहद्दी सुरक्षित व्हाव्यात हीच आपली इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com