‘फेसबुक’च्या माहिती गळतीचा धडा

editorial dr keshav sathye write facebook article
editorial dr keshav sathye write facebook article

‘फेसबुक’वरील माहितीला वाटा फुटल्याच्या प्रकारामुळे अनेक गुंतागुंतीचे मुद्दे समोर आले आहेत. याचे संभाव्य दुष्परिणाम ओळखले नाहीत, तर यातून आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होण्याचा धोका आहे.

ज गभरात दोनशे कोटींहून अधिक माणसांना बांधून ठेवणाऱ्या ‘फेसबुक’ या समाजमाध्यमाच्या कार्यपद्धतीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर ताशेरे ओढले गेले आणि सगळीकडे खळबळ उडाली. ‘फेसबुक’वरील कोट्यवधी व्यक्तींची माहिती विकली गेल्याचा आरोप होत आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ‘केम्ब्रिज ॲनालिटिका’ ही राजकीय पक्षांना सल्ला आणि माहिती पुरवणारी ब्रिटिश संस्था. २०१६च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत काम केलेल्या या कंपनीनं ‘फेसबुक’वरील पाच कोटी नागरिकांची माहिती बेकायदारीत्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला उपलब्ध करून दिली, असा त्यांच्यावर ठपका असून, नुकतीच त्यांच्या कार्यालयाची झडतीही तपास यंत्रणेनं घेतल्याचं वृत्त आहे.

‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, असं आश्वासन दिलं आहे. जगभरातल्या महत्त्वाच्या नऊ वृत्तपत्रांतून पानभर जाहिराती देऊन ‘फेसबुक’ने जाहीर माफीही मागितली आहे. पण एवढ्यावर हे प्रकरण थांबण्याचं चिन्ह दिसत नाही. ‘फेसबुक’चा शेअर बाजारातील समभाग लक्षणीयरीत्या ढासळला आहे. ‘डिलिट फेसबुक’ ही मोहीम आता जगभर जोर धरू लागली आहे. अमेरिकेतील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपले ‘फेसबुक’ अकाउंट बंद करायला सुरवात केली आहे. अनेकांनी आपल्या जाहिरातीही थांबविल्या आहेत. हा प्रश्न केवळ राजकारणाचा नाही. यातून अनेक गुंतागुंतीचे मुद्दे समोर आले आहेत आणि याचे संभाव्य दुष्परिणाम ओळखले नाहीत, तर हा समाजमाध्यमाचा विळखा आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली केल्याशिवाय राहणार नाही.

एकूण ‘फेसबुकी’धारकांपैकी एक पंचमांश म्हणजे २० कोटी ‘फेसबुक’धारक हे भारतातले आहेत. ‘फेसबुक’ हा कोट्यवधी नागरिकांचा रोजचा ठिय्या झाल्यामुळं या प्रकरणाची आपल्याला गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. ‘फेसबुक’ हा समाजमाध्यम क्षेत्रातला इतका अद्‌भुत अनुभव ठरला की अनेक जाहिरातदार, विपणन संस्था यांना हे व्यासपीठ आपल्या व्यवसायवृद्धीसाठी साद घालू लागलं. इथं उपलब्ध होणारा प्रचंड माहितीचा खजिना, वैयक्तिक तपशील पाहून अनेक समाजशास्त्रज्ञ आणि विविध प्रणाली (ॲप्स) तयार करणारे निर्माते यांनाही आपले अनेक प्रयोग, अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण मोक्‍याचं वाटलं.

‘फेसबुक’नंही या अभ्यासकांना या माहितीस्थळावर काम करण्याची संधी दिली. मग अनेक चित्तवेधक खेळ, क्विझ, व्यक्तिमत्त्व ओळखण्याचे प्रयोग अशा मन गुंगवून टाकणाऱ्या अनेक सुविधा ‘फेसबुक’ भिंतींवर राज्य करू लागल्या. हे सगळं सुखनैव सुरू असताना ‘केम्ब्रिज ॲनालिटिका’चे अधिकारी अलेक्‍झांडर निक्‍स यांनी अमेरिकी निवडणुकीतील आपल्या कंपनीच्या सहभागाची कबुली दिली. पुरावा मागे राहू नये म्हणून काही काळानंतर आपोआप नष्ट होणाऱ्या ई-मेल प्रणालीचा वापर केल्याचंही त्यांनी मान्य केलं आणि प्रकरणाला वाचा फुटली. माहिती फुटते, मग कर्णोपकर्णी होते हा अनुभव आपल्याला नवा नाही. ‘आधार’सारख्या प्रचंड सुरक्षित मानल्या गेलेल्या माहितीलाही वाट फुटल्याचं आपण पाहिलं. सायबर विश्वात पासवर्ड पळवून अनेक आर्थिक आणि सामाजिक गंभीर गुन्हे होत असल्याचं आपण रोज पाहतो. या नव्या प्रकरणामुळं नेटवासीय म्हणून आपल्याला अधिक दक्षतेनं वावरावं लागणार आहे हे नक्की. ‘फेसबुक’ आपल्याला फुकट उपलब्ध आहे हा भ्रमही आता दूर होणं आवश्‍यक आहे. पुलित्झर पारितोषिक विजेता पत्रकार, लेखक अँड्य्रू लुईस याचं हे मार्मिक वाक्‍य ‘फेसबुक’सारख्या सेवा विनामूल्य उपभोगणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे- if you are not paying for it; you are not customer, you are the product being sold.

आपली माहिती, रोजनिशी आपण इथं खुले आम मांडतो आणि मग अनेक व्यावसायिक कंपन्या आपल्या वस्तू आणि सेवा विकण्याच्या दृष्टीनं या माहितीचा उपयोग करत आपला खिसा भरत असतात. हा व्यवहार तसा आपल्याला फार जाचक नाही, पण यापुढं जाऊन आपली माहिती- त्यात आपल्या आवडीनिवडी, व्यवसाय, उत्पन्न, राजकीय कल, आपला सामाजिक- सांस्कृतिक स्तर, स्वभावाचे पैलू यांची माहिती, ते आपल्याला विविध व्यक्तिमत्त्व चाचण्या घेत आपल्याला खेळात गुंतवून घेत राहतात. हा खेळ सुरू करण्यापूर्वी ते आपल्याकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही घेतात. त्यांच्या अटी आणि नियम न वाचताच आपण कबूल म्हणून टाकतो, इथंच खरी गोम आहे. यातील संमती, माहिती वापरण्याची परवानगी यांच्या स्पष्ट व्याख्या या करारात नाहीत. या माहितीला मग पाय फुटतात. केवळ आपलीच नाही तर आपल्या मित्रपरिवाराची इत्थंभूत माहिती तिऱ्हाईताच्या हातात जाते. त्या माहितीचं विश्‍लेषण करून व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून मग आपल्याला भुरळ पाडेल अशा जाहिराती, मजकूर यांचा मारा सुरू होतो. आपल्या मतपरिवर्तनाचा प्रयत्नही होतो. हा आपल्या खासगी माहितीचा बाजार, अधिक घातक ठरू शकतो. गुन्हेगार, दहशतवादी संघटना याचा वापर विध्वंसक गोष्टींसाठी करण्याची शक्‍यता निर्माण होते.
मुळात नवमाध्यमाला आवश्‍यक अशी साक्षरता बहुतेक जणांकडं नाही. ‘फेसबुक’ भिंतीवर आपला खासगी मजकूर नेमका किती तपशीलवार टाकावा याचं भान बऱ्याच जणांना नसतं. आपली नवी खरेदी, प्रवासाचे बेत, कौटुंबिक माहिती अशा सार्वजनिक जागेत मांडून आपण अनेक संकटांना आमंत्रित करत असतो ते प्रथम आपण थांबवलं पाहिजे. मित्रांची पाच हजार संख्या करण्यासाठी (पाच हजार ही मर्यादा ‘फेसबुक फ्रेंड’ची आहे.) आटापिटा करणारी मंडळी आपण पाहतो. ते त्यांना ‘स्टेटस सिम्बल’ वाटतं. मग अनोळखी, बनावट मंडळीही या मित्रांच्या यादीत जाऊन बसतात हे खूप गंभीर आहे, याची त्यांना जाणीवही नसते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपलं खासगीपण जपलं पाहिजे, याबाबत आपण फार आग्रही नसतो आणि यातूनच या संभाव्य धोक्‍यांची पेरणी व्हायला सुरवात होते. ‘गुगल’ या संकेतस्थळावरूनही आपली माहिती व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाते; त्यामुळं आता सर्वच समाजमाध्यमांतील माहितीच्या वापराविषयीच्या अटी आणि नियम आणि त्याची वैधता यांची झाडाझडती घ्यायला हवी. माहितीची चोरी हा दखलपात्र गुन्हा ठरवण्याची कायद्यात तरतूद होणं अपेक्षित आहे. हे वादळ काही दिवसांत शमेलही, पण या निमित्तानं एक धोक्‍याची घंटा आपल्याला ऐकू आली. ‘फेसबुक’ने एक धडा घालून दिला, तो न विसरता आपण एक जबाबदार नेटवासीय होऊया. तंत्रज्ञानानं आणि एका अफाट कल्पनेनं बहाल केलेलं हे ‘फेसबुक’ माध्यमसाक्षर होऊन निर्धास्तपणे वाचूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com