हापूसवर मोहर! (अग्रलेख)

hapus mango
hapus mango

बावनकशी रसरंगरूपगंधाच्या जोरावर देवगड, रत्नागिरीच्या हापूस आंब्याने भौगोलिक निर्देशांकाच्या लढाईतली मोठी मसलत लीलया जिंकली आहे. आता देवगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गचा हा राजा सातासमुद्रापार साम्राज्य विस्तार करेल, अशी चिन्हे आहेत.

आंब्यासारखे शाही फळ पृथ्वीतलावर दुसरे कुठले नसेल आणि भारतात तर आम्रफलाला राष्ट्रीय फळाचा शाही दर्जा आहे. या आम्रदेशात सौराष्ट्रातला केशर आंबा, कर्नाटकातला बदामी किंवा रसपुरी, आंध्रातला नीलम किंवा इमाम पसंद, तमिळनाडूतला मुलगोबा, दक्षिणेत आब राखून असलेला तोतापुरी, ओडिशा किंवा पश्‍चिम बंगालातला हिमसागर, उत्तरेतला दशहरा, चौंसा किंवा लंगडा असे मातब्बर अमीर-उमराव आहेत. याशिवाय केसरी, पायरी असे सरदार-दरकदार आहेतच. गोमंतकातल्या माणकुरादची वेगळीच मिजास आहे. भारतात एकूण २९० जातीचे आंबे पिकतात. त्यातले जेमतेम तीसेक बाजारात पत राखून आहेत. बाकीचे सारे साधे शिपाई- बारगीर...आपल्या देवगड-रत्नागिरीचा हापूस या आम्रदेशाचा अभिषिक्‍त सम्राट आहे. एकेकाळचे नामाबर शायर मियाँ मिर्झा गालिब यांना आंबे खूप आवडत. दिल्लीतील बल्लीमारांच्या गल्लीतल्या आपल्या सुप्रसिद्ध कोठीच्या पडवीत बसून आंब्यांचा आस्वाद घेणे, हे त्यांना शायरीइतकेच प्यारे होते. रसाळ आंब्याचा गर चोखून झाल्यावर ते साली समोरच्या सडकेवर टाकत. येणारी-जाणारी गाईगुरे नि गाढवे त्या सालींवर गुजारा करत. एकदा एका गध्याने त्या साली हुंगून तोंड फिरवले. ‘‘देखो मियाँ, गधे भी आम नहीं खाते...’’ मिर्झासाहेबांना त्यांच्या यारदोस्तांपैकी कोणीतरी चिडवले. त्यावर आणखी काही साली रस्त्यावर टाकून मिर्झासाहेब म्हणाले, ‘‘बिलकुल दुरुस्त फर्माया...गधे आम नहीं खाते!’’ आंबे न खाणाऱ्या माणसाच्या एकंदर प्रवृत्तीवरचे हे रुचिपूर्ण भाष्य सर्वांनाच पटावे!

देवगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या पट्ट्यात येणाऱ्या या आम्रबहराला पृथ्वीतलावर तोड नाही. ‘दुनिया में आम तो आम है, लेकिन हापूस यह आम नहीं, खास है’ असे म्हटले जाते ते काही उगाच नव्हे. कोकणातला हापूस किंवा आल्फोन्सो आज जगभरात आब टिकवून आहे तो आपल्या बावनकशी रसरंगरूपगंधाच्या जोरावरच. माडापोफळीची बने, रातांबे नि फणसाच्या या राज्यात हापूसचे राज्य असते जेमतेम तीनेक महिने...पण तेवढ्या काळात हे फळ ‘राजसुख’ पुरेपूर उपभोगून जाते. हा कोकणचा खराखुरा राजा आता भौगोलिक निर्देशांकाच्या म्हणजेच ‘जीआय’च्या लढाईतली एक मोठी मसलत लीलया जिंकली आहे. ‘जीआय’ म्हणजे एखाद्या पदार्थाला मिळणारी भौगोलिक ओळख. त्यावरून त्या पदार्थ अथवा फळाची जात, दर्जा, पत आणि किंमत ठरत असते. आजमितीस हापूसची बाजारपेठ साडेतीन हजार कोटींपेक्षा थोडीशी जास्त आहे, असे मानले जाते. निर्यातीचे काही बंध आणखी सैल होण्यास यामुळे मदत होईल आणि देवगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गचा हा राजा सातासमुद्रापार साम्राज्य विस्तार करेल, अशी चिन्हे आहेत. देवगड की रत्नागिरी की सिंधुदुर्ग, असा गृहकलह न करता एकत्र पेटंटसाठी अर्ज करण्याचा आग्रह पेटंट कार्यालयाने धरला आणि कोकणातल्या आंबानिर्मात्यांनी परिपक्‍वपणे आपापली छोटी संस्थाने एकमेकात विलीन करून एकच अखंड ‘आंबासाम्राज्य’ निर्माण करण्याच्या दृष्टीने मनोमीलन साधले. यामुळे आता ‘देवगड हापूस’ किंवा ‘रत्नागिरी हापूस’ अशा नावाने त्यांची विक्री करता येईल. कोकणच्या हापूसशी उगीचच स्पर्धा करू पाहणाऱ्या बलसाड, कर्नाटक, आंध्र आदी राज्यांमधील तथाकथित हापूस आंब्यांची मात्र यामुळे चांगली जिरली आहे. फळांच्या दुनियेतल्या कोकणशाहीचे सुवर्णयुग यामुळे सुरू होण्याची दाट शक्‍यता आहे. उन्हाळ्याचे दिवस आले की ठिकठिकाणी देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंब्यांचे ठेले दिसू लागतात. तिठ्यातिठ्यांवर पेट्या मांडणारे उत्तर भारतीय किरकोळ विक्रेते ‘‘पिव्वर हापूस है, साहब’’ अशी भलामण करताना दिसतात. कोकणात दहा वर्षांत पिकणार नाही, एवढा हापूस मुंबई-पुण्याच्या सडकांवर सरसकट विक्रीला उपलब्ध होतोच कसा, हे कोडे आता उलगडेल! यंदा गारपीट, वादळ, अवकाळी पाऊस असल्या कारणांनी मोहर गळल्याने आंबापिकाचे अपरिमित नुकसान झाल्याच्या विशेष बातम्या आल्या नाहीत. त्यावरून हापूसचे महामूर पीक आल्याचे गृहीत धरायला हरकत नाही. अर्थात, त्यामुळे हापूसचा भाव सर्वसामान्यजनांच्या आवाक्‍यात येवो आणि तुम्हा-आम्हा सर्वांच्या पानात मिरपूडयुक्‍त आमरसाची अमृतमधुर वाटी हंगामभर येवो, अशा किमान शुभेच्छा तरी एकमेकांना द्यायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com