अपूर्व भेट

hemkiran patki
hemkiran patki

मि त्राच्या नातवाचा पहिला वाढदिवस होता. आम्हाला या समारंभासाठी त्यानं प्रेमानं बोलावलं होतं. तो राहत असलेल्या अपार्टमेंटच्या टेरेसवर कार्यक्रम आयोजित केलेला होता. ठरल्यावेळी आम्हा साऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. वाढदिवसाच्या या औपचारिक समारंभानंतर बाळाला उपस्थितांनी सोबत आणलेल्या भेटी दिल्या. रंगीबेरंगी खेळणी, उपयोगाच्या वस्तू, दागिने आणि पशु-पक्ष्यांची रंगीत चित्रं असलेली मनोवेधक पुस्तकं...

हासऱ्या-नाचऱ्या डोळ्यांच्या त्या बाळाच्या हातातलं पक्ष्यांचं रंगीत चित्रांचं पुस्तक पाहून मन भुर्रकन गतकाळात बुडून गेलं... मला आठवला माझ्याच बाविसाव्या भेटीचा  पापण्यांची तोरणं ओलावणारा प्रसंग. तेव्हा मी नुकताच शासकीय सेवेत रुजू झालो होतो आणि परगावी होतो. केवळ वाढदिवसासाठी रजा घेऊन गावी येणं शक्‍य नव्हतं. त्यामुळे घरातल्या साऱ्यांनी मला वाढदिवसाची भेट म्हणून जे. कृष्णमूर्तींचं मराठीत अनुवादलेलं एक पुस्तक पोस्टानं पाठवलं होतं. माझ्या हाती ते वेळेवर पडलं. उघडून पाहिलं तेव्हा पुस्तकाच्या पहिल्याच पानावर वडिलांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन ओळी दिसल्या ः ‘ह्या चिंतनाचा उजेड तुझ्या हृदयात निरंतर राहो. तुझ्या बोलांतून तो इतरांनाही लाभो.’ त्या खाली घरातल्या साऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्या शेजारीच आजीच्या हाताच्या अंगठ्याचा गडद जांभळा ठसाही होता. आशीर्वादानं ओथंबलेल्या हृदयासहित आजीची प्रेमळ मूर्ती माझ्या नजरेसमोर साक्षात उभी राहिली.

आता असे भेटवस्तू देण्या-घेण्याचे अनेक प्रसंग मी पाहतो. पण ‘त्या’ प्रसंगाचं दिठीतून हृदयात उतरलेलं भावमोहन विस्मरणात जात नाही. मनात येतं, रोजच्या जगण्यातले उपचार कसं आपल्याला बाहेरून वळण लावतात आणि आपण आतून किती कोरडे, यांत्रिक होत जातो! जगण्याच्या धावपळीत कोरड्या उपचारांनी आपलं मन त्याची स्वाभाविक संवेदना हरवतं, हे आपल्या ध्यानात येत नाही. खरंतर रोजच्या जगण्यातही कुठलीही क्रिया असो सोयीनं, सवडीनं, लहरीनं किंवा सापेक्ष आवडीनिवडीतून केली तर यंत्रवत होते; पण तीच जर प्रेमपूर्वक केली तर अवधानाची होते. कुठल्याही समारंभाला, उत्सवाला आपण जेव्हा उपस्थित राहतो, तेव्हा त्या-त्या प्रसंगाच्या भावस्थितीत असायला हवं. या भावस्थितीत असण्यानंच देण्या-घेण्याच्या क्रियेत अंतरीचा ओलावा येतो; अन्यथा आपली दिनचर्या ही तनामनाच्या चेतनेचं भावसार गमावलेली नुसतं कर्मकांड होते.

जगण्याच्या साऱ्याच नैमेत्तिक आणि विहित क्रियांकडं प्रेमानं पाहिल्यानं या भवतीच्या जगाविषयी, मुला-बाळांविषयी, आपल्या व्यवसायाविषयी, तसंच आपल्या जीविताविषयी आस्था वाटू लागते. हृदयातल्या त्या आस्थेसहित आपण जेव्हा आनंदाच्या प्रसंगी दुसऱ्याला फुलं देतो, तेव्हा गंधही त्याच्या स्वाधीन होतो. आपल्या जीवनाची बाग फुलून येते. रंगभेद आणि गंधभेदाच्या पलीकडलं नुसत्या फुलण्याचं चैतन्य आपल्या देवघेवीतून प्रत्यक्ष आपल्या जाणिवेत येतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com