सुरांवरी हा जीव तरंगे!

माधव गाडगीळ (निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ)
शनिवार, 6 मे 2017

गोव्याच्या रम्य निसर्गाच्या सान्निध्यात काव्य, संगीत, कला बहरल्या आहेत. कलाविष्काराचा हा वारसा टिकवून धरण्यासाठी डोंगराळ, वनाच्छादित नॉर्वे जसे औद्योगिक विकास साधत निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तसे आपण झटत राहिले पाहिजे. 
 

गोव्याच्या रम्य निसर्गाच्या सान्निध्यात काव्य, संगीत, कला बहरल्या आहेत. कलाविष्काराचा हा वारसा टिकवून धरण्यासाठी डोंगराळ, वनाच्छादित नॉर्वे जसे औद्योगिक विकास साधत निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तसे आपण झटत राहिले पाहिजे. 
 

एक सुभाषित आहे : साहित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशु पुच्छ विषाणहीन! ज्याला साहित्याची, संगीताची, कलेची चाड नाही, असा मनुष्य बिनशेपटाचा, बिनवशिंडाचा पशू आहे. होय, केवळ मानवच निर्हेतुक सौंदर्यनिर्मिती करतो. मंगेश पाडगावकर गातात - गा विहंगांनो माझ्यासंगे, सुरांवरी हा जीव तरंगे, तुमच्यापरी माझ्याही स्वरातुन उसळे प्रेम दिवाणे ! पण पक्षिकूजन सहेतुक असते; एक तर प्रेमाचे आमंत्रण, नाही तर प्रतिस्पर्ध्यांना धमकावणे. मानवी संगीत याच्या पलीकडे जात सुरांशी खेळते, स्वरांची आराधना करते. खेळ ही आपल्यासारख्या प्रगत पशूंची, चिम्पाझींच्या पिल्लांची, गाईंच्या वासरांची, वाघांच्या छाव्यांची खासीयत आहे. हे पशू बालपणी सपाटून खेळतात; त्यातून प्रौढावस्थेत अत्यावश्‍यक अशी कौशल्ये आत्मसात करतात. पण, त्यांची खेळकर वृत्ती बाल्यावस्थेबरोबर ओसरते. मानवाची जीवनशैली अगदी वेगळी आहे.

मानवाने एक समर्थ भाषा विकसित केली आहे, ती वापरत खूप काही शिकायला आपले शैशव लांबते आणि त्याबरोबरच आपली खेळकर वृत्ती जन्मभर टिकून राहू शकते. या खेळकर वृत्तीतून विविध कलाविष्कार उमलतात. नृत्यच घ्या; नृत्य व खेळ यांच्यातली सीमारेषा धूसर आहे. जगज्जेता मुष्टियोद्धा महंमद अली म्हणायचा, ‘मी फुलपाखरासारखा नाचतो, मधमाशीसारखा डंख करतो!’ 

मानवाच्या कंठाची रचना आपल्या चिंम्पाझींसारख्या भाईबंदांहून वेगळी आहे. चिंम्पाझींची श्वासनलिका आणि अन्ननलिका स्वतंत्र असतात; पण आपल्या जिभेमागच्या पोकळीतून आपण श्वासही घेतो आणि अन्नही गिळतो. यातून ठसके लागतात; पण या रचनेमुळे आपली जीभ अशा चपलतेने हलू शकते, की आपण चिंम्पाझींच्या आणि इतर पशूंच्या किती तरी पट वेगवेगळे सूर काढू शकतो. स्वरसंपन्न मानव नानाविध सूर एकाला एक जोडत शब्द, वाक्‍ये रचतो. कोणत्याही ध्वनींना कोणताही अर्थ लावत वेगवेगळ्या भाषा निर्माण करतो. मग तुकोबांना शब्दांशी खेळत विनोदी अभंग स्फुरतात ः कानडीनें केला मराठी भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ।। तिनें पाचारिलें इल्लि बा म्हणोन, हाय दैवा म्हणे येरू पळे ।। कानडीत बा म्हणजे ये, तर मराठीत पिता. नववधूने ‘इकडे ये’ म्हणून बोलावल्यावर मराठी नवऱ्याला वाटले, ही म्हणते आहे की तू माझ्या पित्यासमान आहेस. त्याने कपाळावर हात मारून घेतला. असे शब्दांशी खेळत - खेळतच साहित्य उमलते. 

मनुष्याचे अचाट स्वरवैविध्य त्याला सुरांशी खेळायला, सुरांची आराधना करायला साहजिकच प्रवृत्त करते आणि त्यातून संगीत खुलते. स्वरांच्या साकार रूपाचा साक्षात ध्यास अशा गानसरस्वती किशोरी आमोणकर नुकत्याच आपल्यातून निघून गेल्या. त्यांचे चिरंजीव विभास निसर्गप्रेमी आहेत; स्वाभाविक आहे, कारण त्यांना निसर्गरम्य गोव्याचा वारसा आहे. विभास यांच्या आजीचे, गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकरांचे कुर्डे गाव गोव्यातल्या सह्याद्रीच्या कुशीत पहुडले होते. त्यांच्या कुटुंबाचा वाडा मांडवी नदीच्या तीरावरच्या माशेल- आमोण्यात आहे. मी विद्यार्थिदशेपासून किशोरीताईंच्या मैफिली ऐकल्या आहेत, ध्वनिमुद्रिका पुन्हा पुन्हा वाजवल्या आहेत; पण विभासच्या स्नेहामुळे अलीकडेच त्यांचे गाणे, त्यांचे विचार अगदी जवळून ऐकण्याची संधी मिळाली. मग मी गोव्यात त्यांचा मांडवीकाठचा वाडा पाहिला, कुर्डी गावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. समजले की, कुर्डी गाव आता अस्तित्वात नाही. साळावली धरणात तो गाव संपुष्टात आला. गोव्याच्या पाणीपुरवठ्याचा हा मुख्य आधार काठावरच्या खाणींमुळे लोखंड, मॅंगनीजचे प्रमाण वाढून आरोग्यबाधक बनला आहे.

मांडवी नदीही खाणींच्या राडारोड्यामुळे त्रस्त आहे. या पिटुकल्या राज्यातले अंदाधुंद खाणकाम नजरेआड करणे अशक्‍य झाल्यावर केंद्रीय खनिज मंत्रालयाने न्या. शहा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला. त्यांचा गोव्यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तो सांगतो : गोव्यातील खाणींवर कधीही काहीही देखरेख ठेवली गेलेली नाही. त्यामुळे कशाचीही भीती नाही असे वातावरण निर्माण होऊन खाणचालकांद्वारे बेदरकारपणे पर्यावरण, जीवसृष्टी, शेती, भूजल, ओढे, नद्या, तळी यांचा विध्वंस चालला आहे. अशा अवैध व्यवहारातून किती पैसा केला गेला आहे? शहा आयोगाचा अंदाज आहे, पस्तीस हजार कोटी रुपये!

छोटेखानी गोव्याने भारताला अनेक प्रतिभाशाली कलाकार पुरवले आहेत. बोरकरांसारखे कवी, महादेवशास्त्री जोशांसारखे साहित्यिक, दीनानाथ मंगेशकर, मोगुबाई कुर्डीकर, जितेंद्र अभिषेकी, अन्थोनी गोन्साल्व्हेससारखे गायक- संगीतकार, सचिन पिळगावकरांसारखे अभिनेते, मारिओ मिरांडासारखे चित्रकार, चार्ल्स कोरिआसारखे वास्तुशिल्पी. संवेदनशील चार्ल्स कोरिआंबरोबर दोन वर्षे एका समितीवर काम करण्याची संधी मला मिळाली. गोव्यात चाललेल्या निसर्गाच्या नासाडीमुळे ते व्याकूळ होते. पण, आज गोव्याचा उच्छेद शहा आयोगाला पूर्णपणे डावलून मागील अंकावरून पुढे चालू झाला आहे. दुर्दैवाने अमेरिकेतही ट्रम्प महोदयांनी जैववैविध्याचे आगर म्हणून आजवर सांभाळलेला अलास्काचा समुद्रकिनारा खनिज तेलासाठी खणून नासायचा चंग बांधला आहे. पण, सगळेच जग या दिशेने चाललेले नाही. गोव्यासारखाच डोंगराळ, वनाच्छादित नॉर्वे समुद्रातल्या खनिज तेलाचा अतिशय काळजीपूर्वक, पर्यावरण जपत वापर करत त्यातून होणारा लाभ कायम सगळ्या समाजापर्यंत कसा पोचेल, याची व्यवस्था करण्यात गढलेला आहे. इतरही अनेक प्रकारे हा देश पर्यावरण संरक्षणासाठी मनापासून झटतो आहे. नॉर्वेचे दरडोई उत्पन्न अमेरिकेहूनही जास्त आहे, तरी तो जगातल्या सगळ्यात कमी विषमताग्रस्त, सगळ्यात कमी भ्रष्टाचारपीडित समाजांपैकी एक आहे. निसर्ग, संस्कृती, कलासंपन्न गोमंतकाने अमेरिकेच्या नव्हे, नॉर्वेच्या दिशेने पावले उचलणे अगत्याचे आहे.

Web Title: editorial madhav gadgil