editorial malhar arankalle wirte article phahatpaul
editorial malhar arankalle wirte article phahatpaul

ऊनसावल्यांचे झोके

संध्याकाळ जवळ येऊ लागली, की वाऱ्याच्या झोतांबरोबर अनेक काजळरेषाही वाहत निघाल्यासारखं वाटत राहतं. घरट्यांकडं परतणाऱ्या पक्ष्यांचे फडफडणारे पंख या रेषांना स्वतःबरोबर घेऊन जातात; आणि पंख उघडून मध्येच अलगद सोडून देतात. मग त्याच रेषा एकमेकींची बोटं पकडून जमिनीवर उतरतात. दिवेलागणीच्या ठिणग्या सगळीकडं चमचमू लागतात. कुडाच्या झोपड्यांतून, कौलारू छपरांतून चुलीच्या धुराचे हात उंचावू लागतात; आणि सावळी संध्याकाळ रात्रीचं कुळकुळीत कृष्णवस्त्र ओढून शांत झोपी जाते. सावल्यांचा दाटपणा उत्तरोत्तर वाढत जातो.

हा रोजचा अनुभव आहे. उगवतीमावळतीचा हा प्रवास अखंड सुरू आहे. चढानंतर उतार, दुःखानंतर सुख, उन्हाच्या कडकपणानंतर थंडगार सावली असं एकानंतर दुसरं येतच असतं. गाडी बोगद्यात प्रवेश करते, तेव्हा अंधारात बुडून जाते; आणि काही वेळानं बाहेर येते, तेव्हा प्रकाशानं उजळून जाते. काही बोगदे लांबलचक असतात; तर काही त्या मानानं छोटे. कधी अंधारातला प्रवास अधिक असतो; तर कधी प्रकाशातला प्रवास मोठा असतो. पृथ्वीगोलावरसुद्धा कधी दिवस मोठा असतो; आणि कधी रात्र लांब पसरलेली असते. चढाच्या रस्त्यावरून जाताना पुढं हमखास येणाऱ्या उताराची आपल्याला कल्पना असते. ऊन-सावलीच्या खेळातही हाच विश्वास आपल्या मनात असतो. मोठ्या रात्रीबद्दलही आपली काही तक्रार नसते. दुःखाची स्थिती मात्र आपल्याला नकोशी वाटते. त्या अंधारात खूप घुसमट होते. ते क्षण जीवघेणे भासतात. "एकानंतर दुसरं' हा सृष्टिनियम तिथं आपल्याला दिलासा देत नाही. का बरं होत असेल असं?

अंधारात बागुलबुवा लपलेला असतो, अशा आशयाच्या गोष्टी ऐकत आपण मोठे होतो; आणि मनाच्या वळचणीला नकळत अंधारच गोळा होतो. या बागुलबुवानं कधी कुणाचं चांगलं केल्याचं त्या गोष्टींत ऐकलेलं नसतं. हा कथासंस्कार आपलं व्यक्तिमत्त्व घडवितो. चवी अनेक असल्या, तरी आपल्यापैकी अनेकांना आवड गोडाचीच असते; पण अस्तित्वात असलेल्या कडू, तुरट, खारट, आंबट, तिखट या चवी टाळून कसं चालेल? त्यांचं प्रमाण नेमकं जुळविता यायला हवं. या समतोलानंच पदार्थ रुचकर होतात. सुख-दुःखासारख्या गोष्टीत चवींएवढे प्रकारही नाहीत. तिथं दोनच बाबी आहेत. कुठल्या तरी एकाचा अतिरेक आपल्याला नकोसा होतो. काहींना दुःख खाऊन टाकतं; आणि काहींना सुखही खुपत राहतं. या दोन्हींचा तराजू असमतोल झाला, की तो हेलकावे घेत राहतो. कधी एका दिशेला अधिक वेळ थांबतो; आणि कधी विरुद्ध दिशेला स्थिरावतो. एक बाजू दुसऱ्या बाजूएवढी करून तराजू समतोल करावा लागतो. दुःखाचं ओझं डोक्‍यावरून उतरवीत गेलो, तर सुखाची बाजूही वर होत होत समपातळीत येते.

अंधारात लपलेली दूरची प्रकाशचिन्हं आपण का पाहत नाही? दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय हा आधीच्या रात्रीतून आलेला आहे, असं आपल्याला का वाटत नाही? उंच चढावरील चालीच्या कष्टांचा त्रास उतारावरून जाताना आपण हलका का करीत नाही? ऊनसावल्यांचे असे झोके म्हणजेच तर आपलं आयुष्य आहे. झोका कधी वर असतो; तर कधी खाली झेपावतो. गती तीच असते. झोक्‍याची स्थिती बदलणारी असते. ग्रहगोलांची भ्रमणगती नियमबद्ध असते. दिवस-रात्र हे केवळ तिचे परिणाम असतात.
ऊनसावल्यांच्या झोक्‍यांचं हे रहस्य नीट समजून घेतलं, तर आयुष्य किती सोपं होऊन जाईल नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com