छद्मविज्ञानाचे दाखले! (अग्रलेख)

satyapal singh
satyapal singh

केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांची आधुनिक विज्ञानाविषयी काय मते आहेत, हे एव्हाना जगजाहीर झाले असल्याने खरे पाहता त्याविषयी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे कारण नाही. लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असल्याने ज्याला त्याला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे; परंतु तरीही त्याची चिकित्सक दखल घ्यावी लागते. याचे कारण एक तर ते केंद्रात महत्त्वाच्या अशा मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री आहेत आणि दुसरे म्हणजे त्यांचे वादग्रस्त विधान कुठल्या सभा-समारंभातले किंवा अनौपचारिक गप्पांमधले नाही, तर केंद्रीय शिक्षण सल्लागार समितीच्या बैठकीतील आहे. ‘डार्विनचा उत्क्रांतिवाद खोटा ठरवून तो शैक्षणिक अभ्यासक्रमातून काढून टाकावा’, असे अचाट विधान यापूर्वी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात करून त्यांनी वादाचे मोहोळ उठवून दिले आणि त्यांचे वरिष्ठ प्रकाश जावडेकर यांनी कानउघाडणी केल्यानंतर ते मत वैयक्तिक असल्याचे सांगून मोकळे झाले. त्यामुळे बिचाऱ्या डार्विनची सुटका झाली! पण आता शास्त्रज्ञ न्यूटन त्यांच्या तावडीत सापडले आहेत. ‘न्यूटनने सांगितलेले गतीचे नियम आमच्याकडे केव्हाच मंत्रबद्ध झालेले होते’, असे सांगून त्यांनी विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांचे ‘प्रबोधन’ केले. ‘शैक्षणिक इमारती, संकुले वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार बांधली जाणे आवश्‍यक आहे, तसे केले तर उत्तम शिक्षण दिले जाऊ शकते,’ असेही तारे त्यांनी तोडले आहेत. सत्यपाल सिंह हे आपल्या मताविषयी इतके निःशंक असतात, की त्यामुळेच पुरावे देण्याची वगैरे त्यांना गरज वाटत नाही. तसे ते मागितले तर ते कदाचित त्यालाही पाश्‍चात्त्यांचे फॅड असे म्हणायला कमी करणार नाहीत. अशा गृहस्थाला मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रिपद देऊन सरकारने नेमके काय साधले आहे? एकीकडे शैक्षणिक सुधारणांची भाषा करायची, स्पर्धात्मक पर्यावरणात चमकणारे विद्यार्थी घडवू, अशी ग्वाही द्यायची आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीतच केंद्रीय राज्यमंत्र्याने पुराणकथांवर प्रवचन द्यायचे! पारंपरिक शिक्षणाच्या नावाखाली प्राचीन काळातील रूढी, समजुतींचे भरताड येणार असेल तर आजच्या आव्हानांना तोंड देणारी शिक्षण रचना आपण बनविणार कशी? मोदी सरकारची नेमकी दिशा तरी काय आहे?  

गतीचे नियम पूर्वजांनी ओळखले होते, त्यांना विमानविद्या अवगत होती, ब्रह्मास्त्राचा महाभारतात उल्लेख आहे, त्याअर्थी न्युक्‍लिअर फिजिक्‍सही ज्ञात होते, असे बेफाम दावे वेळोवेळी केले जातात. अशांचे प्रतिनिधित्व सत्यपाल सिंह करतात. पूर्वगौरवात त्यांना धन्यता वाटते आणि वैज्ञानिक क्रांती पाश्‍चात्त्य जगात झाल्याने आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व त्यामुळे झाकोळून जाते, अशी रूखरूख त्यांना लागून राहिलेली दिसते. वास्तविक आधुनिक विज्ञानातील तत्त्वे माहीत असण्याचा ‘आरोप’ पूर्वजांवर करणे, हा त्यांच्यावरदेखील अन्याय नाही का? त्यांच्या काळाची आव्हाने त्यांनी पेलली, त्या त्या वेळचे प्रश्‍न सोडविले, कल्पनाही लढविल्या, त्याबद्दल त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवे. अभिमानही बाळगायला हरकत नाही; परंतु तो योग्य कारणासाठी असावा. जगात भारतीय समाजाला एक स्वायत्त ओळख असावी, ही आकांक्षा अनाठायी नसली तरी त्याचा योग्य मार्ग, आजची आव्हाने समर्थपणे पेलणे हाच आहे. मूलभूत विज्ञानात भारतीयांनी संशोधनाची नवनवी शिखरे गाठणे, हा त्याचा एक मार्ग असू शकतो. भारतीय राज्यघटनेने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार हे मार्गदर्शक तत्त्व म्हणून समाविष्ट केले आहे. परंतु ती मानसिकता पसरविण्याचा प्रयत्न तर सोडाच; पण अंध समजुतींना घट्ट करण्याचा प्रयत्न मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे होऊ लागला तर अनवस्था ओढवेल. विज्ञानाला विरोध करणारे फक्त भारतातच आहेत असे नाही; तर अमेरिकेसारख्या विकसित देशातही छद्मविज्ञानाने उच्छाद मांडला आहे. डार्विनचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळणाऱ्या काही संस्थाही तेथे आहेत. मध्ययुगीन काळातील धर्मसमजुती खऱ्या ठरविण्यासाठी विज्ञानाने दाखविलेल्या सत्याच्या प्रकाशाकडे पाठ फिरवायची, असा हा प्रकार आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तानात काही ठिकाणी लशी टोचून घेणेदेखील धर्मविरोधी ठरविले जाते! आपण त्या मूलतत्त्ववाद्यांच्या रांगेत जाऊन बसायचे काय, याचा सत्यपाल सिंह यांच्यासारख्यांनी शांतपणे विचार करावा; अन्यथा त्यांच्या खात्याविषयी पंतप्रधानांनी तरी तो करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com