सहकाराकडून गुन्हेगारीकडे (अग्रलेख)

nagar
nagar

नगर जिल्ह्यातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण कोणत्या थराला गेले आहे, हे दोन कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनेने दाखवून दिले आहे. आमदाराच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तर कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत.

सहकाराचा वारसा सांगणारा नगर जिल्हा सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. कधीकाळी साखर कारखानदारीची झळाळी असलेल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध वैचारिक चळवळींचे केंद्र असलेल्या या जिल्ह्यात आता राजकीय गुन्हेगारीकरणाचे अक्षरशः थैमान चालू आहे. सत्ता आणि पैसा यांची घमेंड आणि त्या जोरावर दहशत माजविण्याची वृत्ती यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून जगावे लागते आहे. हा विकार किती खोलवर गेला आहे, हे नगरमध्ये शनिवारी भरदिवसा आणि गजबजलेल्या भागात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने दाखवून दिले. गुंडगिरीने जणू काही समांतर यंत्रणाच चालविली आहे, हे यावरून दिसते. यामुळे सरकारपुढे एक आव्हान निर्माण झाले असून, सरकारने खंबीर उपाययोजना करीत ही गुंडगिरी मोडून काढणे आवश्‍यक आहे.  

नगरमधील उपनगर असलेल्या केडगाव भागात शनिवारी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाली. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तीन आमदारांचा समावेश आहे. संग्राम जगताप, अरुण जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) हे पितापुत्र आणि शिवाजी कर्डिले (भाजप) अशी त्या आमदारांची नावे आहेत. नगरसाठी राजकारणातून वाढत जाणारे गुन्हेगारीकरण नवे नाही. काही वर्षांपूर्वी अशोक लांडे या लॉटरी विक्रेत्याच्या खून प्रकरणात काँग्रेसचे नेते असलेले भानुदास कोतकर, त्यांचे पुत्र माजी महापौर संदीप कोतकर आदींना जन्मठेप झाली आहे. कोतकर यांचे पुत्र संदीप यांचे नगरसेवकपद जन्मठेप झाल्यामुळे रद्द झाले. त्यामुळे त्या रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आणि त्यातूनच या हत्या झाल्याचा संशय आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित संदीप गुंजाळ हा खून झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांसमोर हजर झाला. निवडणूक निकालानंतर काँग्रेसच्या विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत तो जल्लोष करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे या हत्येमागे राजकीय कारण असल्याचे सांगण्यात येते, तरी त्याविषयी तपासाअंती सत्य समोर येईल. परंतु, यानिमित्ताने नगरच्या राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तींचे जे काही दर्शन घडले ते भयावह असून, पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर हल्ला करण्यापर्यंत आमदारांचे समर्थक निर्ढावलेले असतील तर कायदा-सुव्यवस्थेचे आणखी काय धिंडवडे उडणे बाकी आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. या प्रकरणातील आमदार संग्राम जगताप यांची शनिवारी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशी सुरू होती, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी थेट अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून आमदार जगताप यांना तेथून नेले. हल्लेखोरांमध्ये आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक व सत्तेच्या माध्यमातून लाभ मिळालेल्यांचे टोळके होते. अशा व्यक्तींसाठी ‘नगरसेवक’ किंवा ‘कार्यकर्ता’ हे शब्द वापरणे ही त्या शब्दांची क्रूर चेष्टा म्हणावी लागेल.

यानिमित्ताने तेथील राजकीय संघर्ष आणि गुन्हेगारीच्या सद्यःस्थितीवर दृष्टिक्षेप टाकणे योग्य होईल. शिवसेना विरुद्ध कोतकर, जगताप, कर्डिले हा सामना नगरमध्ये कायम पाहायला मिळतो. राजकीय मतभेद असणे आणि त्यातून लोकशाही मार्गाने स्पर्धा करणे हे लोकशाही व्यवस्थेत अपेक्षितच असते; पण कोतकर, जगताप, कर्डिले यांसारख्यांना लोकशाही ही फक्त सत्तेचा सोपान गाठण्यासाठी हवी असते. प्रत्यक्षात त्यांना मनगटशाहीच करायची आहे आणि सत्तेचा वापर दहशतीची पकड मजबूत करण्यासाठीच ते करतात. सारे राजकारण त्यांच्या दहशतीच्या विळख्यात सापडले आहे. ‘भयमुक्त नगर’ ही घोषणा शिवसेनेने दिली, ती या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाची आहे; परंतु सध्या तरी भयाच्या छायेतच हा परिसर आहे, यात शंका नाही. सहकारातूनच राजकीय नेतृत्व उदयास येण्याचा काळ जवळपास संपुष्टात आला असून, आता नेतेपदाच्या शिड्या चढण्याचे आधारच बदलत आहेत. भूखंड, त्यातून मिळणारा वारेमाप पैसा आणि त्यासाठी करावे लागणारे उद्योग लपविण्यासाठी राजकारणाचे पाठबळ आवश्‍यक ठरते. भूखंड बळकावण्यासाठी त्रास देणे, धमकावणे आणि त्यातून गडगंज पैसा मिळविणे हा आता धंदा झाला आहे. त्यालाच प्रतिष्ठा मिळत असल्याचे चित्र निर्माण होणे, ही गंभीर बाब आहे. केडगाव येथील दुहेरी खून प्रकरण असो किंवा अन्य कोणतीही घटना असो, त्यात आपलेच नाव का चर्चिले जाते, याचा विचार संबंधित नेत्यांनी आणि त्यांना राजकारणात मोठमोठी पदे देऊन सन्मान मिळवून देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com