इशारा! (ढिंग टांग)

ब्रिटीश नंदी
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कडक सुपारी दातामध्ये, दारात आले काजूफ
णशीच्या गे सावलीमध्ये वाजे ढोल नि डफ
कडकडीत दुपाराला रानामध्ये आरोळी
वडस आला डोळ्यामध्ये हातामध्ये चारोळी
लींबोणीच्या झाडामागे चंद्र आहे साक्षीला
चांद्यापासून बांद्यापरेंत कोंबडा कोणी भक्षीला?

कारभारी नानासाहेब फडणवीस यांसी, बहिर्जी नाईकाचा शिरसाष्टांग (व शतप्रतिशत) नमश्‍कार. आपल्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात फिरून बित्तंबातमी आणण्याचे काम निरंतर चालू असून मंत्रिमंडळ विस्ताराच्या खबरासुद्धा नीट पसरविण्यात यश मिळत आहे.

तथापि, एक जबर्दस्त खबर देण्यासाठी सदरील खलिता कोड लॅंग्वेजमध्ये पाठवत आहे. वाचून लागलीच फाडून टाकावा, ही विनंती. तसेच ह्यातील मजकूर कोणालाही दाखवू नये. असो.
कडक सुपारी दातामध्ये, दारात आले काजूफ
णशीच्या गे सावलीमध्ये वाजे ढोल नि डफ
कडकडीत दुपाराला रानामध्ये आरोळी
वडस आला डोळ्यामध्ये हातामध्ये चारोळी
लींबोणीच्या झाडामागे चंद्र आहे साक्षीला
चांद्यापासून बांद्यापरेंत कोंबडा कोणी भक्षीला?

सर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरामय:
रड्या पैलवान उताणी पडलो, म्हणतंय पुन्ना जितंमय:
दारापासचा जुनाच माड, कौलावरती फुटलंय डांगर
रवळनाथाच्या आशीर्वादानं कायम हंयसर चालतो लंगर

निम्माशिम्मा राक्षस आता बाटलीत भरून ठेवा
घामोळ्याची पावडर थापा, कुंद झाली हवा
लांबूनच रवळनाथा, मागतंय चार दिवस
आणि त्यातले दोन गेले, दोन उरले मस!
हे दोन आता तरी फळू दे रे देवा
हो-नाय करता करता मिळू दे रे मेवा!

...साहेब, प्रकरण भयंकर सीरिअस आहे. ह्यावेळी नुसतीच आवई नाही. आधीच इशारा देण्यासाठी हे पत्र धाडत आहे. योग्य ती कारवाई करावी. कळावे. आपला. बहिर्जी नाईक.
* * *
प्रिय चंदुदादा कोल्हापूरकर यांसी शतप्रतिशत प्रणाम,
तांतडीने पत्र पाठवण्याचे कारण म्हंजे आपला कोकणातील गुप्तहेर बहिर्जी नाईक ह्याने रजिस्टर एडीने पत्र पाठवले आहे. सही करून पत्र ताब्यात घेतले. उघडले तर त्यात कविता! आम्ही डोक्‍याला हात मारला. (सोबत बहिर्जीच्या खलित्याची फोटोकॉपी जोडत आहे. कृपया डोळ्यांखालून घालावे. अर्थ समजल्यास आम्हांस कळवावे!!) इतकी वाईट कविता गेल्या शंभर वर्षात वाचली नव्हती. कशाला कशाचा पत्ता नाही. एका ओळीचा दुसऱ्या ओळीशी काहीही संबंध नाही. बहिर्जी नाईकचे डोके फिरले आहे काय? कृपया चौकशी करावी. हल्ली हे डिपार्टमेंट तुम्ही बघता, म्हणून विचारतो आहे.
बहिर्जीने अशी कविता आम्हाला कां पाठवावी? ह्या कवितेला चाल लावून आम्ही ती कोजागिरीला म्हणावी, असे त्याला वाटते का? आर्केस्ट्रा किंवा मित्रमंडळीत गाणी म्हणणे आम्ही आता बंद केले आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. ह्या कवितेचे प्रयोजन काय, हेच आम्हाला कळलेले नाही. डोके हैराण झाले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. आपला. नाना फडणवीस.
* * *
प्रिय नानासाहेब,
अहो, एवढी सोपी आणि अर्थपूर्ण कविता तुम्हाला कळली कशी नाही? अशाने तुम्हाला दिल्लीला जावे लागेल हं!! कवितेचा अर्थ अत्यंत सुलभ आणि चांगला आहे. कविता ओळीत दडलेली असते किंवा दोन ओळींच्या मध्ये तिचा अर्थ शोधण्याची आपल्या समीक्षकांना खोड असते. पण ह्या कवितेतला अर्थ ओळीत अथवा ओळींच्या मध्ये दडलेला नसून ओळींच्या सुरवातीस दडलेला आहे. प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर टिपून ठेवा. त्यात बहिर्जी नाईकाचा गुप्त संदेश दडलेला आहे. तो संदेश असा : ""कणकवलीचा सरदार निघाला आहे!' आणि यावेळी प्रकरण सीरिअस असून नुसतीच आवई नाही, असाही इशारा देण्यात आला आहे. नवरात्रीत बार उडणार असे दिसते. कोकणच्या राजाच्या स्वागतासाठी सज्ज राहा! कळावे. आपला. दादा कोल्हापूरकर.
ता. क. : आपल्या बहिर्जी नाईकास एक सोन्याचे कडे भेट द्यावे! कविताही करायला लागला लेकाचा!!