रशियाचा राजकीय ‘गोल’!

nikhil shrawge
nikhil shrawge

मित्रदेशांना धाब्यावर बसवत रशियाशी जवळीक साधण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांना ‘अमेरिका फर्स्ट’कडून ‘अमेरिका एकाकी’ या प्रवासाकडे नेतो आहे. हेलसिंकीमधील चर्चेत ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेतल्याने पुतीन यांच्या धूर्त चालींना आणखी बळ मिळेल असे दिसते.

अ मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची सोमवारी फिनलंडची राजधानी हेलसिंकीमध्ये पहिली औपचारिक बैठक झाली. उभय नेत्यांत या आधी इतर परिषदांच्या निमित्ताने दोनदा भेट झाली होती. शीतयुद्ध आणि सोव्हिएत महासंघाच्या काळात फिनलंडमध्ये उभय देशांत पाच वेळा बैठका झाल्या होत्या. त्यामुळे इतिहासाचा विचार करून या बैठकीसाठी फिनलंडची निवड केली गेली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यशस्वी मुत्सद्देगिरीचा आव आणणारे ट्रम्प-पुतीन यांचा दावा किती फोल आहे हे समजावून घेणे गरजेचे आहे.

बैठकीआधी ट्रम्प यांनी ‘नाटो’चे सदस्य असलेल्या देशांशी आणि नंतर ब्रिटनच्या दौऱ्यावर जाऊन पंतप्रधान थेरेसा मे यांची चर्चा केली. या भेटींमध्ये त्यांनी ‘नाटो’ देशांवर आणि थेरेसा मे यांच्यावर टीकेची झोड उठवली. रशियाच्या वाढणाऱ्या भौगोलिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी जन्माला घातलेल्या ‘नाटो’ संघटनेच्या बैठकीत ट्रम्प इतर सदस्य देशांना निर्वाणीचा इशारा देताना दिसले. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना जाहीर विरोध करीत त्यांनी आधीच भांबावलेल्या युरोपीय समुदायात वादाची भर घातली आणि पुतीन यांना अपेक्षित असलेला वाद सुरू करून ते फिनलॅंडमध्ये दाखल झाले. गेल्या महिन्यात झालेल्या ‘जी-७’ राष्ट्रांच्या परिषदेतसुद्धा ट्रम्प यांनी विचित्र भूमिका घेत सदस्य देशांना त्रास दिला होता. काही एक विचार करून प्रस्थापित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांमध्ये फूट कशी पडेल हेच ट्रम्प पाहात असल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षांतील त्यांचे परराष्ट्र धोरण बघितल्यास हातचे सोडून नसत्याच्या मागे पळण्याकडे त्यांचा कल अधिक आहे याची प्रचिती येते. आताही त्यांनी तेच केले. युक्रेनचा घास गिळू पाहणाऱ्या, सीरियामध्ये अमेरिकेच्या विरोधी गटाला मदत करणाऱ्या, चीन, इराण व उत्तर कोरियाशी अत्यंत जवळीक साधणाऱ्या आणि २०१६ च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत लुडबूड करीत लोकशाहीला धक्का पोचविणाऱ्या पुतीन यांच्याबाबत मात्र ट्रम्प यांनी मिठाची गुळणी धरली. वरील एकाही विषयावर त्यांनी पुतीन यांना जाब विचारला नाही. उलट अमेरिका-रशियाचे संबंध मागील अध्यक्षांनी कसे बिघडवले याची यादी जाहीर करीत त्यांनी पुतीन यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. हेच पुतीन यांना अभिप्रेत होते आणि पुढेही राहील. अमेरिकेतील विशेष तपासाधिकारी रॉबर्ट म्युलर यांनी या भेटीच्या एक दिवस अगोदर रशियाच्या बारा गुप्तहेरांवर निवडणुकीत लुडबुडीचा ठपका ठेवला. याचा योग्य तो पाठपुरावा न करता, ‘म्युलर यांचा हा तपास अमेरिकेला काळिमा कसा आहे’, ‘लुडबुडीचा आरोप म्हणजे शुद्ध गाढवपणा’ असे शेरे मारून ट्रम्प यांनी अमेरिकेची अब्रू चव्हाट्यावर आणली. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांपेक्षा पुतीन यांनी नाकारलेला आरोप ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासून मान्य केला आहे. ठसठशीत पुरावे असलेल्या या एकाही आरोपाला भीक न घालता, पुतीन असे काही करणार नाहीत, असा दावा ट्रम्प यांनी केला. पुतीन यांच्याबाबत इतकी आपुलकी ट्रम्प का दाखवत आहेत याचे कोडे भल्याभल्यांना उलगडलेले नाही. ट्रम्प यांच्याबाबतीत काही संवेदनशील गोष्टी पुतीन यांच्या हाती असल्याची मोठी वदंता आहे. पुतीन अशा चाली रचण्यात पारंगत आहेत. बैठकीला उशिरा येणे, वाक्‍यरचना, देहबोलीतून कमालीचा आक्रमकपणा दाखवत निर्दयपणे बोलणी करण्याची पद्धत ते जगाला सुमारे १८ वर्षे दाखवत आहेत. पूर्वाश्रमीचे गुप्तचर असणारे पुतीन त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतात. जर्मनीच्या अँजेला मर्केल या कुत्र्यांना घाबरतात. त्यामुळे मागे त्यांच्यासोबतच्या एका बैठकीत पुतीन कुत्रे घेऊन आले होते. बोलणी सुरू करण्याआधीच बहुतेक वेळा पुतीन आपली बाजू भक्कम करून घेतात. कसलेल्या या राजकारण्याने, छंद म्हणून राजकारण निवडलेल्या ट्रम्प यांना फासात अडकवले आहे. पुतीन यांना अभिप्रेत असलेले सर्व काही ट्रम्प परवा बोलून गेले. ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे ब्रीद पुतीन यांच्यापुढे गळून पडले. सहकारी राष्ट्र आणि मित्रदेशांना धाब्यावर बसवत विरोधी गटात शिरण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांना ‘अमेरिका फर्स्ट’ कडून ‘अमेरिका एकाकी’ या प्रवासाकडे नेतो आहे. पुतीन यांचा उंट तंबूत आपणहून घेऊन ट्रम्प पुढील प्रवास अजून अवघड करून घेत आहेत.
जागतिक संदर्भांचा विचार करता पुतीन यांच्या राजकीय चाली अमेरिका आणि युरोपीय समुदायाच्या हिताला नख लावत आहेत. अमेरिकेत अंतर्गत आणि युरोपीय समुदायात बेबनाव होणे ही पुतीन यांच्या दृष्टीने मोठी सुखाची गोष्ट आहे. पुतीन यांच्या अशा घृणास्पद राजकारणाची लक्तरे जाहीरपणे वेशीवर टांगण्याची संधी ट्रम्प यांनी त्यांच्या भेटीत आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गमावली. बक्कळ पुरावे हाती असतानाही सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करून, उलटपक्षी पुरावे देणाऱ्या गुप्तचर संस्थांना मूर्ख ठरवत पुतीनच कसे बरोबर आहेत, अशी सारवासारव ट्रम्प यांनी केली. तपासनीस चोरीचा पुरावा देत असताना पोलिस अधिकारी स्वतःच चोराची काही चूक नसल्याची ग्वाही जाहीरपणे देतो यासारखे दुर्दैव नाही. त्यामुळे चोराची भीड चेपली जाते. अमेरिकेतील ट्रम्प यांचा विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष, हिलरी क्‍लिंटन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष, प्रसारमाध्यमे या ट्रम्प यांना चीड आणणाऱ्या मुद्द्यांना वैयक्तिक भेटीत स्पर्श करून पुतीन यांनी त्यांना झुलवल्याचे चित्र आहे. असे करून ट्रम्प आपल्याला अडचणीत आणणाऱ्या विषयांना बगल कशी देतील ही संधी पुतीन साधू पाहत होते. ती त्यांनी साधली. वादग्रस्त नेत्यांना भेटून, त्यांच्यावरील कारवाईचा फास घट्ट न करता फक्त पत्रकार परिषद आणि एकत्र छायाचित्राचा दाखला देण्याला मुत्सद्देगिरी समजली जात नाही. जमेल तितक्‍या विषयांवर एकवाक्‍यता साधत, औपचारिकपणे एकमेकांच्या चुकांची मांडणी करत, वादाच्या मुद्द्यांवर सामंजस्याची भूमिका एकत्रितपणे घेणे अशी ढोबळपणे मुत्सद्देगिरीची व्याख्या आहे. ती ट्रम्प यांच्या गावीही नाही. याचा प्रत्यय गेल्या महिन्यातील उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन आणि परवाच्या पुतीन यांच्या सोबतच्या ट्रम्प भेटीत ठळकपणे जाणवला. या दोन्ही देशांच्या प्रमुखांना चार गोष्टी ऐकवायचे सोडून, झाल्या-गेल्या गोष्टी विसरून, ट्रम्प यांनी त्यांना एका फटक्‍यात अमेरिकेच्या बरोबरीचे स्थान देत चर्चेचे आवतण दिले. अशाने त्यांच्या मागील सर्व कृत्यांकडे काणाडोळा केल्याचे चित्र आहे. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने हा ट्रम्प यांचा सरळसरळ ‘फाउल’ आहे. वेळ आणि प्रसंग आपल्या विरोधात जात असताना थेट अमेरिकेचा स्वामी आपली पाठराखण करतो याचा पुतीन यांना होणारा आनंद वेगळाच आहे. ट्रम्प यांनी दाखवलेल्या हिरव्या कंदिलामुळे पुतीन यांच्या धूर्त चालींना आणखी बळ मिळेल असे स्पष्टपणे दिसते. न सुधारल्यास ही चूक अमेरिकेला महाग पडेल. रशियाचा विचार करता, २०१८ च्या फुटबॉल विश्वकरंडकाच्या स्पर्धेचे आयोजन करतानाच, राजकीय पटावर पुतीन यांनी एक महत्त्वाचा ‘गोल’ नोंदवला आहे एवढे मात्र खरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com