"अ'शक्‍य! (पहाटपावलं)

Pahatpawal
Pahatpawal

अशक्‍य हा शब्द अनेकांच्या आवडीचा; आणि म्हणूनच खूप जवळचा असतो. एखादं काम किंवा कृती यांच्या पूर्ततेविषयी शक्‍यता व्यक्त करताना हा शब्द पुढं करून सुटका करवून घेता येते, असाही एक समज असतो. अशक्‍य हा शब्द कधी वापरलाच नाही किंवा निदान त्याचा विचारही केला नाही, असा माणूस सापडणे मात्र खरोखरच अशक्‍य आहे. अशक्‍य शब्दाची विभागणी "अ' आणि "शक्‍य' अशा दोन भागांत केली, तर या शब्दाची पळवाट आपण का शोधून काढतो, त्याचं उत्तर देताच येणार नाही. "शक्‍य' शब्दाला आपण "अ' जोडत नाही, त्याआधीची स्थिती आणि नंतरची स्थिती यांत खूपच अंतर आहे. अशक्‍य शब्दात "अ'चं स्थान त्या मानानं छोटं आहे; पण ते अक्षर परिणाम मात्र फारच मोठा करतं! "कदापि शक्‍य नाही' अशा नकारघंटेचा काळाकभिन्न अंधार ते क्षणांत उभारू शकतं; होत्याचं नव्हतं करतं. 
एखादं काम पूर्ण होण्याच्या शक्‍यतेबद्दल जेव्हा "अशक्‍य' हा शब्द वापरला जातो, त्यातील "अ' या अक्षराबद्दल आपण कधी विचार केला आहे? या "अ'मध्ये आपल्याला काय अभिप्रेत असतं? "अ'च्या पोत्यात आपण किती तरी गोष्टी ढकलून देतो. विशिष्ट काम का होणार नाही, त्याची कारणं शोधून-शोधून आपण "अ'मध्ये घुसडतो. ते सगळे कित्येकदा आपल्या मनाचे खेळ असतात. "आपल्याला तसं वाटतं,' यापलीकडं त्याला काही विशिष्ट स्पष्टीकरण नसतं. या "अ'ची एक सवय आहे. त्यात जे ढकलून द्याल, त्याला ते सामावून घेतं. साहजिकच त्याचा आकार भलामोठा होतो. मग "शक्‍य'लाही त्याची भीती वाटू लागते; आणि इथंच चित्र उलटं होतं. 
कुठलंही काम सुफळ-संपूर्ण करायचं असेल, तर या "अ'ची झाडाझडती घ्यायला हवी. आपण त्यात टाकलेलं काल्पनिक ओझं काढून टाकायला हवं. "काम शक्‍य नाही' असं सांगताना उगाचच फुगवलेला "अ'चा फुगा आकारानं कमी करायला हवा. असं करताच "शक्‍य' बाजूचं पारडं जड होऊ लागतं. "अ'ला आपणच बळ देतो आणि अपयशाची तजवीज करून ठेवतो. त्याच्याकडं दुर्लक्ष करा; म्हणजे "अशक्‍य' हा शब्द आपोआपच पराभूत होईल. 
या "अ'चं एक वेगळेपणही आहे. त्यातली एकेक कारण आपण पाहू लागलो, तर यशाकडं जाणाऱ्या अनेक वाटा त्यांतच दिसू लागतात. बंद दरवाजे खुले हाऊ लागतात; आणि प्रकाशाचा झगमगाट सर्व बाजूंनी धावत येऊन अंधाराला पळवून लावतो. कोणत्याही कामाबाबत "अशक्‍य' असं सांगण्याआधी थोडा विचार करा. "अ'मधून नवे, वेगळे मार्ग शोधा आणि "शक्‍यते'ची उंची अधिकाधिक उन्नत करीत न्या. मराठी भाषेच्या वर्णमालेतील "अ' हा पहिला स्वर आहे. रियाज करताना पहिला स्वरच बिघडवून कसं चालेल? "अ' या स्वराचा उत्तम रियाज करण्याचा संस्कार आपलं अवघं जीवन बदलून टाकू शकतो, नाही का? 
काय उत्तर आहे तुमचं? 
शक्‍य की अशक्‍य?  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com