आत्मभानाच्या टप्प्यावर विज्ञानाची मदत

आत्मभानाच्या टप्प्यावर विज्ञानाची मदत

महिलांच्या सक्षमीकरणातली पुढची आत्मभानाची पायरी गाठण्यात विज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. तेव्हा महिलांना वैज्ञानिक दृष्टी देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.

महिला आपली कौशल्ये व कष्टाच्या जोरावर चार पैसे कमवू लागल्या, म्हणजे त्यांचे सक्षमीकरण झाले, असे समजले जाते. कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीत महिला वाटा उचलू लागल्या, की त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबीयांचा दृष्टिकोन
बदलतो. कौटुंबिक निर्णयात त्यांचेही मत विचारात घेतले जाते. त्यामुळे आर्थिक कमाईद्वारे महिलांचे सक्षमीकरण होते हे खरे आहेच. पण घराबाहेर पडून जगात वावरायला लागल्यावर वेगळ्या विचारांची आणि संस्कृतींची ओळख होते, त्यातून आपला स्वतःचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलू लागतो, आत्मविश्वास वाढतो, स्वतःची बलस्थाने आणि मर्यादा यांचे भान येते, या टप्प्यापर्यंत महिला येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या सक्षमीकरणाच्या वाटेवर असतात.

यापैकी जी आर्थिक सक्षमीकरणाची पहिली पायरी आहे, तिथपर्यंतचा प्रवास तुलनेने सोपा आहे. महिला पैसे कमवू लागल्या की कुटुंबाचा आर्थिक बोजा हलका होईल, हे एकदा घरातील वडीलधाऱ्यांच्या आणि पुरुषमंडळींच्या ध्यानात आले, की स्रियांनी घराचा उंबरठाही ओलांडता कामा नये, वगैरे पारंपरिक धारणा वरवर बरीच कुरकुर
झाली, तरी शेवटी गुंडाळून ठेवल्या जातात. ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटाच्या चळवळीमुळे, बायका-बायका मिळून काम करणार आहेत, काम घरात बसूनच करायचे आहे, फक्त मीटिंगांसाठी वगैरे जावे लागेल, इ. युक्तिवाद करून पारंपरिकतेला मुरड घालणे शक्‍य होते. शहरी मध्यमवर्गीय स्रियांनी ही लढाई गेल्या शतकातच जिंकली आहे. या वर्गातील मुलींना शिकणे आणि नोकरी-व्यवसाय करणे यासाठी फार झगडावे लागत नाही. अर्थात, महिलांसाठी जे शिक्षण आणि जे नोकरी-व्यवसाय योग्य मानले गेले आहेत, त्याच्यापेक्षा वेगळे काही करायचे असेल, तर अजूनही लढावे लागते. पण अशा प्रकारचा लढा चाकोरीबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषांनाही द्यावा लागतो.
महिलांची आर्थिक सक्षमीकरणाकडे येण्याची वाट काहीअंशी सुकर करण्याचे काम तंत्रज्ञानाने केले आहे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. इलेक्‍ट्रॉनिक सर्किट्‌स बनविण्यासाठी नाजूक काम करू शकणाऱ्या बोटांची गरज, टेलिफोन
यंत्रणांना आवश्‍यक वाटलेली मधुर आवाजाच्या ऑपरेटरची गरज इथपासून ते शिवण मशिन, शेवया-कुरडया करण्याची यंत्रे आदींची उपलब्धता यापर्यंत अनेक कारणांनी महिलांना घराची घडी फार मोडू न देता घराबाहेर पडण्याच्या शक्‍यता निर्माण करून दिल्या. याबद्दल बरेच काही लिहिले-बोललेही गेले आहे. पण सक्षमीकरणातली पुढची आत्मभानाची पायरी गाठण्यात विज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे, याचा फार विचार झालेला नाही.

महिलांना दुर्बल बनवून ठेवण्याच्या वेगवेगळ्या अंगांनी होणाऱ्या पारंपरिक प्रयत्नांमध्ये अंधश्रद्धा हे एक महत्त्वाचे अस्त्र होते आणि आहे. त्यामुळे पारंपरिक अंधश्रद्धा महिलांवर रोखलेल्या आहेत आणि त्यांचा पगडाही महिलांवरच जास्त आहे. उदा. देवी अंगात येणे. बऱ्याचशा अंधश्रद्धा या महिलांनी केव्हा व कुठे जावे किंवा जाऊ नये, विशिष्ट वेळी (उदा. मासिक पाळीच्या काळात किंवा सूर्य व चंद्रग्रहणाच्या कालावधीत इ.) काय करावे किंवा करू नये, काय खावे-प्यावे किंवा नाही, आदी गोष्टींशी निगडित आहेत. आपल्या वागण्यामुळे कोणताही दैवी किंवा अतिंद्रिय शक्तींचा प्रकोप आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होऊ नये, या कायमच्या दडपणाखाली महिला राहिल्या, तर त्यांना असुरक्षित वाटत राहते, स्वतःच्या निर्णयक्षमतेवर त्यांचा विश्वास राहत नाही, कुटुंबातील पुरुषांवरचे त्यांचे अवलंबित्व त्यामुळे शाबूत राहते. ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तरी अंधश्रद्धांच्या पगड्यातून अजूनही बाहेर आलेल्या नाहीत.

पण आजच्या आधुनिक जगात अशा अंधश्रद्धा फक्त अशिक्षित, अडाणी लोकांमध्येच असतील, सुशिक्षित महिलांचे सक्षमीकरण झाले आहे आणि त्यामुळे अंधश्रद्धांच्या जोखडातूनही त्या सुटल्या असतील, असे कोणाला वाटत असेल, तर तो गोड गैरसमज आहे. उलट आता जुन्या अंधश्रद्धांच्या जोडीला नव्या अंधश्रद्धा येत आहेत.
जग जेव्हा 21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर होते, तेव्हा नवे शतक हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे शतक आहे, असे म्हणण्याचा प्रघात होता. पण आज 2018मध्ये मात्र अंधविश्वासाचे आणि छद्मविज्ञानाचे शतक म्हणून भावी पिढ्या या शतकाकडे पाहतील की काय, असे वाटू लागले आहे. विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करणाऱ्या भाकडकथांनी आधी प्रसारमाध्यमांमध्ये आणि आता समाजमाध्यमांमध्येही धुमाकूळ घातलेला आहे. या भाकडकथा अनेक प्रकारच्या आहेत, पण विशेषतः "काहीतरी तोंडाला नाही तर अंगाला फासा, अमुक गोष्टी खा, प्या, म्हणजे तुम्ही गोऱ्या होणार, शिडशिडीत बनणार, आकर्षक दिसणार' इ. स्वरूपाचे संदेश महिलांकडून चटकन उचलले जात आहेत. "आपल्या मुलांना अमुकतमुक खायला किंवा प्यायला द्या, म्हणजे ती उंच होतील, निरोगी होतील, तल्लख बुद्धीची
होतील,' अशा प्रचारांना बळी पडून बिचाऱ्या मुलांवरही अनेक गोष्टींचा मारा केला जातो आहे. हा प्रत्येक संदेश एका तथाकथित वैज्ञानिक स्पष्टीकरणासह येत असतो. केवळ व्हिटॅमिन, ऊर्जेच्या लहरी इत्यादी वैज्ञानिक संज्ञा वापरल्या असतील आणि आइनस्टाईन, "नासा' इत्यादी नावांची साक्ष म्हणून पेरणी केली असेल, तर कितीही अतार्किक गोष्ट खरी मानली जाते ही चिंताजनक बाब आहे. कोणत्याही प्रकारची कसलीही चिकित्सा न करता, माहितीची सत्यासत्यता पडताळून न पाहता, जाहिरातीत आपला आवडता नट किंवा नट किंवा पांढरा कोट घातलेले कुणीतरी सांगत आहेत किंवा "व्हॉट्‌सअप'वर किंवा "फेसबुक'वर आपल्या जिवलग मैत्रिणीने वाचून पुढे ढकललेला संदेश आहे, तेव्हा हे खरेच असले पाहिजे, असा विचार जोवर स्त्रिया करत आहेत, तोवर त्या सक्षम झाल्या असे म्हणता येणार नाही.

एकंदरीतच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किक विचार करण्याच्या क्षमतेचा अभाव आहे आणि त्यामुळे महिला, पुरुष, आबालवृद्ध आज छद्मविज्ञानाच्या भजनी लागलेले दिसतात. पण मुलांच्या वैचारिक जडणघडणीत घरात आई आणि शाळेत शिक्षक यांचा महत्त्वाचा वाटा असतो आणि आज शाळांमध्ये बहुसंख्य शिक्षक महिला आहेत. म्हणून महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हा त्यांना स्वतःला तर मारक आहेच, शिवाय भावी पिढीच्या दृष्टीनेही चिंताजनक आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कामही अजून संपलेले नाही. पण जिथे हे यश मिळाले आहे, तिथे या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण, तसेच शहरी महिलांना वैज्ञानिक दृष्टी देण्यासाठी आता युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com