मरण कल्पनेशी सुरू तर्क कायद्याचा

rajashri kshirsagar
rajashri kshirsagar

असाध्य आजार असताना उपचार थांबवणे, जीवरक्षक साधनांचा वापर न करणे वा चालू असल्यास तो थांबवणे अशा स्वेच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली आहे. न्यायालयाची ही भूमिका स्वागतार्ह आहे.

क विवर्य ग. दि. माडगूळकर यांनी ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ अशा सुरेख काव्यपंक्‍ती लिहिल्या असल्या, तरी (त्यांची क्षमा मागून) ‘मरण कल्पनेशी सुरू तर्क जाणत्याचा’ असे आता म्हणता येईल. कारण सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छामरण/ दयामरण (इंग्रजीत पॅसिव्ह युथनेशिया) या संकल्पनेला कायदेशीर मान्यता दिली आहे. माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्‍क आहे, मग सन्मानाने मरण्याचा हक्‍क का नसावा? या तर्कसुष्ट विचारातून सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याच भूमिकेतून वैद्यकीय उपचार न करण्याबाबतचे व्यक्‍तीचे वैद्यकीय इच्छापत्र (लिव्हिंग विल)देखील न्यायालयाने मान्य केले आहे. न्यायालयाची ही भूमिका स्वागतार्ह आहे.

मृत्यूविषयीची चर्चा करणे म्हणजे काहीतरी वाईट, अमंगल बोलणे या भूमिकेतून बाहेर पडून या विषयामागील तात्त्विक विचार समजून घेतला पाहिजे. ‘मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते, अद्य वाडब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुव:’ असे भागवतात म्हटले आहे. - हे वीरा, ज्यांनी जन्म घेतला, त्यांच्या देहाबरोबरच मृत्यूही उत्पन्न होत असतो. आज असो किंवा शंभर वर्षांनी असो, प्राण्यांना मृत्यू हा निश्‍चित आहे, असा याचा अर्थ आहे. म्हणजेच जन्म आणि मृत्यू यांचा प्रवास हातात हात घालूनच सुरू होतो. जन्माची चर्चा अमंगल ठरत नाही, त्याचप्रमाणे मृत्यूची चर्चा करणेही अमंगल नाही. आजारी व्यक्‍तीला उपचार घेणे बंधनकारक असावे काय, उपचार घेत जगण्याची सक्‍ती का असावी, दुर्धर व वेदनादायी आजार असेल तर रुग्णाने उपचार थांबवून धैर्याने मृत्यू स्वीकारण्यास हरकत का असावी, या प्रश्‍नांमधून इच्छामरणाची चर्चा सुरू झाली.

इंग्रजी शब्दकोशातील Euthanasia हा शब्द ग्रीक भाषेतून इंग्रजी भाषेत आला. Eu म्हणजे चांगले आणि thanatos म्हणजे चांगला मृत्यू. ऑगस्ट्‌स राजाने शरीराला वेदना होऊ नयेत यासाठी मरण स्वीकारले होते, तेव्हा त्या संदर्भात इतिहासतज्ज्ञ Suetonius यांनी Euthanasia हा शब्द प्रथम वापरला होता. असाध्य व वेदनादायी आजार असताना रुग्णाला वेदना होणार नाहीत अशा प्रकारे त्याचा मृत्यू घडवून आणणे म्हणजे युथनेशिया. याचे दोन प्रकार आहेत. डॉक्‍टरांच्या विशिष्ट कृतीमुळे (उदाहरणार्थ इंजेक्‍शन देऊन) रुग्णाचा मृत्यू घडून येणे म्हणजे ‘ॲक्‍टिव्ह युथनेशिया’, तर रुग्ण आजारी असताना वैद्यकीय उपचार थांबवणे, जीवरक्षक साधनांचा वापर न करणे वा चालू असल्यास तो थांबवणे हा ‘पॅसिव्ह युथनेशिया’ होय. सर्वोच्च न्यायालयाने ‘पॅसिव्ह युथनेशिया’ला मान्यता दिलेली आहे. मराठीत ‘पॅसिव्ह युथनेशिया’बाबत स्वेच्छामरण व दयामरण असे शब्द समानार्थी वापरले जातात. ‘पॅसिव्ह युथनेशिया’बाबतचा निर्णय रुग्णाने स्वतः घेऊन वैद्यकीय उपचार चालू न करण्याची अथवा चालू उपचार थांबवण्याची विनंती रुग्णाने स्वतः वैद्यकीय तज्ज्ञांना व नातेवाइकांना करणे म्हणजे रुग्णाच्या संमतीने घडून येणारा मृत्यू हा ‘व्हॉलेन्टरी युथनेशिया’ होय. उपचारांबाबत निर्णय घेण्याच्या स्थितीत नसलेल्या/कोमात असलेल्या रुग्णावरील उपचार (रुग्णाच्या परवानगीशिवाय) त्याच्या जवळच्या नातेवाइकांनी व वैद्यकीय तज्ज्ञांनी परस्परसंमतीने थांबवणे व रुग्णाचा नैसर्गिक मृत्यू होऊ देणे म्हणजे ‘नॉन व्हॉलेन्टरी युथनेशिया’ होय. याशिवाय सन्मानपूर्वक मरण्याचा हक्‍क (राइट टू डाय विथ डिग्निटी) असाही एक प्रकार आहे. त्यात असाध्य रोगाने ग्रासलेल्या व तीव्र वेदना भोगणाऱ्या रुग्णाला विशिष्ट अटींचे कायदेशीर मार्गाने पालन करून, वैद्यकीय परवानगी मिळवून प्राणघातक औषधांचे सेवन स्वहस्ते करून आपल्या आयुष्याचा शेवट घडवून आणता येतो.

युथनेशियाची चर्चा चालू होण्यामागे माणसांचे वाढलेले आयुर्मान आणि वैद्यकीय क्षेत्रात, तसेच विज्ञान- तंत्रज्ञानात झालेली प्रगती ही दोन मोठी कारणे आहेत. अलीकडच्या काळात सर्वसामान्य नागरिक आरोग्याबाबत बऱ्याच प्रमाणात जागरूक झालेले आहेत. त्यातच नवनवीन औषधे, आरोग्यसेवेतील सुधारणा, नवनवीन उपकरणे, साधने यांमुळे अनेक आजारांवर मात करणे आणि व्याधी आटोक्‍यात ठेवणे शक्‍य झाले आहे. व्हेन्टिलेटर, हार्ट-लंग मशिन, पोटात नळी घालून अन्न देण्याची सुविधा या बाबी आता परिचयाच्या झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचविण्याचे आणि मृत्यू पुढे ढकलण्याचे प्रयत्न करता येतात. असे असले तरी अनेक आजार पूर्णपणे बरे करणे शक्‍य नसते. शिवाय, सर्व उपचारांनंतरही रुग्णाची शारीरिक स्थिती सर्वार्थाने चांगली राहील याची खात्री नसते. रुग्णाच्या शरीराचा प्रतिसाद कसकसा मिळेल ते पाहून पुढील उपचार करावे की न करावे, असा प्रश्‍न वैद्यकीय तज्ज्ञांपुढे उभा ठाकत असतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णाला जीवनदान देणे हे तज्ज्ञांचे प्राथमिक व नैतिक कर्तव्य आहे, तर दुसरीकडे, असाध्य आजार असल्याने रुग्णावर उपचार करणे व्यर्थ आहे किंवा रुग्णाला मोठे परावलंबित्व येण्याची शक्‍यता आहे, हे दिसूनही तज्ज्ञांना वैद्यकीय उपचार थांबवता येत नाहीत. कारण रुग्णाला वाचविणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. शिवाय, या सर्व बाबींवर किती खर्च करण्याची रुग्णाची व त्याच्या नातेवाइकांची तयारी आहे, याचाही विचार संबंधितांना करणे भाग पडते. अशा अनेक कारणांमुळे उपचार करण्यावर बंधने येऊ शकतात. याशिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला हे सर्व उपचार स्वतःवर करवून घ्यायचे आहेत किंवा नाहीत, त्या प्रक्रियेत होणारा शारीरिक व मानसिक त्रास त्याला सोसायचा आहे किंवा नाही, याचाही विचार होणे अपेक्षित आहे. अनेकदा रुग्णाला गृहीत धरून त्याच्यावर उपचार केले जातात किंवा रुग्ण स्वतः सांगण्याच्या स्थितीत नसतो, म्हणूनही उपचार केले जातात. व्यक्‍तीची ‘लिव्हिंग विल’ इथे महत्त्वाची ठरते. वैद्यकीय उपचारांबाबत करा व करू नका असे यात लिहिलेले असते (उदाहरणार्थ व्हेंटिलेटर लावू नये). रुग्णाची, त्याच्या नातेवाइकांची आणि वैद्यकीय तज्ज्ञांची या सर्वांची अडचणीची परिस्थिती ‘लिव्हिंग विल’मुळे दूर होऊ शकते. शांत मनाने मृत्यूचा विचार व चर्चा करून ‘लिव्हिंग विल’ करून ठेवली, तर नजर रोखूनी नजरेमध्ये मृत्यूलाही द्यावे उत्तर असे धैर्य त्या व्यक्‍तीला आणता येईल. आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे, हे समजून घेऊन प्रत्येकाने विचारपूर्वक ‘लिव्हिंग विल’ करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com