पाकिस्तानचा मुखभंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन भारताने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळविली हे यश आहे; मात्र संकट पूर्णपणे दूर झालेले नाही. जाधव यांच्या सुटकेसाठी अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे, याचे भान विसरता कामा नये.

भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांना पाठीशी घालण्यापासून, भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यापर्यंत अनेक घातपाती कारवायांनी हात बरबटलेले असले तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर सभ्यतेचा मुखवटा धारण करण्याची गरज पाकिस्तानला नेहमीच वाटत आली आहे. त्या देशाचे मुलकी सरकार तसे प्रयत्नही करत असते. कमालीच्या परस्परावलंबी अशा आजच्या जगात आर्थिकच नव्हे, तर सर्वच क्षेत्रातील परस्परसहकार्य ही बाब कळीची असल्याने पाकिस्तानला तसे करणे भागही होते; परंतु, माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जो निकाल दिला, त्याने पाकिस्तानी चेहऱ्यावरच्या या रंगसफेदीचा वर्ख पार उडवून लावला आहे आणि त्याचे खरे भेसूर रूप जगासमोर आणले आहे.

पाकिस्तानच्या बेजबाबदार आणि खोटेपणाच्या वर्तनाविषयी भारत जे जगाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करीत आला आहे, ते वास्तव आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोचण्याचा मार्ग या निकालामुळे आणखी प्रशस्त झाला. या अर्थाने भारताला मिळालेले हे महत्त्वाचे राजनैतिक यश आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ज्या पद्धतीने जाधव यांच्यावरील हेरगिरीच्या आरोपाचा हा खटला चालविला, त्यात न्यायाची सगळी तत्त्वे आणि संकेत अक्षरशः पायदळी तुडविले होते. व्हिएन्ना करारानुसार आरोपीला उच्चायुक्तालयाशी संपर्क करू देणे संबंधित देशावर बंधनकारक आहे. त्याचे पालन पाकिस्तानने केले नव्हते. भारताने अधिकृतरीत्या किमान 18 वेळा तशी विनंती पाकिस्तान सरकारला केली होती. ही दडपशाही खपून जाईल, अशा मस्तीत असलेल्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि लष्करालाही आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाने दणका दिला. "आमच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय न्यायालयाला नाही,' असा उद्दाम पवित्रा अद्यापही तो देश घेत असून तिथल्या कट्टरवाद्यांनी कुलभूषण जाधव यांना तत्काळ फाशी द्या, अशी ओरड सुरू केली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामुळेच ही नाचक्की झाल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात रान पेटवणेही सुरू झाले आहे. पण या सगळ्यातून तो देश आंतरराष्ट्रीय समुदायाला स्वतःविषयी बरेच काही सांगत आहे!

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीस आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळविणे, हे यश आहे. परंतु, हे यश म्हणजे जणू काही जाधव यांची सुटकाच आहे आणि आता फक्त त्यांचे भारतात स्वागत करणेच काय ते बाकी आहे, असा जो अर्थ काहींनी लावलेला आहे, तो गैर आहे. कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताला आणखी बरेच झगडावे लागणार आहे, याचे भान सोडता कामा नये. कायदेशीरदृष्ट्या आपण योग्य मार्गावर असल्याचे भारताने या सगळ्या सुनावणीदरम्यान दाखवून दिले आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे; परंतु ही स्थगिती म्हणजे अंतिम निकाल नव्हे. दुसरे म्हणजे पाकिस्तान हा कमालीचा बेभरवशी देश आहे. तेथील लष्कर हे नेहमीच मुलकी सरकारला आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. कुलभूषण जाधव यांचे निमित्त करून ते आपली पकड आणखी मजबूत करू पाहणार, हे उघड आहे. त्यामुळेच जाधव यांच्यावरील संकट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी फार कौशल्याने आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतील. सर्वात प्राधान्याची बाब म्हणजे उच्चायुक्तालयाशी जाधव यांना संपर्क साधू देण्याच्या मागणीचा भारताला पाठपुरावा करावा लागेल. हेगच्या न्यायालयाने जाधव यांच्याशी संबंधित प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही कळविण्याचा पाकिस्तानला आदेश दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला धुडकावून जाधव यांच्याबाबतीत मनमानी करण्याचे ठरविले, तर पाकिस्तानसारखा देश ते करूही शकतो; परंतु त्यामुळे त्या देशाच्या उरल्यासुरल्या प्रतिमेच्याही ठिकऱ्या उडतील. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान तसे करणार नाही, असे मानण्यास जागा आहे. आता मिळालेल्या संधीचा भारत किती उत्तमरीत्या उपयोग करून घेतो, हे पाहायचे.

Web Title: Editorial regarding Pakistan