उत्तुंग आकांक्षा

spacex
spacex

उद्यमशीलता, उत्स्फूर्तता आणि उपक्रमशीलता आणि यांना ज्या व्यवस्थेत मोकळे ‘अवकाश’ मिळते, तेथे प्रगतीची क्षितिजे कशी गाठली जातात, याचा प्रत्यय अमेरिकेत अनेकदा येतो. एखादा उद्योगसम्राटही अवकाश यान अंतराळात पाठविण्याची उत्तुंग महत्त्वाकांक्षा बाळगतो, हे त्याचे लखलखीत उदाहरण म्हणावे लागेल. मंगळावर पहिली खासगी मोहीम आखण्याच्या दृष्टीने ‘स्पेस एक्‍स’ने या अवकाश संशोधन क्षेत्रातील खासगी कंपनीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यांच्या ‘फाल्कन हेवी’ या जगातील सर्वांत शक्तिशाली प्रक्षेपकाची चाचणी यशस्वी झाली. अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी सर्वांधिक खर्च त्याच्या प्रक्षेपकावर येतो. प्रक्षेपकाचा फेरवापर करता येत नसल्याने तो वाढतो. त्यावर उपाय म्हणून फेरवापर करता येणारा प्रक्षेपक तयार करण्याचा प्रयत्न ॲलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्‍स’ कंपनी मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होता. त्या प्रयत्नांना यश आले आहे.

भविष्यकाळातील चांद्र व मंगळ मोहिमांसाठी हा प्रक्षेपक वापरण्यात येणार आहे. भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी तयार करण्यात आलेला गणवेश घातलेला एक पुतळा आणि टेस्ला रोडस्टर ही अलिशान मोटारही अवकाशात पाठविण्यात आली. या मोटारीत आयझॅक असिमॉव्ह यांच्या विज्ञान कादंबऱ्या, ‘स्पेस एक्‍स’च्या सहा हजार कर्मचाऱ्यांची नावे, तसेच माहिती संकलित करण्यासाठी उपयोगी ठरणारी आधुनिक उपकरणेही बसविण्यात आली आहेत. सर्वकाही सुरळीत पार पडले, तर ४० कोटी किलोमीटरचे अंतर पार करून ही मोटार सूर्याभोवतीच्या अंडाकार कक्षेत पोचेल आणि पृथ्वी व मंगळाच्या दरम्यान फिरत राहील. अमेरिका पुन्हा एकदा चांद्रमोहीम आखण्याच्या तयारीत आहे. त्यात ‘फाल्कन हेवी’ या प्रक्षेपकाचा वापर करण्यात येणार आहे. ॲलन मस्क यांची महत्त्वाकांक्षा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. फाल्कन हेवीपेक्षा अधिक शक्तिशाली ‘बिग फाल्कन रॉकेट’ तयार करून त्याच्या साह्याने मंगळावर याने पाठवून तेथे मानवी वसाहत वसविण्याची त्यांची योजना आहे. ‘फाल्कन हेवी’मुळे अधिक वजनाच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे दार खुले झाले आहे. अवकाशातील स्पर्धा आता वाढत जाणार हे मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com