महानायक ते खलनायक !

महानायक ते खलनायक !

झिंबाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे (वय ९३)  यांना लष्कर, पदच्युत उपाध्यक्ष यांनी सत्तेवरून  घालविण्याचा निर्धार केला आहे. मुगाबे संस्थापक असलेल्या ‘झिंबाब्वे आफ्रिकन नॅशनल युनियन’ (पॅट्रियॉटिक फ्रंट) पक्षानेही त्यांच्या हकालपट्टीचे सूतोवाच केले. आता त्यांना बडतर्फही करण्यात आल्याचे ताजे वृत्त आहे. लष्कराने मुगाबे यांची नजरकैद तात्पुरती उठवून त्यांना सन्मानाने सत्ता सोडण्याची संधी दिली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपर्यंत सत्तेवर राहायचे व नंतर आपली पत्नी ग्रेस मुगाबे यांच्याकडे पक्ष व देशाचे नेतृृत्व सोपवायचे, हा मुगाबे यांचा मनसुबा उधळून लावण्याचा निर्धार त्यांच्या विरोधकांनी केला आहे. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृृत्व करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे मुगाबे दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषी राजवटीविरुद्ध लढणाऱ्यांचेही प्रेरणास्रोत बनले होते. नेल्सन मंडेला यांनी अध्यक्षपदाची एक टर्म झाल्यानंतर सत्ता आधी थाबो एम्बेकी व नंतर जेकब झुमा यांच्याकडे सोपविली. मंडेला तहहयात अध्यक्ष राहू शकले असते. परंतु त्यांना सत्तेचा मोह नव्हता. अल्पसंख्याक गोऱ्यांकडून सत्ता कृष्णवर्णीयांकडे आल्यानंतर त्यांनी दोन्ही गटांतील सामंजस्य व सहकार्यावर भर देत देशाला यादवीपासून दूर ठेवले. मुगाबे यांना आपल्या शेजारचे हे उदाहरण अनुकरणीय वाटले नाही.

सत्ता, संपत्ती, प्रसिद्धीची हाव, तसेच आपण मर्त्य आहोत याचा मुगाबेंना विसर पडला. देशासाठी भोगलेला अकरा वर्षांचा तुरुंगवास, सत्ता मिळविल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत केलेले चांगले काम हे त्यांच्या सत्तेच्या हव्यासामुळे जनतेच्या विस्मृतीत गेले. मंडेला यांच्याप्रमाणे विचार केला असता तर आयुष्याच्या संध्याकाळी नजरकैदेची, पदच्युतीची वा स्वतः स्थापन केलेल्या पक्षाकडून हकालपट्टीची वेळ आली नसती.

भारतापाठोपाठ अनेक देश युरोपियनांच्या वसाहतवादापासून स्वतंत्र झाले. दक्षिण आफ्रिकेत स्वातंत्र्यलढा सर्वांत आधी सुरू होऊनही सर्वांत शेवटी तो गोऱ्यांच्या मिठीतून मुक्त झाला. ज्योमो केन्याटा, केनेथ कौंडा, ज्युलिअस न्येरेरे या नेत्यांनी आपापल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे व नंतर देशाचे नेतृृत्व केले. मंडेलांप्रमाणेच तेही जनतेचे महानायक होते. दुसरीकडे सत्तेला चिकटून राहण्याचा मुगाबे यांचा सोस.यामुळे जनतेला ते नकोसे झाले. मंडेला यांच्या पत्नी विनी याही महत्त्वाकांक्षी होत्या. परंतु मंडेला यांनी त्यांची पाठराखण केली नाही. मुगाबे यांनी मात्र टायपिस्ट असलेल्या आपल्या दुसऱ्या पत्नीला पक्ष व देशावर लादण्याचा प्रयत्न केला. 

मुगाबे यांची कारकीर्द, विशेषतः २००८ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अधिकाधिक वादग्रस्त ठरली. त्याही आधी २००० मध्ये गोऱ्या अल्पसंख्याकांकडील एक कोटी ५५ लाख हेक्‍टर शेतजमीन भरपाई न देता काढून घेऊन कृष्णवर्णीयांना वाटण्याची त्यांची योजना गैरप्रकाराने फसली. राजकीय नेते, कार्यकर्ते, लष्करी व मुलकी अधिकाऱ्यांनी चार लाख एकर जमीन बळकावली. झिंबाब्वे हा आफ्रिका खंडाचे धान्याचे कोठार म्हणून ओळखला जायचा. अल्पसंख्याक गोरे मूळचे ब्रिटिश. त्यामुळे ब्रिटन, युरोपीय संघ व पाश्‍चात्यांचा प्रभाव असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचा मुगाबेंवर कोप झाला. शेती हा कणा असलेला हा देश भुकेकंगाल, कर्जबाजारी झाला. दीड कोटी लोकसंख्येतील चाळीस लाख लोकांनी देशातून पलायन केले. मुगाबेंना आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष्य करण्यात आल्याने ते अधिकाधिक दुराग्रही, आक्रमक होत गेले. असुरक्षिततेतून त्यांच्यात एकाधिकारशाही प्रवृत्ती वाढत गेली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा महानायक खलनायक ठरला. 

आफ्रिका खंडात चीनने सर्वाधिक गुंतवणूक केली असून, त्याचा व्यापारही सर्वांत जास्त आहे. मुगाबे यांच्या विरोधात लष्कराने कारवाई केली, त्याच्या आदल्या आठवड्यात झिंबाब्वेचे लष्करप्रमुख चीनला गेले होते. आपली गुंतवणूक असलेल्या देशांच्या अंतर्गत बाबींत चीन हस्तक्षेप करीत नाही, असा दावा केला जायचा. आता चीन आपले आर्थिक, सामरिक हितसंबंध जपण्यासाठी सक्रिय होऊ लागला आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये नैसर्गिक स्रोतांवर ताबा मिळविताना चीनने नेते व नोकरशाहीला भ्रष्ट केले आहे. आपली प्यादी सत्तेवर बसवून अधिकाधिक लाभ मिळविण्यासाठी चीन आता सत्तांतरातही हात अजमावून पाहात असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देश वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त होत गेले. बऱ्याच देशांत स्वातंत्र्यलढ्यातील नेते सत्तेवर आले. परंतु पाच - दहा वर्षांतच तेथील लोकशाही व्यवस्था अस्थिर बनली. अनेक देशांत लष्करी उठाव, यादवी झाली. पण भारतात सत्तर वर्षांत नियमित निवडणुका व शांततापूर्ण सत्तांतराची परंपरा पुढे चालू राहिली. याचे कारण स्वातंत्रलढ्यातील नेत्यांनी लोकशाही मूल्यांची जोपासना केली. जवाहरलाल नेहरूंनी सतरा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या काळात संसदीय लोकशाही रुजविली. लोकशाहीच्या मजबुतीसाठी पूरक संस्थांची उभारणी केली. अनेक धर्म, जातीपातींनी विभागलेल्या, सरंजामी मानसिकतेत अडकलेल्या मागास देशात लोकशाही मूल्ये रुजविण्याचे अवघड काम झाले. त्यामुळेच अनेक पेचप्रसंग येऊनही देश कोसळला नाही. आशिया व आफ्रिकेतल्या अनेक देशांत वैचारिक प्रगल्भता व निष्ठा, चिकाटीने काम करणाऱ्या नेतृृत्वाचा अभाव असल्यामुळे त्यांची दैना झाली. आफ्रिकेतील स्वातंत्र्यलढ्यातील नेतृृत्वाने महात्मा गांधींना प्रेरणादायी मानले. मात्र स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या नेतृृत्वाखाली भारतात झालेल्या पायाभरणीचे त्यांनी अनुकरण केले नाही. त्याची किंमत ते मोजत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com