शालेय स्तरावरील विज्ञानशिक्षणाची त्रिसूत्री

school
school

स्वतंत्रपणे विचार करणारी आणि कार्य करणारी व्यक्ती बनविणे, हे शिक्षणाचे ध्येय असायला हवे, असे अल्बर्ट आईन्स्टाइन यांनी म्हटले होते. विज्ञानशिक्षणाचा उद्देश वैज्ञानिक माहितीचे आकलन होणे, तिचे विश्‍लेषण करणे आणि त्या आधारे योग्य शिक्षणापर्यंत पोचणे हा असायला हवा. पण सध्या शालेय स्तरावर काय चित्र दिसते? अभ्यासक्रमात जास्तीत जास्त "कंटेंट'वर भर देण्याचा प्रयत्न शाळांमधून होताना दिसतो. प्रयोगशाळा मात्र कमी कमी होत आहेत.(काही अपवाद वगळता) त्यामुळे माहिती वाचायची आणि ती लक्षात ठेवायची, असे अभ्यासाचे स्वरूप बनते आणि त्यामुळे विज्ञान शिकणे आणि शिकविणे कंटाळवाणे वाटू शकते. हे चित्र बदलायला हवे. त्यासाठी विज्ञानशिक्षणाचे प्रारूप बदलणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाला शास्त्रज्ञ व्हायचे नसते; पण विज्ञानशिक्षणातून जी दृष्टी मिळते, ती सगळ्यांनाच उपयोगाची असते. युनेस्कोनेदेखील "सर्वांसाठी विज्ञान-तंत्रज्ञान साक्षरता' हे ध्येय स्वीकारले आहे. विज्ञानाशी संबंधित अनेक बाबी अशा असतात, की त्यांना सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्व असते. उदाहरणार्थ, अणुऊर्जा प्रकल्पांचे ठिकाण किंवा धरणांची उंची, यासारखे विषय. अशा गोष्टींचे स्वतंत्रपणे आकलन करून घेण्याची क्षमता प्रत्येक नागरिकाकडे असणे ही एक गरज आहे. त्याचबरोबर ज्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी पुरेशी पायाभरणी करणे हाही शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानशिक्षणाचा उद्देश असायला हवा.

कोणत्याही पाठ्यक्रमातून त्या त्या विषयाबद्दल विद्यार्थ्यांत रूची निर्माण होणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जागी करणे, मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आणि या सगळ्यांतून त्यांना आनंद घेता येणे, अशा प्रकारच्या शिक्षणातून खरे ज्ञान मिळते.

शालेय शिक्षणात विज्ञानाची प्रभावीपणे रुजुवात करण्यासाठी त्रिसूत्री प्रारूपाची आवश्‍यकता आहे. वर्गातील पारंपरिक पद्धतीचे शिक्षण हा एक धागा झाला. पण त्याचा उद्देश केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि परीक्षेची तयारी करणे असा नसावा, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍न विचारण्याच्या वृत्तीला त्यात प्रोत्साहन द्यायला हवे. शिवाय शिक्षकांनी त्यांना अधूनमधून प्रश्‍न विचारून विद्यार्थ्यांना विषय समजला आहे किंवा नाही, याची चाचपणी करायला हवी. दुसरा महत्त्वाचा धागा आहे तो प्रयोगशाळेतील शिक्षणाचा. साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत विज्ञान-तंत्रज्ञान या विषयाच्या शिक्षणात जो बदल करण्यात आला, तो लक्षात घेण्यासारखा आहे. त्या काळात अमेरिका व तत्कालीन सोव्हिएतसंघराज्य यांच्यात शीतयुद्ध शिगेला पोचले होते. चार ऑक्‍टोबर 1957 रोजी जगात पहिल्यांदा उपग्रहाचे (स्पूटनिक) प्रक्षेपण करून सोव्हिएत संघराज्याने अमेरिकेवर कुरघोडी केली. याचा अमेरिकेला चांगलाच धक्का बसला. त्यांनी आत्मपरीक्षण केले. त्याचा एक भाग म्हणजे विज्ञानाच्या शिक्षणात त्या देशाने आमूलाग्र बदल केले. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे "प्रयोगातून शिक्षण' यावर शालेय शिक्षणपद्धतीत भर दिला. विज्ञानातील संकल्पनांच्या आकलनास ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. त्यांचे समग्र आकलन होते. अलीकडे आपल्या केंद्र सरकारने "अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज' या नावाचा कार्यक्रम तयार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची संस्कृती (इनोव्हेशन) बिंबवणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच डिझाईन माईंडसेट, कम्प्युटेशनल थिंकिंग आणि ऍडेप्टिव्ह लर्निंग इ. कौशल्ये अंगी बाणवणे हाही हेतू आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील उपकरणे नि सुविधा वापरून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयांतील संकल्पना शिकण्याची संधी मिळणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स, रोबोटिक्‍स, सेमीकंडक्‍टर बोर्डस, सेन्सर्स, थ्री डी प्रिंटर्स व कॉम्प्युटर या बाबतीत प्रयोग करता येतील. पात्र शाळांना सुरवातीला पाच लाख रुपये आणि नंतर पाच वर्षांसाठी दरवर्षी दहा लाख रुपये अशी मदत देण्याची योजना आहे.
तिसरा धागा म्हणजे फिल्ड व्हिजिट. विद्यार्थ्याला प्रश्‍न पडतो : "मी जे शिकतो आहे, त्याचा उपयोग काय?' तो पडणे स्वाभाविकही आहे. विद्यार्थांना जर उद्योगांमध्ये, संशोधन प्रयोगशाळांमध्ये नेले तर प्रत्यक्ष आयुष्यात शिक्षणाचा उपयोग कसा होतो, हे त्यांना समजेल. शिक्षणाचा आणि बाहेरच्या जगाचा काय संबंध आहे, याचीही नेमकी कल्पना त्यांना येईल. शिवाय त्यामुळे शाळेतील शिक्षणाबद्दलची त्यांची आस्थाही वाढू शकते. हे सगळे घडविण्यासाठी "शिक्षकांचे प्रशिक्षण' या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. शिक्षकांच्या विज्ञान शिकविण्याच्या क्षमता काळानुसार सुदृढ कराव्या लागतील. शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी "रिवॉर्ड सिस्टिम' आणावी. शिक्षकांनाही वेळ, साधने आणि संधी पुरविल्यास विज्ञान शिक्षणातील अपेक्षित बदल साध्य होऊ शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com