वाजली तर वाजली...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

निवडणुकीच्या गदारोळात राजकीय विश्‍वासार्हतेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. प्रचारात उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात; परंतु तेवढाच जर प्रचाराचा हेतू असे तर ती चिंतेची बाब होय.

देशाच्या पातळीवर पाच राज्ये आणि महाराष्ट्रात महापालिका-जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचे "सुपर मार्केट' जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत डॉ. मनमोहनसिंग यांना उल्लेखून समोर आणलेला बाथरूममध्ये अंघोळ करताना वापरायचा "रेनकोट', त्यावरून संतापलेला कॉंग्रेस पक्ष, मोदींच्या संसदेतल्या सगळ्याच भाषणांवर बहिष्काराची घोषणा, मुंबई महापालिकेतला "पारदर्शक' कारभार, पुणे-पिंपरी- चिंचवड किंवा नाशिकमधील गुंडाराज, नागपूर व अन्य ठिकाणी बंडखोरांनी फडकवलेले झेंडे व दिलेले हाकारे अन्‌ "पार्लमेंट ते पालिका-गाजरांची मालिका' अशी तुफान टीका करीत मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सुरू झालेले गाजरांचे वाटप, असे या "सुपर मार्केट'चे सगळे कोपरे रंगीबेरंगी, चविष्ट चिजांनी व्यापले आहेत. भाषणावेळी प्यायल्या जाणाऱ्या पाण्याचे ग्लास मोजले जात आहेत.

"पाणी पिणे' व "पाणी पाजणे' यामधला शब्दच्छल आता निरक्षरांनाही कळू लागलाय. "जो जे वांछील, तो ते लाहो', म्हणत आवडेल ते घ्या, असा फुकटाचा "सेल'च लागलाय जणू. रेनकोटची कोटी थोडी विनोदाच्या अंगाने घेतली असती तर बरे झाले असते. पण ऐतिहासिक पराभवामुळे बैचेन झालेल्या कॉंग्रेस नेतृत्वाला व्यंग्याचे व हलक्‍याफुलक्‍या विनोदाचे तेवढे भान कसे असणार? देशाचे पंतप्रधान विरोधकांना उद्देशून जन्मकुंडलीच्या धमक्‍या देताहेत. ज्यांच्या कुंडलीची चर्चा व्हायला हवे ते राहिले दूर; शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मोदींची कुंडली तयार असल्याचे प्रत्युत्तर देताहेत. हार्दिक पटेलचे ठाकरेंनी मातोश्रीवर केलेले स्वागत व गुजरातच्या निवडणुकीसाठी त्याची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून केलेली घोषणा, देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी उघडण्याचा इरादा वगैरे बरेच काही सुरू आहे. त्यातून मतदारांचे जोरदार मनोरंजन होत आहे. तसाही, जगभरातल्या सगळ्याच लोकशाही राष्ट्रांमध्ये निवडणूक प्रचार हा मनोरंजनाचा भन्नाट फड असतो. जाहीर सभांमध्ये विरोधकांवर हल्ले चढविताना, वाभाडे काढताना, बोचरी टीका करताना केले जाणारे शाब्दिक चिमटे, वाक्‌प्रचार कधी टाळ्या घेणारे तर कधी हंशा पिकविणारे ठरतात. अलीकडेच अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जगाने हा अनुभव घेतला. अर्थात, त्यात विनोदाच्या जोडीला कटुताही ठासून भरलेली होती, हा भाग अलहिदा. महत्त्वाचे म्हणजे राजकीय पक्ष व त्यांचे नेते या मनोरंजनासाठी जनतेवर कोणताही कर आकारत नाहीत.

प्रत्येक निवडणूक एखादा शब्द किंवा घोषणेसाठी आठवणीत राहते. लोकसभेची मागची निवडणूक "अब की बार...'साठी ओळखली जाते. एकमेकांच्या विरोधात दंड थोपटलेल्या भाजप-सेनेने विधानसभेवेळी स्वबळाच्या बेंडकुळ्या दाखवल्या. "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' किंवा "माझं नाव शिवसेना' वगैरे घोषणांनी मतदान फिरवले. सत्तांतर घडविले. जुन्या कारभाऱ्यांना विश्रांती मिळाली. नवे सत्तेवर आले. ते सत्तेत आल्यापासून जे काही राजकारणाचे व लोकशाहीचे खोबरे झालेय, त्याचेच प्रतिबिंब आता "मिनी विधानसभा' असे म्हणून गाजत असलेल्या राज्यातल्या दहा महापालिका व पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचारात उमटले आहे. राजकारणाची घसरलेल्या पातळी या अवनतीची सुरवात पारदर्शक कारभारावरून झाली अन्‌ आता ते गाजरांपर्यंत येऊन ठेपले आहे.

भारतीय जनता पक्षाने, खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कात्रीत पकडण्यासाठी हाती घेतलेल्या मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराच्या छोट्याछोट्या आवृत्त्या आता ठाणे, नाशिक वगैरे अन्य महापालिकांमध्येही प्रतिबिंबित व्हायला लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातल्या "परिवर्तनाचा नारा' इकडे महाराष्ट्रातही दिला गेलाय. "दिलेल्या शब्दाला जागतो, पारदर्शक वागतो', "मराठी बाण्याने जगतो, पारदर्शक वागतो', अशा मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती सुरू आहेत. पण त्यापेक्षा महत्त्वाची ठरलीय ती पारदर्शकतेची "सोशल मीडिया'वर उडवली जाणारी खिल्ली. "अयोध्येतले राम मंदिर कधीच बांधून झाले आहे; पण पारदर्शक असल्याने ते दिसत नाही''. "महाडचा पूलही 180 दिवसांत बांधून झाला. तोही पारदर्शक आहे'' किंवा "...म्हणे सगळ्यांच्या बॅंक खात्यावर 15 लाख जमा झालेत; पण पारदर्शक असल्याने दिसत नाहीत''. "भाजपच्या तिकीटविक्रीची पारदर्शकता कॅमेऱ्यात कैद झालीय'', अशी बोचरी उदाहरणे जाम "व्हायरल' झाली आहेत.

मनोरंजनाच्या पलीकडे या गदारोळात राजकीय विश्‍वासार्हतेचा एक मोठा मुद्दा चर्चेत येणे स्वाभाविक आहे. त्यातल्या अविश्‍वासाचेच गाजर हे प्रतीक आहे. निवडणुकीपुरत्या एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढायच्या व नंतर सत्तेसाठी एकत्र यायचे, यातून होणारी मतदारांची फसवणूक अधिक चिंतेचा भाग आहे. प्रचाराची भाषणे गाजराची पुंगी बनली आहे. तिच्या नशिबी "वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली', हेच असते. गाजरगाथा जोरात असताना सर्वसामान्यांच्या व्यथा व रोजच्या जगण्याशी संबंधित मुद्दे "पोलिटिकल सुपर मार्केट'च्या झगमगाटात नदारद होऊ नयेत. कारण, सर्वांत मोठे दु:ख अपेक्षाभंगाचे असते. तेव्हा तसा भंग होऊ नये, एवढी तरी अपेक्षा ठेवायला हरकत नाही ना?