वजनमताचा रेटा! (ढिंग टांग! )

Dhing Tang
Dhing Tang

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे.) चौथ्यांदा हेलिकॉप्टरच्या भानगडीतून बचावलो! हे केवळ श्रीश्री नमोजींच्या कृपाशीर्वादामुळेच आणि तमाम मराठी जनतेच्या मायेच्या जोरावरच शक्‍य झाले. श्रीश्री नमोजींचे माझ्याकडे लक्ष असून ते फक्‍त अल्प धारिष्ट्य तेवढे पाहात असतात, हे मला आता चांगले उमगले आहे! भक्‍तांसाठी तेच संकटे आणि पेचप्रसंगांची योजना करतात, आणि भक्‍तांना त्यातून जायला लावतात, असे गेल्या साडेतीन वर्षांत दिसून आले आहे. असो. 
काही निष्कर्ष :
1. हेलिकॉप्टर आणि ऑटो रिक्षा ह्यात फारसा फरक नाही.
2. हेलिकॉप्टरच्या माथ्यावर कितीही मोठा पंखा असला तरी आत प्रचंड उकडते!
3. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांप्रमाणे आभाळातही खड्‌डे असतात व हेलिकॉप्टरला त्याचा व्हायचा तो त्रास होतोच!
4. हेलिकॉप्टरमध्ये शेजारी बसलेल्या माणसाचे बोलणेही धड ऐकू येत नाही! 

...मीडियावाल्यांनी गेला दिवसभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बालंबाल बचावल्याची बातमी चालवली होती. त्यात अनेक तथ्ये (नेहमीप्रमाणे) नाहीत. मुळात ही दुर्घटना घडलीच नाही. ऑटो रिक्षाचा दांडा पन्नास वेळा ओढूनही रिक्षा आंचके द्यायला लागली, तर त्याला दुर्घटना म्हणतात का? नाही!! झाले एवढेच की, नाशिकहून औरंगाबादेस निघत असताना आम्ही ह्या हेलिकॉप्टररूपी ऑटो रिक्षामध्ये बसलो. समोर चालक बसलेला होता, आणि त्याच्या हातात दांडका होता. आम्ही चौघेजण हातवारे करून त्याला बाहेरून रोखले. त्याने विचारले, "किधर जाने का हय?'' 
"औरंगाबाद! मीटरसे चलो...'' मी ठणकावून सांगितले. तो काही बोलला नाही. त्याने फक्‍त "आत चढा' अशी मानेने (डिट्‌टो ऑटो रिक्षाचालकाच्या स्टायलीत) खूण केली. आम्ही उड्या मारल्या. 
"चार शीट नै चलेगा, भाई...इंजन लोड नै उठाता है, उपरसे ट्रॅफिकवालेभी तकलीप देते हय,'' असे तो कडवटपणाने म्हणाला. त्यावर आमच्यासोबत असलेल्या गिरीशभाऊंनी वसकन ओरडून त्याला "क्‍या बोला?'' असे विचारले. गिरीशभाऊंच्या कमरेला पिस्तुल पाहून तो "कुच नै' असे म्हणाला. गिरीशभाऊ सॉलिड माणूस आहे! वाघालाही भीत नाही, रिक्षावाले की क्‍या मजाल?..मग आम्ही चौघे रेटून बसलो. मी, आमचे पीए (हे असलेच पाहिजेत! व्वा!!), जलसंपदावाले गिरीशभाऊ आणि आमचा खानसामा सतीश (देव त्याचे भले करो...सुग्रण आहे माणूस. साबुदाण्याची खिचडी एक नंबर!!) ह्यास आम्ही मांडीवर घेतले. 
चार जणांनी ऑटोत कसे बसावे? ह्याची एक ट्रिक आहे. एकाने कोपऱ्यात सरकायचे, दुसऱ्याने थोडे पुढे! पुन्हा तिसऱ्याने मागे आणि चौथ्याने किंचित पुढे सर्सावून बसायचे. पैकी एकाचा पाय किंचित ऑटोच्या बाहेर जातो हे खरे!! चांगला ऑटो रिक्षावाला चौथी शीट पुढच्या बाजूलाच घेतो. पण आमचा रिक्षावाला तेवढा स्पोर्टी नव्हता. चौघेजण बसल्यानंतर हेलिकॉप्टर घरघरत वर निघाले. पण "तकलीप' व्हायला लागली ती लागलीच. चालक जोराजोरात प्रयत्न करत होता. पण काही केल्या ते जाम वर जाईना. वर पंख्याच्या आवाजात तो काय बोलतोय ते कळत नव्हते. तेवढ्यात गिरीशभाऊ काहीतरी बोलायला लागले. ते साधारणपणे "तुमकू जमता नै तो हमकू बोलो, हम चलायेगा हेलिकॉप्टर...' असे काहीसे असावे, असे मला वाटले. पण त्याचे बोलणे चालकास ऐकू येईना. शेवटी वैतागून गिरीशभाऊंनी चालकाला वरचा पंखा बंद करायला सांगितले. त्यासरशी हेलिकॉप्टररूपी रिक्षा दाणकन खाली आली!! 
"हां, अब बोलो, क्‍या बोल रहे थे साब?" जमिनीवर आल्यावर चालकाने भुवया वर करून विचारले. आम्ही तिघेही एका सुरात म्हणालो, "कुच नै!" 
....एवढेच तर घडले होते! सारांश, हा जनमताचा नव्हे, वजनमताचा रेटा होता!! असो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com