मोरपीस मिळण्याचं ठिकाण (पहाटपावलं)

asawari kakde
asawari kakde

आपली सगळी स्वप्नं तिनं जिद्दीनं पुरी केली. स्वतःच्या हिमतीवर एक प्रशस्त टेरेस फ्लॅट  विकत घेतला. आता निवृत्त झाल्यावर टेरेस गार्डनमधल्या झोपाळ्यावर बसून निसर्गाच्या सान्निध्यात ती निवांत अनुभवतेय मनाची कृतार्थ अवस्था. कधी ती घेऊन बसते वाचायची राहून गेलेली महत्त्वाची पुस्तकं... कधी ऐकत राहते जुनी गाणी... कधी लिहीत बसते... तिथं बसलेली असताना रोज ठराविक वेळी तिच्या कानावर पडतात कॉलनीतल्या बायकांनी गायलेल्या भजनाचे स्वर. एकदा पुस्तक बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐकलं तिनं त्या स्वरांमध्ये अडखळत उमटणारे शब्द - 
झाले भोजन अंबे आता 
तांबुल घेऊन आले 
या देहाचे पिकले पान 
त्याचसाठी खुडले... 
कितीतरी वेळ या ओळींमधला आशय तिच्या मनात रेंगाळत राहिला. तिला वाटलं 
किती कृतार्थ भाव आहे या गाण्यात. भोजन झाले आहे म्हणून आता विडा घेऊन देवीकडे निघालेली ही श्रद्धाळू गृहिणी मनःपूत जगून झाल्यासारखी म्हणते आहे, की या विड्यासाठी मी माझ्या देहाचेच पिकले पान खुडले आहे. तिच्या मनात आलं, "झाले भोजन...' असं म्हणण्यामधली सार्थ तृप्ती खरंच लाभली असेल काय हे गाणं म्हणणाऱ्या या बायकांना? किती मनापासून आळवतायत त्या हे गाणं ! ती अंतर्मुख झाली. तिला आठवत राहिलं... नात्यांच्या गुंत्यात अडकलेल्या, नवऱ्याशी 
जमवून घेणाऱ्या, मुलांची उद्धट बोलणी ऐकून घेणाऱ्या, जेवणा-खाण्यात... कपड्यालत्त्यात..भांड्या-कुंड्यात वर्षंच्या वर्षं घालवणाऱ्या... या बायकांच्या कळपातून ती जाणीवपूर्वक बाहेर पडली होती. तरी तेव्हाही तिला जाणवत होतं की त्या शहाण्या आहेत. गुंत्यात राहून हवं ते कसं मिळवायचं ते त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांना कळतं की झिरपू द्यायचे नसतात घरात... रस्त्यात... बसमध्ये बसणारे धक्के त्वचेच्या आत. त्या प्रत्युत्तरं देत नाहीत प्रत्येक प्रश्नाला. 

आतल्या समुद्राची गाज ऐकू येते त्यांना मधूनमधून. उसळत्या लाटांबरोबर बाहेर फेकल्या गेलेल्या माशांची तडफडही दिसते एखाद्या एकट्या तिन्हीसांजेला. पण त्यामुळं त्यांची दिनचर्या विस्कटत नाही. तडफड ओलांडून त्या पुढे जातात आणि बुडवून टाकतात कामात सगळी उसंत. तगमगीला बाहेर पडायला फटही ठेवत नाहीत. त्या समजून घेतात सामान्यांचा निरुपाय आणि वाहाते ठेवतात दिवस... याच अंतर्मुख विचारात ती वरून पाहात राहिली भजन संपवून हसत, गप्पा मारत परतणाऱ्या बायकांच्या घोळक्‍याकडं. त्यांचं लक्षही नव्हतं तिनं तळहातावरच्या फोडासारख्या जपलेल्या तिच्ास्वत्वाकडं ! साधा ओरखडाही उमटू नये त्यावर म्हणून किती आकांत केला होता तिनं. आयुष्याशी शर्थीनं लढून स्वतःच्या अटींवर कमावलं होतं हवं ते सारं... त्यासाठी स्वेच्छेनं मोजली होती चौकटीबाहेरची किंमत! आज त्यांच्याकडं पाहताना तिला वाटलं आपल्यापेक्षा वेगळ्या शर्थीनं त्यांनीही मिळवलं आहे त्यांना हवे ते.. त्यासाठी मोजली असेल त्यांनी चौकटीच्या आतली किंमत. त्याच्या बदल्यात त्यांना सापडलं आहे मोरपीस मिळण्याचं ठिकाण! तिच्यातल्या प्रगल्भतेला आज 
समजून घेता आलं त्यांच्या कृतार्थतेतलं वेगळेपण! 

. . . . . . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com