अदृश्‍य हात! (ढिंग टांग!)

अदृश्‍य हात! (ढिंग टांग!)

आणखी एक म्यारेथॉन मुलाखत! 
आम्ही : सध्या काय चाललंय? 
फडणवीसनाना : काय चालणार? तेच! सध्या फॉगच चल राहा है..! 
आम्ही : तुमचा वाढदिवस झाला म्हणे! 
फडणवीसनाना : झाला की! शिक्रण केलं होतं... 
आम्ही : पण तुम्ही होर्डिंग लावायला नकार दिलात. पक्ष असा चालणं कठीण असतं! 
फडणवीसनाना : न चालायला काय झालं? आमचा पक्ष होर्डिंगवर नाही, (ओठांवर बोटांचा पाचुंदा हापटत) बोर्डिंगवर चालतो! हाहा!! 
आम्ही : टीव्हीवर जाहिरातीही देऊ दिल्या नाहीत! 
फडणवीसनाना : ते पैसे शेतकऱ्यांसाठी आमच्या फंडाला द्या म्हणून सांगितलं! 
आम्ही : ही आयडिया कशी सुचली ते सांगा! 
फडणवीसनाना : जलयुक्‍त शिवार योजनेवरून! पावसाचं पाणी चर खणून जिरवायचं! वॉटर टेबलची पातळी वाढवायची! पुढचा उन्हाळा बरा जातो, असा हिशेब! त्याच धर्तीवर होर्डिंग, जाहिराती, केक, फुगे, टोप्या, चाकलेटं हा वाढदिवसाचा खर्च जिरवला की तेवढाच फायदा! काही कळलं? 
आम्ही : विनोद करत असाल तर ठीक आहे, पण... 
फडणवीसनाना : हो, विनोदच होता, पण तावड्यांचा नव्हे!! हाहा!! पुन्हा विनोद!! 
आम्ही : वाईट होता...आय मीन विनोद. तुमचे जुने मित्र तुमच्यावर नेहमी टीका करतात. ढोल वाजवतात!! 
फडणवीसनाना : निंदकाचे घर असावे शेजारी! 
आम्ही : मलबार हिल आणि बांद्रे शेजारी नाहीत! मध्ये दादर येतं... 
फडणवीसनाना : पहिल्या मजल्यावरचे तात्या मुळे आणि चौथ्या मजल्यावरचे अण्णा गोळे शेजारी नसतात का? एकाच हाउसिंग सोसायटीचे आम्ही मेंबर आहोत!! 
आम्ही : शेजारी म्हणायचं तर तुमच्यात विरजणही जात नाही नि विस्तवही! 
फडणवीसनाना : तेच... तेच म्हणतोय मी! मघाशी इंटरनेटवर वर्तमानपत्र वाचत होतो! 
आम्ही : विकत घेत नाही वाटतं!! इंटरनेटवर फुकट वाचता? 
फडणवीसनाना : पेपरवाला रोखीत बिल मागतो! देणार कसं? 
आम्ही : तुमच्याच नोटाबंदीमुळे हे हाल झालेत! सामान्य माणसं अजूनही भरडली जाताहेत! एटीएम दिसलं की छातीकडे आपोआप हात जातो!! पण कोणी अवाक्षर काढायला तयार नाही! लोकांची तोंडंसुद्धा एटीएमसारखी रिकामी झाली आहेत!! 
फडणवीसनाना : शतप्रतिशत क्‍याशलेस महाराष्ट्र हे तर आमचं स्वप्न आहे! 
आम्ही : मग अभिनंदन! झालाच्चे आमचा महाराष्ट्र क्‍याशलेस! इथे दातावर मारायला दमडा नाही उरला कुणाकडे!! 
फडणवीसनाना : थॅंक्‍यू! मग दात पाडा एकमेकांचे!! हाहा!! पुन्हा विनोद!! 
आम्ही : दात नाही पडणार, पण सरकार पडेल अशी भीती नाही वाटत? 
फडणवीसनाना : मुलाखतकार असूनही प्रश्‍नचिन्हवाला पहिलाच प्रश्‍न विचारलात त्याबद्दल पुन्हा थॅंक्‍यू!! 
आम्ही : ही म्यारेथॉन मुलाखत आहे! ह्यात मुलाखतकार काहीही बोलतो, त्यावर तुम्ही फक्‍त प्रतिक्रिया द्यायची असते! तुम्हाला नाही कळणार... ही नवी पद्धत आहे!! 
फडणवीसनाना : ओके, ओके! आता तुमचं उत्तर : आमचं सरकार पडणार नाही, कारण ते पडायला लागलंच तर सावरायला अनेक अदृश्‍य हात आहेत!! 
आम्ही : हात म्हंजे पंजा म्हणायचं असेल तुम्हाला! 
फडणवीसनाना : हातच! गड्डा झब्बू खेळताना पत्त्यात होतात ते हात! रमी खेळताना लागतात ते हात!!... हात रे!! 
आम्ही : म्हंजे मित्राचा हात तुम्ही झटकणार वाटतं! 
फडणवीसनाना : एवढंच सांगतो की आम्ही कारभाराची पाच वर्षं पूर्ण करू! बाकी कोणाला काय बोलायचंय ते बोलू दे! ढोल वाजवायचेत ते वाजवू दे! मुलाखती द्यायच्यात द्या देऊ दे!! 
आम्ही : शेतकऱ्यांना चुना लावलात तर ढोल फोडू...म्हंजे असं तुमचे मित्र म्हणतायत! 
फडणवीसनाना : तुम्ही आता निघा! 
आम्ही : चीन आणि पाकिस्तानशी लढण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्राशीच का लढता? हा खरा सवाल आहे! द्या उत्तर!! 
फडणवीसनाना : उत्तर देऊ म्हणताय? पुढल्या भागात देतो! निघा!! जय महाराष्ट्र. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com