इच्छामरण पाहताना.. (पैलतीर)

इच्छामरण पाहताना.. (पैलतीर)

‘इच्छा मरण‘ हा विषय काही नवा नाही. यावर अनेकदा चर्चा झाली आहे. डॉक्‍टर केव्होर्कियन हे इच्छामरणाचे पुरस्कर्ते होते. ‘ज्याला मरायचे असेल, त्याला मी आत्महत्या करण्यासाठी मदत करेन‘ असे सांगून त्यांनी काही जणांच्या इच्छामरणासाठी मदतही केली. मग त्यांच्यावर खटलाही भरला गेला. पण ‘आजही इच्छामरण घेता येऊ शकते‘ असे मी म्हटले, तर कदाचित कुणाला खरं वाटणार नाही. 

हल्ली कोणीही ‘इस्टेट प्लॅनिंग‘साठी एखाद्या वकीलाकडे गेले, तर त्यांना जी कागदपत्रे तयार करायला सांगतात त्यातील एक म्हणजे ‘लिव्हिंग विल‘. यात ‘जर-तर‘ची बरीच भाषा असते. ‘जर बरे व्हायची शक्‍यता नसेल, तर मला उगीच मशिनच्या साह्याने जगवू नका‘ असे या कागदपत्रामध्ये सांगता येते. याला ‘ऍडव्हान्स्ड डिरेक्‍टिव्ह‘ असेही म्हटले जाते. या कागदपत्रांनुसार, ‘बरे होणे शक्‍य आहे की नाही‘ हे ठरविण्याची जबाबदारी डॉक्‍टरवर येते. आणखी एका प्रकारचे ‘ऍडव्हान्स्ड डिरेक्‍टिव्ह‘ म्हणजे ‘कुठल्याही परिस्थितीत मला मशिनवर टाकू नका.‘ याला ‘डू नॉट रिससिएट‘ असे म्हणतात. आता अशा प्रकारचे कागद सही करून तुम्ही आपली इच्छा आधीच जाहीर केली नसेल, तर असा प्रसंग आल्यावर काय करायचे, याची जबाबदारी दुसऱ्यावर येऊन पडते. जर रोगी स्वत: अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत असेल, तर अर्थात त्याला स्वत:लाच हे निर्णय घेता येतात. पण अनेकदा रुग्ण स्वत:चे निर्णय घेण्याच्या स्थितीत नसतो. मग मात्र डॉक्‍टरांची पंचाईत होते. त्यामुळे माझ्या दृष्टीने ‘लिव्हिंग विल‘ला काहीच महत्त्व राहत नाही. अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार सर्वांत आधी जोडीदाराला असतो. नवरा किंवा बायको नसेल/जिवंत नसेल किंवा घटस्फोट झाला असेल, तर तो अधिकार मुलांना मिळतो. मुलांपैकी एखाद्याला असा अधिकार लिहून दिला गेला नसेल, तर मग ‘50 टक्के अधिक एक‘ अशा मतांची गरज असते. जोडीदार नसेल आणि मुलेही नसतील, तर आई-वडिलांना हा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्यानंतर क्रमांक लागतो भाऊ-बहिणींचा आणि कुणीच नसेल किंवा ही जबाबदारी घेण्यास तयार नसेल, तर न्यायालयात जावे लागते. मग न्यायालय यासाठी कुणाची तरी नियुक्ती करते. 

एक महिला माझी रुग्ण होती. तिचे वय 55 वर्षे. धुम्रपानामुळे तिच्या फुफ्फुसाला इजा झाली होती. पण ऑक्‍सिजन घ्यावा लागेल, अशी परिस्थिती अजून आली नव्हती. तिला चालताना थोडा दम लागत असे. तिचे वजनही जरा जास्त होते. एकदा ती नियमित तपासणीसाठी माझ्याकडे आली. नुकताच तिचा ‘एक्‍स-रे‘ काढला होता आणि ‘ब्रिदिंग टेस्ट‘ही केली होती. ती थोडी नाराज वाटत होती. नेहमीप्रमाणे मी काही प्रश्‍न विचारले. एरवी हास्यविनोद करत बोलणारी ती महिला आज जेवढ्यास तेवढे उत्तर देत होती. तिच्या ‘एक्‍स-रे‘मध्ये काहीही नवीन नव्हते. ट्युमरही नव्हता. तिचे धुम्रपान सुरू असूनही ‘ब्रिदिंग टेस्ट‘ जास्त बिघडली नव्हती. मग ही एवढी नाराज का, हे मला कळेना! मग तिला विचारले, ‘Is something bothering you?‘ तर एकदम ती रडायलाच लागली. मग मला पूर्ण गोष्ट समजली. ती एका माणसाबरोबर राहत होती. गेली 10-12 वर्षे ते ‘नवरा-बायको‘सारखे एकत्र राहत होते. पण तिचे आणि त्या माणसाच्या नातेवाईकांचे फारसे पटत नव्हते. एक दिवस त्याला हृदयविकाराचा झटका आला. म्हणून 911 वर मदत मागितली. त्यांनी त्याला रुग्णालयात नेले आणि ‘रेस्पिरेटर‘वर टाकले. पण तो परत शुद्धीवर आलाच नाही. त्याच्या हृदयाला इतकी इजा झाली होती, की त्यामुळे त्याची हृदयक्रिया बंद झाली आणि मेंदूलाही इजा झाली. तो परत शुद्धीवर येईल, याची आशाच नव्हती. मग अर्थात त्याचा ‘लाईफ सपोर्ट‘ बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आणि ‘रेस्पिरेटर‘ बंद केला. त्याचे निधन झाले. ज्या माणसाबरोबर तिने 10-12 वर्षे संसार केला, त्याने तिला ‘मेडिकल पॉवर‘ दिली नव्हती. तो अधिकार त्याच्या भावाला मिळाला होता. पण त्याच्या भावाचे आणि हिचे पटत नव्हते. त्यामुळे त्याचा ‘लाईफ सपोर्ट‘ बंद करण्याचा निर्णय त्याच्या भावाने घेतला आणि हिला कुणीही विचारले नाही. त्यामुळे ती उदास होती. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये लग्नाशिवाय सात वर्षे एकत्र राहिले, तरीही त्या जोडप्याला पती-पत्नीचे अधिकार मिळतात. परंतु वैद्यकीय निर्णय घेण्यासाठी अशा अधिकारांचा उपयोग होत नाही. संपत्तीविषयक गोष्टींमध्ये या अधिकारांचा वापर करता येतो. ‘लिव्हिंग विल‘ आणि ‘मेडिकल सरोगेट‘ची कागदपत्रे केली नसली, तर अशी समस्या उद्भवते. 

आता ही दुसरी गोष्ट. काही वर्षांपूर्वी मी अतिदक्षता विभागामध्ये काम करत होतो. तेव्हा असे प्रसंग महिन्यातून एक-दोनदा येत असत. 68 वर्षांचा एक रुग्ण होता. ‘दम लागतो‘ म्हणून तो रुग्णालयात आला. त्याचा दम लागणे वाढले आणि मला बोलाविण्यात आले. मी त्याला तपासले. गेली 40 वर्षे तो माणूस सिगारेट ओढत होता. मग जे व्हायचे तेच झाले. त्याला ‘एम्फिसिमा‘ झाला. तो बळावल्यावर दम लागतो म्हणून हा तपासणीसाठी आला, तेव्हा त्याची प्रकृती खालावली होती. श्‍वासोच्छवास जास्त खराब झाल्यानंतर त्याला रेस्पिरेटरवर टाकावे लागले. त्याची बायको आणि मुलीशी मी रोज बोलत होतो. माझ्या मते, त्याची परिस्थिती इतकी वाईट होती, की एकदा तो रेस्पिरेटरवर गेला, तर त्याला बंद करणे बरेच अवघड जाणार होते. अर्थात, मी या रुग्णाला आधी पाहिले नव्हते. त्यामुळे त्याचा रेस्पिरेटर बंद करणे शक्‍यच नाही, असे मी ठामपणे सांगू शकत नव्हतो. मग त्याला रेस्पिरेटरवर टाकले. दोन दिवस गेले, चार दिवस गेले.. दहा दिवस गेले..रेस्पिरेटरची मदत कमी केली, की त्याला श्‍वास लागे. मग पुन्हा रेस्पिरेटरची मदत वाढवावी लागे. दोन आठवडे झाल्यानंतर ‘ट्रेकिओटोमी‘ (श्‍वासनलिकेला भोक पाडण्याची) वेळ आली. ती शस्त्रक्रिया झाली. मग पुन्हा रेस्पिरेटर कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. साधारणत: पुढच्या 12-14 दिवसांत त्याला नुसता ऑक्‍सिजन सुरू होता. पण इतके दिवस काहीच व्यायाम नाही आणि त्यात खराब झालेली फुफ्फुसे यामुळे काहीही करणे कठीण होते. नुसते उभे राहतानाही त्याला मॅरेथॉन धावल्यासारखा दम लागत होता. मग त्याला घरी पाठवले. पुढच्या तीन आठवड्यांत ट्रेकही काढली. एकूण बरे चालले होते. एक दिवस त्याची बायको त्याला माझ्याकडे घेऊन आली. जोरात पाऊस पडत होता. त्याला माझ्या ऑफिसमध्ये चालत येणेही शक्‍य नव्हते. मी त्याला तपासण्यासाठी त्यांच्या व्हॅनमध्ये गेलो. मग त्याला पुन्हा ‘आयसीयू‘मध्ये दाखल केले. दोन तासांत त्याला पुन्हा रेस्पिरेटरवर टाकावे लागले. ते करण्याआधी मी पुन्हा त्याला आणि त्याच्या बायकोला विचारले. ‘पुढे काय होईल‘ हेदेखील सांगितले. जर त्याला रेस्पिरेटरवरून काढता आले नाही, तर उर्वरित आयुष्य नर्सिंग होममध्येच राहावे लागेल. पण त्याच्याकडून ‘आय डोण्ट केअर‘ असे उत्तर मिळाले. 

पण यावेळी त्याच्या ‘एक्‍स-रे‘मध्ये न्यूमोनिया दिसत होता. दोन दिवसांच्या उपचारांनंतरही त्याच्यात काहीच फरक पडला नाही. म्हणून मग मी त्याची ब्रॉन्कोस्कोपी केली. त्याच्या फुफ्फुसामध्ये एक गाठ होती. अर्थात त्याला कॅन्सर झाला होता. मग मी त्याच्याशी आणि त्याच्या बायकोशी चर्चा केली. त्याला पाच मुले होती. प्रत्येकजण वेगवेगळ्या शहरांत राहत होते. एक मुलगी पूर्वेला कॅलिफोर्नियामध्ये होती. अचानक त्या रुग्णाने त्याचे मत बदलले. आतापर्यंत ‘काहीही करून मला जगवा‘ असे म्हणणारा तो रुग्ण आता ‘मला ताबडतोब मरायचे आहे‘ असे म्हणू लागला. ‘जगायचे की मरायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे‘ असे म्हणू लागला. ‘मला कोणाचेच ऐकायचे नाही आणि माझा रेस्पिरेटर बंद करा‘ असा आग्रह करू लागला. त्याची मुलगी कॅलिफोर्नियाहून येणार होती; पण तिच्यासाठी थांबण्याचीही त्याची तयारी नव्हती. त्याचे म्हणणे बरोबर होते. त्याच्या जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यालाच होता. त्यात दुसरे कुणीही बदल करू शकणार नव्हते. पण मला मात्र त्यांच्या मुलांसाठी थांबणे जरूर होते. मग मी त्याला गुंगीचे औषध दिले. रात्री दोन वाजता त्याची मुलगी आली. काही कारणांमुळे मला त्याच वेळी ‘आयसीयू‘मध्ये जावे लागले. त्याच्या खोलीत 25 जण होते. त्याचा रेस्पिरेटर बंद केला आणि पाचच मिनिटांत त्याचे निधन झाले. 

पुढची गोष्ट निराळी आहे. माझा एक रुग्ण होता, त्याला ऑक्‍सिजनशिवाय एक मिनिटही राहता येत नव्हते. एक दिवस त्याच्या छातीत दुखायला लागले. बायकोला न सांगता त्याने ब्रेकफास्ट केला. 911 ला बोलवावे लागले. त्याचे फुफ्फुस संकुचित (कोलॅप्स) झाले होते. मग त्याच्या छातीत एक ट्युब टाकावी लागली आणि त्याला रेस्पिरेटरवर टाकावे लागले. पुढचे काही दिवस त्याचा रेस्पिरेटर कमी करण्याच्या प्रयत्नांत गेले. त्याच्या छातीतील नळीमधून हवा निसटत होती आणि ती कमी होण्याचे काहीही लक्षण दिसत नव्हते. मग एका सर्जनला बोलाविले आणि शस्त्रक्रिया केली. हे सर्व होत असताना मी त्याच्याशी आणि त्याच्या बायकोशी रोज बोलत असे. रेस्पिरेटर कमी करण्यात यश येत नव्हते. मग ट्रेकिओटोमी करावी लागली. चार आठवड्यांनंतर त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठविले. तिथे रेस्पिरेटर कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दोन-तीन आठवड्यांत त्याला पोटाचे दुखणे सुरू झाले आणि तो पुन्हा ‘आयसीयू‘मध्ये आला. मग त्याला खाण्यासाठी एक नलिका टाकावी लागली. असे करण्यात जवळपास दोन महिने गेले. त्याला सतत काही ना काही होतच होते. एकदा मी त्याला तपासून त्याच्या खोलीतून बाहेर आलो, तर त्याची बायकोही माझ्यामागे बाहेर आली. ती मला म्हणाली, ‘एक विनंती आहे‘.. मी विचारले ‘काय?‘ तर ती म्हणाली, ‘can you come to his funeral and do eulogy?‘ मी बुचकळ्यात पडलो. मी आत खोलीमध्ये नजर टाकली, तर ती म्हणाली, ‘त्याला माहीत आहे!‘ मी काय बोलणार? मी तिला ‘हो‘ म्हणालो. मग त्याला DNR (डू नॉट रिससिएट) केले आणि हॉस्पिसला बोलाविले. हॉस्पिसकडे तीन प्रकारचे उपचार दिले जातात. जे रुग्ण पुढील सहा महिने जगण्याची शक्‍यता असते, त्यांना त्यांच्याच घरी पाठवतात आणि हॉस्पिस त्यांना घरीच पाहते. जे रुग्ण घरीच असतात आणि पुढील दोन-तीन दिवसच जगण्याची शक्‍यता असते, अशांची रुग्णालयात नेऊन मृत्युपर्यंत काळजी घेतात. या रुणाला दुसऱ्या दिवशी हॉस्पिसच्या रुग्णालयात पाठविले. तिथे त्यांनी त्याचा रेस्पिरेटर बंद केला आणि तो गेला. त्याच्या बायकोने रात्री एसएमएस करून मला ते कळविले. त्याच्या अंत्यसंस्काराला मी गेलो होतो. 

माझ्या वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने आजवर ‘इच्छामरणा‘विषयी माझ्या अनुभवास आलेल्या अनेक गोष्टी सांगू शकेन.. मात्र, माझ्या मते या प्रत्येक केसमध्ये काहीतरी वेगळेपणा असतो.. 

................................................................................
* टीप : सदर लेखन अमेरिकेतील वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांवर आधारित आहे. यातील कायदे किंवा तरतुदी भारतीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये लागू असतीलच, असे नाही. 
(लेखाची पूर्वप्रसिद्धी : बृहन्महाराष्ट्र वृत्त, जून 2016, उत्तर अमेरिका)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com