कॅस्ट्रो नावाचा डावा ध्रुव (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

युरोप-अमेरिकेतील भांडवलदारी व्यवस्था, वसाहतवादी वृत्ती व निर्दयी सत्ताकांक्षेला फिडेल कॅस्ट्रो यांनी दिलेले आव्हान हा विसाव्या शतकातील इतिहासाचा मोठा अध्याय आणि उजव्या-डाव्या विचारसरणीतला एक ध्रुव आहे.

युरोप-अमेरिकेतील भांडवलदारी व्यवस्था, वसाहतवादी वृत्ती व निर्दयी सत्ताकांक्षेला फिडेल कॅस्ट्रो यांनी दिलेले आव्हान हा विसाव्या शतकातील इतिहासाचा मोठा अध्याय आणि उजव्या-डाव्या विचारसरणीतला एक ध्रुव आहे.

जिवावर टपलेल्या सर्वशक्‍तिमान अमेरिकेला अर्धशतकाहून अधिक काळ वाकुल्या दाखवत, ऊस व कॉफीचे मळे, तंबाखूच्या शेतीने बहरलेल्या कॅरेबियन बेटांपैकी क्‍यूबावर सत्ता व लोकप्रियता गाजवणाऱ्या फिडेल अलेजान्द्रो कॅस्ट्रो रूझ नावाच्या दंतकथेची लौकिकार्थाने सांगता झाली आहे. अवघ्या एक लाख 10 हजार चौरस किलोमीटर म्हणजे महाराष्ट्रातील सात-आठ मोठे जिल्हे इतक्‍या क्षेत्रफळाचा, सव्वा कोटीपेक्षा कमी लोकसंख्येचा अटलांटिक महासागरातल्या बेटांचा क्‍यूबा हा देश. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या चिंचोळ्या सामुद्रधुनीत त्याचे स्थान. स्पेनच्या वसाहतीमधून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकन भांडवलदारीच्या विळख्यात अडकलेल्या मायभूमीला त्यातून बाहेर काढण्यासाठी फिडेल कॅस्ट्रो यांनी तरुणपणीच हाती बंदूक घेतली. रक्‍तरंजित क्रांती घडली आणि राजधानी हवानाच्या आकाशात निळ्या-पांढऱ्या-लाल या तिरंगी ध्वजावर डाव्या चळवळीचा तारा अवतरला.

जगभरातील नेत्यांना हेवा वाटावा, अशी व्यक्‍तिगत लोकप्रियता मिळविणाऱ्या कॅस्ट्रोंनी क्‍यूबाच्या आत्मसन्मानाची लढाई देशापुरती मर्यादित ठेवली नाही. वैयक्‍तिक करिष्म्याला त्यांनी भांडवलशाही विरुद्ध समाजवाद, असा वैचारिक परिघ दिला. शेजारचे अर्जेंटिना, बोलिव्हिया, पेरू, चिली वगैरे लॅटिन अमेरिकन देश, आफ्रिकेतील अल्जेरिया, लीबिया, अंगोला, सोमालिया, टांझानिया, मोझाम्बिक आदी देश, कधीकाळी वसाहतवादी म्हणून विरोध झालेल्या युरोपमधल्या पोलंड, बल्गेरिया वगैरे, तसेच पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेतृत्व केलेल्या अलिप्त राष्ट्र चळवळीतल्या, तिसऱ्या जगातल्या अनेक देशांसाठी फिडेल कॅस्ट्रो हे नाव प्रेरणाबिंदू ठरले.

"तुम्ही छोटे की मोठे, महत्त्वाचे नाही; संघर्षामागील तत्त्वांवर तुमचा किती विश्‍वास आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. तत्त्वनिष्ठ असाल तर बलाढ्यातल्या बलाढ्यावरही तुम्ही विजय मिळवू शकता,'' हे त्यांनी दाखवून दिले. चे गव्हेरा व फिडेल कॅस्ट्रो ही जोडी कष्टकरी व शेतकरी समाजासाठी लढणाऱ्या जगभरातल्या क्रांतिकारकांची अध्वर्यू बनली. हे करताना रशियातून नियंत्रित केली जाणारी राजवट असे स्वरूप कॅस्ट्रो यांनी क्‍यूबामधील सत्तेला येऊ दिले नाही. जोस मार्टी यांच्या रूपाने स्वातंत्र्य चळवळीच्या स्वदेशी सेनानीला कार्ल मार्क्‍स व व्लादिमिर लेनिन यांच्यापेक्षा महत्त्वाचे स्थान दिले. किंबहुना शीतयुद्धाच्या काळात रशियाच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या कॅस्ट्रो यांनी पाव शतकापूर्वी मिखाईल गोर्बाचोव्ह यांनी "पेरेस्त्रोईका' व "ग्लासनोस्त' हे अनुक्रमे आर्थिक विकेंद्रीकरण व अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचे धोरण आणले, तेव्हा त्यातील धोके स्पष्टपणे सांगितले. ते खरे ठरले व रशियाचे विघटन झाले.

बलवानांना ललकारणारे, आव्हान देणारे धाडसी नेते सामान्यांच्या गळ्यातला ताईत बनतात. फिडेल कॅस्ट्रो त्यापैकीच एक. इंदिरा गांधींनीही बांगलादेश मुक्‍तीच्या वेळी अमेरिकेला असेच ललकारले. म्हणून त्या "दुर्गा' ठरल्या. ड्‌वाईट आयसेनहावर, जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्‍सन, गेराल्ड फोर्ड, रोनाल्ड रेगन, थोरले व धाकटे जॉर्ज बुश व दोघांच्या मधल्या काळात बिल क्‍लिंटन या अमेरिकेच्या किमान दहा अध्यक्षांनी शक्‍य त्या सर्व मार्गांनी कॅस्ट्रो यांना संपविण्याचा, त्यांना सत्तेवरून घालविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे धाकटे बंधू राओल सत्तेवर आल्यानंतर गेल्या मार्चमध्ये बराक ओबामांनी क्‍यूबाला भेट दिली. तेव्हा स्वाभिमानी थोरल्या कॅस्ट्रोंनी, भांडवलदारांची मदत घेण्याइतकी वाईट अवस्था आली नसल्याचे ठणकावून सांगत भेट नाकारली. या व अशा अनेक प्रसंगांमधून युरोप-अमेरिकेतील भांडवलदारी व्यवस्था, वसाहतवादी वृत्ती व निर्दयी सत्ताकांक्षेला फिडेल कॅस्ट्रो यांनी दिलेले आव्हान हा विसाव्या शतकातील इतिहासाचा मोठा अध्याय आणि उजव्या-डाव्या विचारसरणीतला एक ध्रुव आहे. त्याला दुसरी बाजूही आहे.

कॅस्ट्रो यांच्या निधनांनतर जगाने स्पॅनिश भाषेत "ऍडिओस' म्हणजे "गुडबाय' म्हणत असतानाच प्रामुख्याने क्‍यूबा निर्वासितांचा रहिवास असलेल्या मियामी व फ्लोरिडामध्ये आनंद साजरा झाला. अमेरिकेच्या पंखाखालील व्यवस्थेने कॅस्ट्रोंना खलनायक ठरवले, हुकूमशहा म्हटले. डाव्या पोलादी पडद्याआड घडणाऱ्या नको नको त्या प्रकारांची जगभर चर्चा होत राहिली. मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे अनेक आरोप झाले. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या मृत्यूबाबत अफवा पसरल्या. या सगळ्या हल्ल्यांना पुरून उरतानाच कॅस्ट्रो यांनी क्षेत्रफळाबाबत एकशे चार, तर लोकसंख्येबाबत 78 व्या क्रमांकावर असलेला आपला चिमुकला देश सकल राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नाबाबत 58 व्या, तर मानवविकास निर्देशांकाबाबत तेराव्या क्रमांकावर नेला. भूमिसुधारणा केल्या.

निर्यातक्षम शेती विकसित केली. सार्वजनिक आरोग्य व शिक्षणाच्या सर्वोत्तम सुविधा आणि रस्ते-दळणवळणाचे अत्युत्कृष्ट जाळे असलेल्या जगातल्या आघाडीच्या देशांमध्ये क्‍यूबाचे नाव घेतले जाते. असे म्हटले जाते, की संपूर्ण जग अतिउजव्या विचारांकडे, भांडवलदारी राजवटींकडे झुकत चालले आहे. फिडेल कॅस्ट्रो नावाच्या जननायकाच्या निधनानंतरची, "ट्रम्प आले व कॅस्ट्रो गेले, काय समजायचे ते समजा!', ही "सोशल मीडिया'वरील प्रतिक्रिया खरेच खूप काही सांगून जाते.

संपादकिय

लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज आणि देशाच्या या दोन सर्वोच्च सभागृहांच्या कामकाजात आपल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग याबाबत सर्वसामान्य...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात उत्कल एक्‍स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर मृत...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

भूतानमधील डोकलामवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेला चीन या प्रकरणी...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017