लिव्ह इट अप! (अग्रलेख)

fifa football world cup 2018
fifa football world cup 2018

फुटबॉल म्हणजे सारा मिळून नव्वद मिनिटांचा खेळ; पण त्यावर यश, कीर्ती, देशाभिमान यांचे आलेख चढत-उतरत जातात. हे सारेच अतर्क्‍य आणि अतिशयोक्‍त वाटले, तरी ते वास्तव आहे.

मॉस्कोमधल्या विशाल, आधुनिक लुझनिकी स्टेडियमवर जमा झालेल्या तब्बल ८१ हजार भाग्यवंत साक्षीदारांच्या समोर ‘फिफा’ विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचे भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजता दणकेबाज उद्‌घाटन झाल्यानंतर जगभरातील बहुतेक देशांमधल्या कार्यालयांमध्ये अचानक गैरहजेरीचे प्रमाण वाढणार आहे. कामगिरी, उत्पादन वगैरे बाबी किरकोळ ठरतील. लाखो लोकांना जागरणे होतील. आम्लपित्ताचा त्रास होईल.... हे सारे ‘फिफा’ विश्‍वचषकामुळे होईल. जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवर अनेक देशच्या देश झुलतील. होणारा हरेक गोल, वाचलेला प्रत्येक हल्ला, पेनल्टी किक-कॉर्नर, सेकंदासेकंदानं टिकटिकणारी घड्याळे, या साऱ्या साऱ्या माहोलाचा विलक्षण परिणाम या पृथ्वीगोलावर होणार आहे. सारा मिळून नव्वद मिनिटांचा खेळ; पण त्यावर यश, कीर्ती, देशाभिमान यांचे आलेख चढत-उतरत जातात. हे सारेच अतर्क्‍य आणि अतिशयोक्‍त वाटले, तरी शंभर हिश्‍शांनी खरे आहे.

पृथ्वीगोलावर वस्ती करून राहिलेल्या तब्बल साडेसातशे कोटी मानवजातीपैकी निम्मे तरी फुटबॉलच्या ज्वराने पछाडलेले आहेत. कारण फुटबॉल हा मानवजातीच्या ‘डीएनए’मध्येच आहे. क्रिकेट, बेसबॉल आदी सांघिक खेळांची जादू विशिष्ट देशांपुरती किंवा राष्ट्रसमूहापुरती सीमित राहते. त्या खेळांची रंगत कमी लेखण्याचे कारण नाही; पण फुटबॉल हा सर्वश्रेष्ठ खेळ आहे, यात शंका नाही. भारतासारख्या क्रिकेटधर्मी देशात फुटबॉलचा कैफ तुलनेने कमीच. तरीही यंदा हा फुटबॉल ज्वर आपल्याकडे जाणवण्याइतका तापला. काही दिवसांपूर्वीच मुंबईत अंधेरी येथे झालेल्या इंटरकाँटिनेंटल स्पर्धेच्या केनियाविरुद्धच्या लढतीच्यावेळी ‘नावं ठेवा, पण बघायला या’ असे आवाहन भारताचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्री याला करावे लागले होते. अर्थात, मुंबईकरांनी त्याच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला, ही बाब सुखदच. परंतु गोवा, केरळ आणि बंगाल सोडला, तर फुटबॉलचे प्रेम इतरत्र जेमतेमच दिसते. आपण क्रिकेटवाले! उर्वरित देशांत मात्र ही परिस्थिती नाही. उभा युरोप नि संपूर्ण अमेरिका खंडातील देशवासी फुटबॉल अक्षरशः ‘जगत’ असतात. ‘जगातील सर्व बिनमहत्त्वाच्या गोष्टींमधली फुटबॉल ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे...’ असे उद्‌गार साक्षात पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी काढले होते, यात या खेळाचे सार्थ वर्णन आले आहे. जगातील सर्व ध्वज, देश, वर्ण, जाती, स्तर जोडणारा फुटबॉल हा एक जागतिक ‘धर्म’ आहे, त्यादृष्टीने रशियाने केलेला अवाढव्य खर्च हा ‘धर्माखातर’च केला आहे, असे म्हणावे लागेल.

यंदाच्या ‘फिफा’ विश्‍वचषकात ३२ देशांचे संघ महिनाभरात एकंदर ६४ सामने खेळणार आहेत. गेली दोनेक वर्षे यजमान रशियाने विश्‍वचषकाच्या पूर्वतयारीसाठी आपली इभ्रत पणाला लावली होती. हे यजमानपद मिळवण्यासाठी ‘फिफा’च्या संयोजन समितीच्या मेहरबान सदस्यांना लाच दिल्याचा खळबळजनक आरोपही तेव्हा झाला होता. चौकशीअंती रशिया निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले होते. विश्‍वचषकासाठी रशियाने तब्बल पंधरा अब्ज डॉलर खर्च केले असून, अंतिमतः हा बोजा २३ अब्जांपर्यंत वाढत जाणार असल्याने हा पांढरा हत्ती पोसणे रशियाला पुढे जड जाईल, असे इशारे अर्थतज्ज्ञांनी आत्ताच दिले आहेत. अर्थात, अशा इशाऱ्यांना घाबरून कोणी क्रीडासोहळे थांबवत नसते. दक्षिण आफ्रिकेत २०१० मध्ये झालेल्या विश्‍वचषकासाठी अनेक झोपडपट्ट्या हटवून नवी घरबांधणी मोहीम हाती घेण्यात आली होती. ती घरे पुढे ओस पडली. ब्राझीलने गेल्या खेपेला नवेकोरे महागडे स्टेडियम बांधून काढले होते, त्याचा उपयोग आताशा पार्किंग लॉटसारखा केला जातो. विश्‍वचषकाच्या निमित्ताने करण्यात आलेली ही निर्मिती अखेरीस महागात पडते, याकडे अर्थतज्ज्ञ बोट दाखवतात. परंतु, असे असले तरी विश्‍वचषकानंतर यजमान देशाच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होते; पर्यटन, घरबांधणी, उद्योगधंदे भरभराटीला येऊ शकतात, असेही आकडेवारी सांगत असते. रशियाने भरभक्‍कम आर्थिक तरतूद करून यजमानपदाची धुरा तर स्वीकारली आहे. स्पर्धेचे यशापयश अर्थात सामन्यांच्या निकालांवर ठरेल. हॉलिवुडचा सितारा विल स्मिथ, प्युर्टो रिकोचा गायक निकी जॅम आणि अल्बानियन वंशाची कोसोवोची तारका एरा इस्त्रेफी यांनी एकत्रितपणे पेश केलेले ‘लिव्ह इट अप’ हे विश्‍वचषकाचे गीत सध्या रसिकांचे पाय थिरकवू लागले आहे. ‘लिव्ह इट अप’ हे गीत फुटबॉलमधल्या अद्वितीय स्वप्नांविषयी काही सांगू पाहाते. त्या स्वप्नासाठीच तर हा सारा अट्टहास असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com