खडाखडीचे डावपेच (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

मुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या झालेल्या ताज्या पुनर्रचनेनंतर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव भाजपने कसा यशस्वीपणे आणि स्वत: नामानिराळे राहून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तडीस नेला ते दिसून आलेच होते. शिवसेनेने त्याविरुद्ध न्यायालयात जायला हवे होते. मात्र, भांबावलेल्या अवस्थेत शिवसेनेला सध्या काही सुचेनासे झाल्यासारखे दिसत आहे आणि त्याचाच फायदा उठवण्यास भाजप पक्ष सर्व ताकदीनिशी सज्ज झाला आहे.

मुंबई महापालिका आपल्या हाती आली की शिवसेना गलितगात्र होईल, हे भाजपला पूर्ण कळून चुकले आहे. त्यामुळेच शिवसेनेवर होता होईल तेवढे वार करण्यासाठी भाजपने मोक्‍याच्या क्षणी खडाखडी सुरू केली आहे. 

मुंबई महापालिकेत एका कुटुंबाच्या अखत्यारीत उभे राहिलेले "माफिया राज‘ संपवण्याचा विडा भारतीय जनता पक्षाचे बोलभांड खासदार किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे उचलल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्याच "माफिया राज‘ उभ्या करणाऱ्या पक्षाशी युती करण्याचा आपला मनोदय व्यक्‍त केला! त्याशिवाय सोमय्या यांच्या या वक्‍तव्यानंतर लगोलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सोमय्या यांची भूमिका म्हणजे भाजपची भूमिका नाही,‘ असे स्पष्ट केले. त्यामुळेच फडणवीस यांच्या शपथविधीनंतर महिनाभरानंतर नाईलाजाने सरकारात जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या एकंदरीत कुवतीचा अंदाज घेण्यासाठी या "खडाखडीच्या कुस्ती‘त सोमय्या यांना जाणीवपूर्वक तर उभे केलेले नाही ना, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात यश आल्यामुळे भाजपच्या तेल लावलेल्या अनेक पहिलवानांनी पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्याचे इंगित हे अर्थातच 35 हजार कोटींहून अधिक असा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेतील "अर्थपूर्ण‘ राजकारणात आहे, हे केवळ मुंबईकरच नव्हे तर राज्यातील जनता पूर्णपणे जाणून आहे. त्यामुळेच फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी प्रतिष्ठापना होताच, सोमय्या यांनीच शिवसेनेविरोधात तलवार उपसली होती; पण त्यांनी ती काही दिवसांतच म्यान केली. त्यानंतर भाजपने मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे दुसरे पहिलवान मैदानात उतरवले आणि त्यांनी मुंबई पालिकेतील भ्रष्टाचारावरून "खडाखडी‘ सुरू केली! त्यानंतर आता पुन्हा सोमय्या रिंगणात उतरले आहेत. 

शिवसेनेने अर्थातच आपल्या सुप्रसिद्ध "ठाकरी‘ शैलीत सोमय्या यांना "करारा जबाब‘ही दिला! "हत्ती चालत असला की त्याच्या मागून कुत्री भुंकत असतात!‘ असे जहाल उद्‌गार शिवसेनेच्या तिसऱ्या फळीतील एका शिलेदाराने काढले आणि काही तथाकथित रणरागिणींनीही टीव्ही चॅनेलवरून गरळ ओकली. परंतु, हे उसने अवसान आहे, हे दिसत होते. हे सारे घडले ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असताना. हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. खरे तर आज बाळासाहेब ठाकरे असते, तर सोमय्या यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे कुटुंबीयांची "माफिया‘ म्हणून संभावना करताच, त्यांनी भाजपला दाती तृण धरून शरण यायला लावले असते. बाळासाहेबांच्या निधनानंतर भले राज्यातील भाजप, कॉंग्रेस, "राष्ट्रवादी‘ आणि मनसे अशा चार पक्षांशी लढा देऊन उद्धव यांनी 63 आमदार निवडून आणले असले, तरी त्यामागे बाळासाहेबांवर असलेली राज्यभरातील शिवसैनिकांची अतूट श्रद्धाच कारणीभूत होती, हे विसरून चालणार नाही. मात्र, त्यानंतर शिवसेना जे काही राजकारण करत आहे, त्यात कोणतीही तर्कशुद्ध खेळी असल्याचे दिसत नाही. अगदीच ताजे उदाहरण घ्यायचे तर ते मराठा मोर्चाप्रकरणी शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यचित्राचे आहे. त्यानंतर खरे तर संपादक या नात्याने उद्धव ठाकरे यांनी लगेचच माफीनामा सादर केला असता, तर प्रकरण चिघळलेच नसते. मात्र, त्यावर नको इतका घोळ घालण्यात आला. त्यातून जो धक्का बसला त्या धक्‍क्‍यातून शिवसेना अद्याप कशी सावरलेली नाही, हेच स्पष्ट होत आहे. शिवसेनेचा पाच दशके नेमाने सुरू असलेला "दसरा मेळावा‘ घ्यायचा की नाही, असा प्रश्‍न उपस्थित व्हावा, हेही त्या धक्‍क्‍याचेच एक प्रत्यंतर म्हणावे लागेल. 

खरे तर मुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या झालेल्या ताज्या पुनर्रचनेनंतर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव भाजपने कसा यशस्वीपणे आणि स्वत: नामानिराळे राहून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तडीस नेला ते दिसून आलेच होते. शिवसेनेने त्याविरुद्ध न्यायालयात जायला हवे होते. मात्र, भांबावलेल्या अवस्थेत शिवसेनेला सध्या काही सुचेनासे झाल्यासारखे दिसत आहे आणि त्याचाच फायदा उठवण्यास भाजप पक्ष सर्व ताकदीनिशी सज्ज झाला आहे. मुंबई महापालिका आपल्या हाती आली की शिवसेना कशी गलितगात्र होऊन जाईल, ते भाजपला 1997 पासून शिवसेनेच्या साथीने केलेल्या कारभाराने पूर्ण कळून चुकले आहे. त्यामुळेच शिवसेनेवर होता होईल तेवढे पोकळ बांबूचे का होईना वार करण्यासाठी भाजपने ही खडाखडी मोक्‍याच्या क्षणी सुरू केली आहे. शिवाय "विरोधी पक्षांच्या कुंडल्या माझ्या हाती आहेत‘, हा फडणवीस यांचा इशारा शिवसेनेच्या पोटात गोळा आणू शकतो. मुख्यमंत्र्यांनी "विरोधक‘ असा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे; कारण शिवसेनाही सध्या विरोधकाच्याच भूमिकेत आहे! अंगावर बेतले की शिवसेना कशी एकदम मवाळ होऊन जाते ते जनतेने अनेकदा पाहिले आहे.

Web Title: Fight for BMC starts; BJP trying to dominate Shiv Sena