भावनांना वाट करून द्या (परिमळ)

डॉ. दत्ता कोहिनकर
डॉ. दत्ता कोहिनकर

रूपेशचे वडिलांवर खूप प्रेम होते. परंतु, वडिलांना विश्‍वासात न घेता रजिस्टर्ड प्रेमविवाह केल्याने वडिलांबरोबर त्याचे भांडण होऊन त्याला घर सोडावे लागले. पाच वर्षे झाली तरी तो वडिलांशी बोलत नव्हता. काही समारंभांत त्याला वडिलांशी बोलावेसे वाटायचे, पण त्या भावना तो अहंकारामुळे दाबून ठेवून दूर जात असे. विपश्‍यनेच्या, ध्यानाच्या शिबिरात त्याला वडिलांची आठवण आली व वडिलांनी त्याच्यासाठी घेतलेल्या कष्टांनी त्याचे मन भरून आले. अपराधीपणाची भावना त्याने आचार्यांजवळ व्यक्त केली.
शिबिर संपल्यानंतर आचार्यांनी त्याला वडिलांकडे जाऊन ""माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमचा ऋणी आहे,'' असा भाव व्यक्त करावयास सांगितले. शिबिर संपल्यावर तो थेट वडिलांकडे गेला. बेल वाजवल्यावर वडिलांनीच दार उघडावे, ही त्याची इच्छा पूर्ण झाली. घरात गेल्यावर तो म्हणाला, ""बाबा- माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमचा ऋणी आहे.'' बाबांनी हे ऐकताच त्याला मिठी मारली. दोघेही अश्रू गाळू लागले. त्या दिवशी रूपेशला मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. पुढच्या आठवड्यात वडिलांना हृदयविकाराने मृत्यूला सामोरे जावे लागले. दोन वर्षांपूर्वी वडिलांना एक ऍटॅक आला होता; पण त्यांनी रूपेशला कळवलं नव्हतं. रूपेश वडिलांना भेटून भावना व्यक्त करू शकला नसता, तर अपराधीपणाच्या भावनेने त्याला आयुष्यभर छळले असते. म्हणून मनातील भावनांना जाणून योग्य वेळी त्यांना वाट करून दिल्याने मनावरचे ओझे हलके होते. भावनांना नीट वाट करून दिली नाही, तर भावनांचा उद्रेक होऊन अनर्थ घडण्याची शक्‍यता असते.
भावनांचा उद्रेक झाला, त्यांचे दमन झाले की मनुष्य क्रूरतेकडे व नैराश्‍याकडे झुकतो. ज्या कुटुंबात जास्त कलह, व्यसन, भांडणे आहेत किंवा आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे किंवा मुलांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले आहे; अशा मुलांच्या भावनांचा उद्रेक होऊन त्यांच्या हातून हिंसक घटना घडताना दिसतात. नातवाने आजीचा खून करणे, नकार दिला म्हणून मुलीवर ऍसिड फेकणे, चाकूहल्ला करणे हे यातीलच प्रकार होत.
भावनांच्या आहारी जाऊन माणसे एकमेकांची वैरी होतात. म्हणून भावनांवर विजय मिळवणे किंवा नियंत्रण ठेवणे किंवा त्यांना योग्य ती वाट करून देणे हे महत्त्वाचे असते. भावनांचा समतोल ढळला, की निद्रानाश, रक्तदाब, अल्सर यांसारखे अनेक आजार बळावतात व ताणतणाव वाढतो. म्हणून आपल्या मनातील भावना संबंधित लोकांसमोर योग्य वेळी व्यक्त करा. फक्त व्यक्त करताना त्यामुळे आपले व समोरच्या व्यक्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच आपली प्रज्ञा जागवा. व्यक्त करता न येण्यासारख्या भावना कागदांवर लिहून काढा व न वाचता तो फाडून टाका. भावनांना वाट देण्यासाठी योग्य माध्यम शोधा. व्यायाम करा, खेळ खेळा, गप्पा मारा, विनोद करा, नाचा-बागडा, मोठ्याने गाणी म्हणा, सहलीला जा, समोरच्याचे ऐकून घ्या, त्याला सहानुभूती दाखवा. अनेक मित्र-मैत्रिणी जोडा. समोरच्याच्या भावनांचा आदर करा, दुःख झाले तर रडून घ्या; योगासने करा, ध्यान करा व आनंदाने जीवन जगण्यासाठी आवश्‍यक त्या वेळी बिनधास्त व्यक्त होऊन भावनांना वाट करून द्या. यातच सुखी जीवनाचे रहस्य दडलेले आहे.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com