ईश्‍वर आणि संत (परिमळ)

डॉ. नवनाथ रासकर
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

सामान्यपणे भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानानुसार ईश्‍वर ही संकल्पना निर्गुण, निराकार, सर्वव्यापी अशी आहे. शिवाय हा ईश्‍वर एकच आहे, एवढेच नव्हे तर सर्व सृष्टी ईश्‍वराचे रूपच आहे. "सर्वं खलु इदं ब्रह्म‘ याच मताचा आपल्या समाजमनावर पगडा अनेक शतकांपासून आहे. म्हणून सामान्यांमध्येही सर्व देवदेवता एकाच देवाची भिन्न भिन्न रूपे आहेत. ती सर्वच पूजनीय आहेत. इतर धर्मीय देव-देवतांचा सन्मानही याच दृष्टीतून केला जातो. हा संस्कार झाला. तो आपल्या देशात ज्या अनेक परंपरा आणि लोकसमूह हजारो वर्षे एकत्र नांदत आले त्याचा परिपाक आहे.

सामान्यपणे भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानानुसार ईश्‍वर ही संकल्पना निर्गुण, निराकार, सर्वव्यापी अशी आहे. शिवाय हा ईश्‍वर एकच आहे, एवढेच नव्हे तर सर्व सृष्टी ईश्‍वराचे रूपच आहे. "सर्वं खलु इदं ब्रह्म‘ याच मताचा आपल्या समाजमनावर पगडा अनेक शतकांपासून आहे. म्हणून सामान्यांमध्येही सर्व देवदेवता एकाच देवाची भिन्न भिन्न रूपे आहेत. ती सर्वच पूजनीय आहेत. इतर धर्मीय देव-देवतांचा सन्मानही याच दृष्टीतून केला जातो. हा संस्कार झाला. तो आपल्या देशात ज्या अनेक परंपरा आणि लोकसमूह हजारो वर्षे एकत्र नांदत आले त्याचा परिपाक आहे. हे बहुआयामी जीवन एकाच विशाल भारतीय समाजात गुंफण्याचे कार्य अद्वैती विचारधारेने केले. त्यामुळेच अठरापगड जातींतील संतही सर्व समाजाचे संत झाले. या भूमिकेतूनच देवत्व आणि संतत्व एकच आहे असे प्रतिपादले गेले. तात्त्विक पातळीवरून ईश्‍वर ही एक संकल्पना आहे. विश्‍व आणि विश्‍वातील सर्व घडामोडींचे कारण किंवा अधिष्ठान या अर्थाने, विश्‍वाची उत्पत्ती-स्थिती-लय घडवून आणणारी शक्ती म्हणून आपल्या परंपरेत ही संकल्पना वापरली गेली. असे असले तरी ते एक तत्त्व म्हणून मर्यादित आहे. म्हणजे ते एक विश्‍वाच्या निर्मितीचे व घडामोडींचे कोडे सोडविणारे गृहित आहे. त्याने मानवी मनाचे समाधान आणि सांत्वन होते एवढेच. असा हा ईश्‍वर "आहे-नाही‘च्या पलीकडे राहतो. हाच ईश्‍वर मानवी देहधारी होतो, तेव्हा ते त्याचे सगुण रूप असते. तोच भक्तीचा विषय होतो. वर म्हटल्याप्रमाणे ईश्‍वर हे गृहित मानले आणि ते आहे असे समजून त्यावर निष्ठा ठेवली, की ती श्रद्धा होते. तिचा ध्यास घेऊन पाठपुरावा केला की तिची प्राप्ती होते. ज्यांना ही प्राप्ती होते ते संत असतात. या प्राप्तीलाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. मी आणि सर्व सद्‌गुणांचे निधान असलेले तत्त्व एकच आहे हे कळणे याचे नाव आत्मसाक्षात्कार! म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, "देव शोधावया गेलो। देवचि होऊनी आलो।।‘ देव ही संकल्पना एखादे पद, ईप्सित असे काही मानले तर तेथे पोचणारा देवच होतो. त्यामुळे संत आणि देव यांच्यात अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे दोन किंवा अनेक नसणे. त्याने केवळ "असणे‘, "तू‘ "मी‘ हा भेद संपुष्टात येणे हेच अद्वैत होय. या अद्वैताचे भान म्हणजे आत्मसाक्षात्कार, ईश्‍वरप्राप्ती होय. मायावाद सांगतो, सर्व मिथ्या म्हणजे क्षणिक-अनित्य, तर ब्रह्म तेवढेच सत्य होय. चिद्विलासवाद सांगतो सर्वत्र चिद्‌चा-चैतन्याचा आविष्कार आहे. जग हे त्याचेच रूप, तर भगवान बुद्धांचा अनात्मवाद-शून्यवाद सांगतो, सर्व शून्यवत आहे. मी "आत्मा‘ हेच असत्य आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास हे विविध आध्यात्मिक सिद्धांत आहेत; पण त्यांची परिणती अहंकाराच्या विसर्जनातून होते. "मी आणि माझे‘ दोन्ही गळून जाते. मागे उरते ती प्रज्ञा-केवळ असणेपण-देवपण हेच संतत्व होय.

Web Title: God and the saints