मुलांच्या हिंसेमध्ये समाजाचे प्रतिबिंब 

crime in children
crime in children

ज्या समाजातील मोठी माणसे प्रश्न सोडवण्यासाठी सहज हिंसेचा आधार घेतात, त्या समाजातील मुले यापेक्षा वेगळा विचार करतील असे समजणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. हिंसेचे वातावरण तापवले की तरुण मुले त्याला बळी पडणार हे स्पष्ट आहे. 

दिल्लीतील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न या विद्यार्थ्याचा निर्घृण खून ही कुठल्याही संवेदनशील नागरिकाला हादरवून टाकणारी घटना होती. शाळेत गेलेले मूल सुखरूप घरी येणार आहे हे आपण गृहीत धरलेले असते. त्या गृहितकाला या घटनेने धक्का बसला. ज्यांची मुले शाळेत जातात, त्या पालकांना अत्यंत अस्वस्थ करणारी ही घटना होती. हा खून त्याच शाळेतील अकरावीच्या एका विद्यार्थ्याने परीक्षा पुढे ढकलली जावी या कारणासाठी केल्याचा दावा "सीबीआय'ने नुकताच केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुंबईत एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा स्वत:च्या आईचा खून करून पळून गेला. दिल्लीतील "निर्भया'च्या प्रकरणातील एक आरोपी 16-17 वर्षांचा होता. एकूणच बालपण, शाळा याविषयी आपल्या मनात जी कल्पना असते, त्याला सुरुंग लावणारे हे सगळे प्रकार आहेत. राज्यसभेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार 2010 ते 2015 या काळात बालगुन्हेगारांची देशातील संख्या 22 हजारांवरून 33 हजारापर्यंत गेली आहे. शिक्षणाविषयी मूलभूत मांडणी करणाऱ्या कोठारी आयोगाच्या अहवालात एक वाक्‍य आहे, "आपल्या देशाचे भवितव्य शाळांच्या वर्गांमध्ये घडते आहे.' वरील घटनांच्या पार्श्वभूमीवर देशाचे भवितव्य कोणत्या दिशेने घडते आहे हे सांगण्यासाठी कोणा विचारवंताची गरज नाही.

आपली मुलेदेखील आयुष्यातील छोट्या छोट्या प्रश्नांवर उत्तरे म्हणून हिंसेचा वापर करू लागली आहेत काय? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. एका बाजूला समाजात स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी हिंसेचा वापर करणे हे "नॉर्मल' झाले असल्याचा अनुभव येत असतो. केवळ आपल्यापेक्षा वेगळे विचार आहेत म्हणून गेल्या चार वर्षांत चार विचारवंतांची हत्या झाल्याचे आपण अनुभवले. त्यांचे मारेकरी पकडले जात नाहीत हे वास्तव आहे. दिल्लीत आरुषी आणि हेमराजचा खून झाला. तो कुणी केला माहीत नाही. सांगलीत पोलिसांनी मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. अशा असंख्य घटना सांगता येतील. "आमची मागणी मान्य झाली नाही, तर दगड उचलू,' "प्रेमाने दिले तर ठीक, नाही तर हिसकावून घेऊ' असे म्हणणारे लोक आज नेते झाले आहेत. या सगळ्यांचा कुमारवयातील मुलांवर काय परिणाम होतो याचा आपण गांभीर्याने विचार केला आहे काय? ज्या समाजातील मोठी माणसे प्रश्न सोडवण्यासाठी सहज हिंसेचा आधार घेतात किंवा समर्थन करतात, त्या समाजातील मुले यापेक्षा वेगळा विचार करतील असे समजणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेणे नव्हे काय? वाहिन्यांवरील कार्यक्रमांत दाखवली जाणारी हिंसा आणि सोशल मीडियावरील संवादात दिसणारी द्वेषभावना यांचा विचार केला, तर एकुणातच हिंसेच्या विषाणूचा कसा सर्वत्र प्रादुर्भाव झाला आहे हे लक्षात येते.

दिल्लीतील हवा प्रदूषित झाली तर पहिला फटका मुलांना बसतो, तसेच समाजातील हिंसेचे वातावरण तापवले की कुमारवयीन, तरुण मुले त्याला बळी पडणार हे स्पष्ट आहे. कुटुंब व्यवस्थेची उसवती वीणही याला एका अंगाने कारणीभूत असते. आई-वडिलांना वेळ नसणे, घरात संवादासाठी नातेवाईक नसणे या सगळ्यांमुळे मुले पहिल्यांदा वाट चुकतात, तेव्हा संवाद करण्यासाठी असलेल्या जागा झपाट्याने कमी झाल्या आहेत. संवादाची माध्यमे इतकी वाढली असताना असे होणे हे खरे तर विसंगत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाचाही "सक्‍सेस ऍट एनी कॉस्ट' हा एकमेव नारा झाला आहे. त्यामधून, "परीक्षेत अयशस्वी होणारे म्हणजे कुचकामी असणे' अशी सार्वत्रिक भावना वाढीला लागली आहे. 

परीक्षा किंवा पालकसभा कुणाला तरी इतकी नकोशी वाटावी की त्याने दुसऱ्याचा खून करावा हे घडण्याची शक्‍यता यामधूनच निर्माण होते. "थोडे मार्क कमी पडले तरी चालतील' "काही चुका झाल्या तरी चालतील' पण काहीही करून यशस्वी होण्यासाठी अनैतिक गोष्ट करायची नाही, हा साधा सोपा विचार करणे आपण बहुतेक सोडून दिला आहे. 

टोकाची हिंसा करणारी मुले समाजात अचानक निर्माण होत नाहीत. कुटुंबात, शालेय आणि महाविद्यालयीन व्यवस्थेत ते आपल्या "वेगळ्या' वागण्याची झलक आधी दाखवत असतात. शाळेतील विविध नियम मोडण्याकडे त्यांचा कल असतो. दुसऱ्याला त्रास देताना त्यांना फारसे वाईट वाटत नाही. त्यांच्या पालकांकडे त्यांना द्यायला वेळ नसतो किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याचे समर्थन पालक करताना दिसतात. अशी मुले वेळीच ओळखणे आणि त्यांना समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करणे याची यंत्रणा समाज म्हणून आपण तयार केली पाहिजे. आपल्याला या मुलांचा द्वेष करायचा नसून, त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या हिंसक प्रवृत्तीचा करायचा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. याच्याच सोबतीला शिक्षणात केवळ अभ्यासात यशस्वी होण्याला दिले जाणारे अतिरिक्त महत्त्व कमी केले पाहिजे. ताण सहन करण्याची क्षमता वाढवणे, अपयश पचवणे, नकार पचवणे अशी महत्त्वाची जीवन कौशल्येही अभ्यासक्रमात यायला हवीत. यशस्वी करिअरपलीकडे एखादा खेळ खेळता येणे, छंद असणे हेही महत्त्वाचे आहे हे मुलांना सांगितले पाहिजे. स्वत:च्या आयुष्यात अर्थपूर्णता वाटू लागली तर दुसऱ्याला हिंसेने त्रास देण्याची गरज मुलांना वाटणार नाही. 

या सगळ्यांबरोबर आपले प्रश्न सोडवण्यासाठी हिंसेचे समर्थन करणे हे एक सजग नागरिक म्हणून आपण टाळले पाहिजे. त्यात तात्कालीन फायदा होईल, पण दीर्घकालीन समाजाचा तोटा आहे. वाहिन्यांवरील कार्टून आणि मालिकांमधील हिंसाही मुलांच्या मनावर थेट परिणाम करते. तेव्हा ते शक्‍य तितके मुलांपासून दूर ठेवले पाहिजे. त्यासाठी त्यांना वेगवेगळे पर्याय दिले पाहिजेत आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मुलांनी जसे वागू नये असे आपल्याला वाटते, तसे आपणही न वागणे आणि मुलांना वेळ देणे. आपल्या मुलांमध्ये होणारा बदल हा पालकांइतका कोणीही पटकन टिपू शकत नाही. प्रद्युम्न किंवा "निर्भया'च्या जागी आपल्या कोणाचेही मूल असू नये आणि त्यांना त्रास देणाऱ्या ठिकाणी इतर कोणतेही मूल असू नये यासाठी आपण हे करायलाच हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com