श्रद्धेवर विश्वास

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 20 जून 2017

खरी श्रद्धा कुठल्याही परिस्थितीत विश्वास डळमळू देत नाहीत. कितीही कठीण परिस्थिती असली तरी चांगलेच होणार यावर खऱ्या श्रद्धावानांचा इतका विश्वास असतो, की त्याही परिस्थितीत ते आपले संतुलन ढळू देत नाहीत

एकदा एका गावात भयंकर दुष्काळ पडला. लोक पावसाची आतुरतेने वाट पाहू लागले. पावसाळा सुरू झाला तरीही पावसाचे लक्षण दिसेना. गावात सगळेच श्रद्धाळू, त्यामुळे सर्वांनी इंद्रदेवाची प्रार्थना करायचे ठरवले. संपूर्ण गाव मंदिरात जमा झाला. मंदिराच्या गाभाऱ्यात लोकांना उभे राहण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. तेथे एक लहान मुलगा छत्री घेऊन आला. छत्री पाहून लोक हसू लागले. एक-दोघे त्याला इतक्‍या गर्दीत छत्री उघडून का उभा आहेस, म्हणून रागावलेही. तेव्हा तो म्हणाला, ""तुम्ही पावसासाठी देवाकडे प्रार्थना करणार आहात ना, मग पाऊस आल्यावर छत्री नको काय?''

आपल्यापैकी बहुतेकांची श्रद्धा त्या गाववाल्यांसारखी असते. आपण पूजाअर्चा करतो, अनेक कर्मकांड करतो आणि फार श्रद्धाळू असल्याचा आव आणतो; परंतु त्या लहान मुलासारखी किती लोकांची खरीच मनापासून श्रद्धा असते?

खरी श्रद्धा कुठल्याही परिस्थितीत विश्वास डळमळू देत नाहीत. कितीही कठीण परिस्थिती असली तरी चांगलेच होणार यावर खऱ्या श्रद्धावानांचा इतका विश्वास असतो, की त्याही परिस्थितीत ते आपले संतुलन ढळू देत नाहीत. बिकट परिस्थितीत काळजी असते; परंतु काहीही घडले, तरी त्यामागे परमेश्वराची कुठली तरी मोठी योजना आहे आणि आता जरी वाईट दिसत असले, तरी माझ्यासाठी जे सर्वांत चांगले आहे, तेच मला मिळाले आहे, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. इतका अटळ विश्वास जिथे असतो, तिथे कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही दिसतो.

जिथे श्रद्धा केवळ कर्मकांडाची किंवा भीतीपोटी असते, तिथे कठीण परिस्थिती दिसताच सर्वांचे वागणे बदलते. सगळे एकमेकांवर दोषारोप करतात. आपला फायदा कसा करून घेता येईल, हाच सर्वांचा महत्त्वाचा मुद्दा असतो. चिडचिड, रडारड वाढते. थोडक्‍यात श्रद्धा सोडून बाकी सर्व भावना उचंबळून आलेल्या दिसतात.

तुम्ही पूजा करता, प्रार्थना करता, ते नेमके कशासाठी असा एकदा विचार करून पाहा. तुमची श्रद्धा अटळ असावीच, असा माझा आग्रह नाही; पण ज्या पूजेच्या आणि कर्मकांडाच्या नावाखाली आपण पैसा खर्च करतो, वेळ घालवतो आणि कधीकधी दुसऱ्यांना कमी लेखतो, त्याचा कमीत कमी आपल्याला फायदा तरी व्हायला हवा.

त्या छत्रीवाल्या लहान मुलासारखी निरागस आणि मनापासून श्रद्धा असली, की आपला प्रत्येक प्रयत्न हा पूजेचे रूप घेतो. मूर्तीसमोर हात जोडून बसणे हीच फक्त भक्ती नसून रोजचे काम, ऑफिस, घरकाम, मुलांचा अभ्यास घेणे, घर स्वच्छ ठेवणे इत्यादी सर्व कामे पूजेचे रूप घेतात, कारण तेव्हा मनापासून विश्वास असतो, की मी माझे कर्तव्य चोखपणे पार पाडले आहे. तेव्हा त्यातून जे काही मिळेल, ते माझ्या चांगल्यासाठीच असेल.

आज तुम्हाला माझा प्रश्न आहे- तुमच्या श्रद्धेवर तुमचा पूर्ण विश्वास आहे काय?