सौहार्द

सौहार्द

सध्या सर्वत्र सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचे प्रयत्न होत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे. त्यामुळेच गतकाळातील इसापनीती कथा आणि धार्मिक, ऐतिहासिक व अन्य मिथके यांना नवा अर्थ देणे ही काळाची गरज आहे. ससा - कासवाची गोष्ट पाठ्यपुस्तकात आज बदलली आहे. ससा - कासवाच्या शर्यतीत, सशाला पळताना जलाशय दिसला. तो थांबला; इतक्‍यात कासव आले. म्हणाले, "माझ्या पाठीवर बस.‘ ससा बसला आणि दोघांनी जलाशय पार केला. दोघेही जिंकले... कारण शर्यत, शर्यत राहिली नव्हती. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत सर्वत्र, एकत्र जाण्याची आवश्‍यकता आहे, तरच स्वार्थ संपून सौहार्द संपादन करता येईल. 


एलिना ही ब्युटीपार्लर चालवून संसार करायची. तिच्या मुलाने ही ओढाताण बघितली व परीक्षा संपल्यावर तो आईला म्हणाला, "मी एक महिनाभर काम करतो आणि पैसे मिळवतो; म्हणजे शिक्षणाच्या फीसाठी उपयोग होईल.‘ एका ऑफिसमध्ये काम करून त्याने पाच-सात हजार रुपये मिळवले. आईच्या हातावर पैसे ठेवताना तो म्हणाला, "आई, मी पुन्हा लहान होऊ शकेन का गं?‘ आई म्हणाली, "नाही बाळा, आता ती वेळ निघून गेली. आता तू दिवसेंदिवस वयाने वाढत जाणार. पण तू असं का विचारतोस?‘ मुलगा म्हणाला, "मी फक्त एक महिना कामाला गेलो; परंतु गाडीचा प्रवास करून शरीर खूप थकायचे.‘ आई पुढे म्हणाली, "मनालाही थकवा येतो. शरीर थकले की माणूस म्हातारा होत नाही; पण मन थकले; की म्हातारपण लवकर येते. म्हणूनच अभ्यासाच्या वेळात अभ्यास करायचा आणि अभ्यासाची वर्षे पूर्ण झाली; की मग नोकरी, मौजमजा - लग्न या गोष्टी करायच्या. मोठं झाल्यानंतर जबाबदाऱ्या टाळताच 

येणार नाहीत. योग्य वेळी, योग्य ते आणि वयाला प्रकृतीला झेपेल तेच करावं.‘
सशासारखं उड्या मारत पुढे गेलं, तर पुढे जाण्याचा, लवकर पोचण्याचा आभास निर्माण होतो... परंतु तो पुढे जात नाही. सतत प्रयत्न करीत, आपल्या चालीत पुढे चालणाराच यशस्वी होतो. हे ससा - कासवाच्या जुन्या गोष्टीतून सिद्ध झालं खरं... परंतु तो शर्यतीचा कालखंड कालबाह्य झाला आहे. आज एकमेकांना समजून घेत, स्पर्धा करायचीच झाली; तर ती स्वतःशीच, अशा विचाराने स्वतःमध्ये विधायक बदल घडवीत करावी लागेल. दुसऱ्यांपेक्षा अधिक यशस्वी, अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न केला; तर तीच आपल्या मार्गातील खीळ ठरते.
एलिनाने आपल्या मुलाला नोकरीचा अनुभव घेऊ दिला. अभ्यासाच्या वयात पैसा कमवण्याचे बरे - वाईट परिणाम समजावून देताना, तिने त्याला "बायबल‘मधील सीडर वृक्षाचे उदाहरण दिले. सीडर म्हणजे खजूर वृक्ष वर्षानुवर्षे टिकतो. कारण त्याची वाढ हळूहळू होते. गवत लवकर उगवते व अल्प काळात नाहीसेही होते. एकावेळी अनेक ठिकाणी लुडबूड करणारा माणूस, एका रात्रीत खूप मोठं होण्याचं दिवास्वप्न बघणारा, फुग्यातील हवा संपली की फुगा चिमटतो, तसा चिमटून जातो. आपण सारी निसर्गाची लेकरं आहोत. निसर्गातील प्रत्येक घटकाची विशिष्ट प्रकृती आहे... ती प्रकृती सांभाळत, एकमेकांच्या हातात हात गुंफून मार्गक्रमणा केली; तर प्रवास सुखकर होईल! निःसंदेह!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com