गृह आणि गृहस्थी (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

प्रिय नानासाहेब फडणवीस,

 सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र... विनंती विशेष. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. यंदाही आपण ‘वर्षा’ बंगल्यावर गणेशाची प्रतिष्ठापना केली असेल व एव्हाना पंधरावीस उकडीचे मोदक उदरात गेलेही असतील. मागल्या खेपेस आपण आमच्या घरी जेवायला आला होता, त्याची आठवण अजून ताजी आहे. पुढचे तीन दिवस आम्ही फोडणीचा भात खात होतो. असो.

प्रिय नानासाहेब फडणवीस,

 सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र... विनंती विशेष. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. यंदाही आपण ‘वर्षा’ बंगल्यावर गणेशाची प्रतिष्ठापना केली असेल व एव्हाना पंधरावीस उकडीचे मोदक उदरात गेलेही असतील. मागल्या खेपेस आपण आमच्या घरी जेवायला आला होता, त्याची आठवण अजून ताजी आहे. पुढचे तीन दिवस आम्ही फोडणीचा भात खात होतो. असो.

पत्र लिहिण्यास कारण की सध्या राज्यातील पोलिस भयंकर असुरक्षित झाले असून, अत्यंत धोकादायक स्थितीत कर्तव्य बजावत आहेत. कोणीही लुंगासुंगा उठतो आणि पोलिसांना जीवघेणी मारहाण करतो, हे चांगले लक्षण नाही. कायद्याचा रक्षकच मार खाऊ लागला तर रयतेने कुठे जायचे, असा सवाल रयत करत आहे. पण माझा सवाल खासगी आणि जरा वेगळा आहे.

काल रोजी ‘मातोश्री’वर पोलिसांचे कुटुंबीय येऊन गेले. ‘आमच्या ‘ह्यांच्या’ सुरक्षिततेसाठी काहीतरी करा अशी विनंती त्यांनी केली. त्या कुटुंबीयांनी अतिशय हृदयद्रावक कहाण्या सांगितल्या. एक पोलिसपत्नी डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, ‘‘...आजकाल मी तर आमचे ‘हे’ वर्दी घालून कर्तव्यासाठी निघतात, तेव्हा त्यांच्या हातावर दह्याची कवडी ठेवू लागले आहे!’’ मी हादरलोच. दही घेताना आमच्या ‘ह्यांच्या’ही डोळ्यांत पाणी येते असेही ती सांगत होती. खोटे का सांगू? ऐकताना माझ्याही डोळ्यांत पाणी आले. मला दही चालत नाही. माझ्या तळहातावर दही ठेवले की माझ्याही डोळ्यांत पाणी येते. असो.

पोलिस असुरक्षित होणे हे कशाचे लक्षण आहे? मी सांगतो. पोलिस खाते म्हणजेच गृहखाते सांभाळणाऱ्या गृहस्थाचे स्वत:च्या घराकडे अजिबात लक्ष नसून शेजारच्या घराच्या खिडकीकडेच अधिक लक्ष असल्याचे हे लक्षण आहे. होम मिनिस्टरचा जबरदस्त होल्ड असावा लागतो. तुमचा तसा नाही, हे कुठलाही पोलिसच काय, चोरदेखील सांगेल! असो.

...आमच्या घरासमोर गेली कित्येक वर्षे पोलिस बसलेले असतात. त्यांची अवस्था किती वाईट आहे! प्रदीर्घ ड्यूट्या, सुट्ट्यांची वानवा, त्यात पब्लिककडून होणारी जीवघेणी मारहाण... माणसाने जगायचे कसे? ह्या पोलिसांपैकी काही पोलिसांनी जिवाच्या भीतीने आमचे संरक्षण बंद केले तर आम्ही कसे फिरायचे, हा खरा प्रश्‍न आहे.

लौकरात लौकर कार्यवाही करून होम मिनिस्टरचे पद आमच्या पक्षाला देऊन टाकावे, आणि निश्‍चिंत व्हावे, असे सुचवतो. पाहा, विचार करा. कळावे. आपला. उ. ठा.

प्रिय उधोजीसाहेब, जय महाराष्ट्र. आपले पत्र मिळाले, तेव्हा शेवटचा मोदक पोटात गेला होता. असो. श्रींचे आगमन झाल्याने (विदर्भासहित) महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनात प्रसन्नता भरून राहिली आहे. तुमचे पत्र वाचून प्रसन्नतेत भरच पडली. पोलिसांना होणारी मारहाण हा माझ्याही चिंतेचा विषय आहे. किंबहुना, माझ्या (विदर्भासहित) महाराष्ट्रात कोणालाच मारहाण वगैरे होऊ नये ह्या मताचा मी आहे. अहो, उकडीचे मोदक आवडीने खाणारा मी! मला मारहाणीसारखे तामसी प्रकार आवडणे अशक्‍यच. पण ह्याचा अर्थ माझे गृह खात्याकडे लक्ष नाही, असा होत नाही. पोलिसांना होणाऱ्या मारहाणीच्या प्रकारांची मी गंभीर दखल घेतली आहे. ‘‘पोलिसांना हेल्मेट कंपल्सरी करावे’’ अशी सूचना मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना गुप्त बैठकीत केली होती. पण पुण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हेल्मेटसक्‍तीला विरोध केलान!! असो.

 

‘वर्षा’ बंगल्यातून बाहेर पाहिले की मुख्यमंत्र्याच्या हपिसाचीच कचेरी दिसते. त्यातून अत्यंत करकरीत चेहऱ्याचे अधिकारी वावरताना दिसतात. तिथून मी पाहिले तर हेच अधिकारी खिडकीतून उलट पाहात भिवया उडवत ‘काय्ये?’ असे खुणेने विचारतात. मी कायमस्वरूपी पडदे लावून घेतले आहेत. मग माझे लक्ष खिडकीबाहेर का असावे?

तरीही तुम्ही म्हणत असाल, तर गृह खाते मी तुमच्या पक्षाला द्यायला तयार आहे. पण त्यात तुमचेच नुकसान आहे. कसे, ते तुम्हाला कळेलच! कळावे. आपला. नाना.

ता. क. : गृहखाते तुमच्याकडे द्यावे, अशी तुमच्या चुलतबंधूंचीही शिफारस आहे! (आता) कळवा!!

Web Title: Home and household