विनाशकाले... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

सिंध प्रांतातील दहशतवादी हल्ल्याबद्दल कथित शत्रूवर; तसेच अफगाणिस्तानसारख्या देशावर ठपका ठेवण्याऐवजी किंचित जरी आत्मपरीक्षण केले, तरी पाकिस्तानला या संकटाच्या मुकाबल्याचा मार्ग सापडू शकेल.

सिंध प्रांतातील दहशतवादी हल्ल्याबद्दल कथित शत्रूवर; तसेच अफगाणिस्तानसारख्या देशावर ठपका ठेवण्याऐवजी किंचित जरी आत्मपरीक्षण केले, तरी पाकिस्तानला या संकटाच्या मुकाबल्याचा मार्ग सापडू शकेल.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सेहवान शरीफ गावात सुफींच्या प्रार्थनास्थळाजवळ झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध व्यक्ती प्राणास मुकल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया तो देश दहशतवादाच्या प्रश्‍नाकडे अद्यापही किती मर्यादित दृष्टिकोनातून पाहत आहे, याचाच दाखला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना कारवायांसाठी भुसभुशीत का वाटतो आहे, याचीही कल्पना त्यावरून येते. हा देशाला थेट धोका आहे, असे सांगतानाच शरीफ यांनी ‘लवकरात लवकर हल्लेखोरांना पकडून कायदेशीर कारवाई करू’, असे सांगितले; तर लष्करप्रमुखांनी गर्जना केली, की देशाशी शत्रुत्व करणाऱ्या शक्तींचा आम्ही निःपात करू. पाकिस्तानशी शत्रुत्व करणाऱ्या अशा कोणत्या शक्ती आहेत, की ज्या दहशतवादी कृत्यांत सामील आहेत, याचा त्यांनी खुलासा केलेला नाही; परंतु लष्करी प्रवक्‍त्याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातील अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवित पाकिस्तानचे शत्रू हे प्रकार घडवत आहेत. पश्‍चिम आशियातील संघर्षात पीछेहाट होत असताना दहशतवादी संघटना अफगाणिस्तान-पाकिस्तान क्षेत्रात हालचाली वाढवीत आहेत, हे खरेच आहे, त्यामुळे वरकरणी या अपेक्षित आणि योग्य प्रतिक्रिया वाटू शकतात; पण त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे दहशतवादाचे सर्वभक्षक, मानवी संस्कृतीविरोधी स्वरूप लक्षात घ्यायलाच पाकिस्तानी राज्यकर्ते अद्यापही तयार नाहीत. दहशतवादाचा सरसकट निषेध करायला त्यांची जीभ चाचरते, याचे कारण धार्मिक मूलतत्त्ववादाचा आधार घेत निरपराध माणसांच्या कत्तली करीत सुटलेल्या दहशतवादी टोळ्यांमध्येही फरक करण्याची त्यांची (अ)नीती. त्याचेच भीषण परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत असूनही त्यांच्या धोरणामध्ये बदल दिसत नाही. उत्तर वझिरीस्तान भागात गेल्या दोन वर्षांपासून दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराने मोहीम उघडली आहे हे खरे आहे; परंतु काश्‍मीरमध्ये घातपात घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध ढीगभर पुरावे सादर करूनही त्यांना आंजारणे-गोंजारणे पाकिस्तानने चालूच ठेवले आहे. ‘जैश-ए-महम्मद’ आणि ‘लष्करे तय्यबा’ या संघटनांचे म्होरके पाकिस्तानात खुलेआम भारतविरोधी गरळ ओकत फिरत असतात. पाकिस्तानी व्यवस्थेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा आणि प्रोत्साहनाशिवाय हे शक्‍य नाही; पण दहशतवादी आगीशी असा खेळ करणे हे विनाशाला निमंत्रण देणे आहे, त्यामुळेच पोखरत चाललेल्या पाकिस्तानी भूमीवर ‘इसिस’ या कडव्या मूलतत्त्ववादी संघटनेला हातपाय पसरायला संधी मिळते आहे.  
 
मूलतत्त्ववाद्यांना कोणतेच वैविध्य खपत नाही. आपल्या संप्रदायाला पहिला धोका या उपपंथांपासून आहे, असे त्यांना वाटत असते. त्यातही सुफी पंथासारखा, काहीसा मवाळ मानला जाणारा प्रवाह म्हणजे त्यांना आपल्या मार्गातील धोंड वाटते. कारण वैविध्य निर्माण झाले, की धर्मतत्त्वांचा, रूढींचा अर्थ लावण्याविषयीच्या स्वातंत्र्याचा अवकाश रुंदावतो. स्वातंत्र्याशी तर ‘इसिस’सारख्या इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटनेचा उभा दावा, त्यामुळेच या संघटनेने ठिकठिकाणच्या शिया, अहमदी, सुफी आदी पंथियांना लक्ष्य केलेले दिसते. अलीकडच्या काळात लाहोर, क्वेट्टा, पेशावर येथेही दहशतवाद्यांनी हल्ले केले. कथित शत्रूवर; तसेच अफगाणिस्तानसारख्या देशावर ठपका ठेवण्याऐवजी किंचित जरी आत्मपरीक्षण केले, तरी पाकिस्तानला या संकटाच्या मुकाबल्याचा मार्ग सापडण्यास मदत होईल. त्या देशाच्या दुटप्पी वर्तनाची जाणीव आता जगभर होत असून, अमेरिकी प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलली पाहिजेत, असे तेथील ‘थिंक टॅंक’ना वाटू लागले आहे. दहशतवाद्यांची रसद आटविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या समितीच्या पॅरिसमधील बैठकीतही हा विषय उपस्थित झाला. पाकिस्तान दहशतवादाला चिथावणी देणे शक्‍य नाही, याचे कारण हा देशच दहशतवादाचे लक्ष्य आहे, असा युक्तिवाद पाकिस्तानी नेते करीत असतात; परंतु त्यातील फक्त उत्तरार्धच खरा आहे. याचे एकमेव कारण दहशतवादाबाबतचा सोईस्कर दृष्टिकोन. दुर्दैवाने अमेरिका; पश्‍चिम आशियातील अनेक देशही या दोषाचे धनी आहेत. विनाशाला कारणीभूत विपरीत बुद्धी सरळ होत नाही, तोपर्यंत निरपराध लोकांचे रक्त सांडतच राहणार.

Web Title: hundred dead blast dargah in pakistan