श्रमदेवतेची आराधना

श्रमदेवतेची आराधना

खरोखर मित्रांनो, काबाडकष्टाला नैतिक मूल्यांची जोड दिल्यास जीवनाचा सन्मान सर्वत्र केला जातो. लहानपणी आजीने आम्हा मुलांना जग कधी बुडणार आहे हे तिला माहीत असल्याचे सांगितले. आम्ही उत्तराचा आग्रह धरत खूप गलका-गोंगाट केल्यावर ती म्हणाली, ज्या दिवशी माणसांच्या नजरेला थांबलेली, निवांत बसलेली, झोपलेली मुंगी दिसेल तेव्हा जग बुडेल. आम्ही सर्वांनी खूप शोध घेतला, पण थांबलेली मुंगी आमच्या  नजरेला पडली नाही. आजीला या गोष्टीतून एवढेच सांगायचे होते, मुंगीसारखा शून्यवत-नगण्य जीव अहोरात्र काहीतरी कारीत असतो. याउलट ज्याच्या ठायी ईश्‍वराने सर्व सामर्थ्य दिले तो मात्र आपल्या नाकर्तेपणाने सर्व सामर्थ्याची प्रतारणा करतो. माणसाला परमेश्‍वराने दोन हात दिलेत ते श्रम करण्यासाठी, इतरांना आधार देण्यासाठी व रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करण्यासाठी. ‘जेथे राबती हात तेथे हरी’ ही संत गाडगेबाबांची धारणा होती.

मूर्तीसमोर बसून दोन तास मंत्रोच्चार करणाऱ्या भाविकतेपेक्षा घामाच्या रूपाने रक्ताचे पाणी करणारा व या घामाला त्यागाचा-सेवेचा सुगंध देणारा कामगार गाडगेबाबांना प्रिय होता. ज्या देशात श्रमाला प्रतिष्ठा लाभलेली असते, अथवा श्रमाची उपासना निष्ठापूर्वक केली जाते तो देश समृद्ध व अजिंक्‍य बनतो हा विचार गाडगेबाबांनी समाजासमोर प्रत्यक्ष स्वरूपात ठेवला होता. आज कमी श्रमात जास्त धन मिळविण्याची अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पण या वाममार्गाने मिळवलेला पैसा मी-मी म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांनादेखील तुरुंगाची हवा दाखवत आहे. करोडपती असणारे महाभाग आज दुःखी-कष्टी होऊन नैराश्‍याने आत्महत्या करत आहेत. कारण श्रमाला प्रतिष्ठा व नैतिक मूल्यांना डावलून केलेल्या कृत्याचे हे फळ असते.

कोणी एका शास्त्रज्ञाचे साडेतीन हजार प्रयोग फसले. परंतु पहाटेच्या वेळी प्रयोगशाळेचे दार उघडून तो कामाला लागत असे. कोणी त्याला हिणवले, ‘या वाया गेलेल्या प्रयोगाची कहाणी जगाला कळली तर? यावर तो म्हणाला, हेच प्रयोग परत करावे लागणार नाहीत, या कल्पनेने जग आनंदी होईल !

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे म्हणायचे, ‘‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.’’लहानपणीची एक बोधपर कविता सांगून जाते.

‘‘The height by greatman reached and kept were not attained by sudden flight. But they while their companions slept were toilling upwards in the night.’’

म्हणून माणसाने नेहमी दीर्घोद्योगी राहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com