दिवाळीनंतरचा विजय दिन!

Srikanth
Srikanth

भाऊबीज शनिवारी साजरी झाली आणि दीपावलीचा महाउत्सव संपला! मात्र, त्यानंतर आलेल्या रविवारच्या सुटीच्या दिवशी काय करायचे हा कोट्यवधी भारतीयांच्या मनातील प्रश्‍न सोडवला तो भारतीय क्रीडापटूंनी. या एकाच दिवशी आपल्या हॉकीपटूंनी ढाक्‍यात मलेशियाला हरवून "आशिया चषक' जिंकला, तर तिकडे दूरदेशी बॅडमिंटनचा विक्रमवीर किदांबी श्रीकांतने "डेन्मार्क ओपन' स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावले. त्याचवेळी गगनजित भुल्लरने गोल्फ स्पर्धेत विजय मिळवत "मकाऊ ओपन चषक' मिरवला. भारतीय क्रिकेटपटूंच्या पदरी मात्र न्यूझीलंडकडून पराभव आला, तरी आपल्या दोनशेव्या एकदिवसीय सामन्यात शतक झळवत विराट कोहलीने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवलाच! - आणि त्यामुळे रविवारचा दिवस हा भारतीय क्रीडाप्रेमींना सुखद आनंद देणारा ठरला.

या वेळी खरे तर आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत करत भारतीय हॉकीपटूंनी दिवाळी साजरी केली होतीच; पण अंतिम सामन्यातही जिद्दीने खेळत त्यांनी अजिंक्‍यपदावर मोहोर उटमवली. संपूर्ण स्पर्धेत जिद्दीने खेळणाऱ्या भारतीय क्रीडापटूंची उमेद अंतिम सामन्यात गारठून जाते, असा अनुभव अनेकदा येतो. मात्र, या वेळी रमणदीप तसेच ललित उपाध्याय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतिम लक्ष्य गाठले. अगदी ऐनवेळी झालेल्या प्रशिक्षकबदलाचाही परिणाम त्यांनी आपल्या खेळावर होऊ दिला नाही.

श्रीकांतचे तर करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. बॅडमिंटनमध्ये साईना नेहवाल, तसेच पी. व्ही. सिंधू विक्रम प्रस्थापित करत असताना, त्याने पुरुष बॅडमिंटनमध्ये यंदाच्या एकाच वर्षात भारताचा झेंडा एकदा, दोनदा नव्हे, तर तीन वेळा फडकवला आहे. एका वर्षात तीन अजिंक्‍यपदे पटकावणारा श्रीकांत हा साईनानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचवेळी गगनजितचे यशही लक्षवेधकच आहे. आशियाई स्पर्धेतील हा त्याचा आठवा विजय आहे.

विराट मात्र शतक झळकावूनही एका अर्थाने दुर्दैवी ठरला. अर्थात, न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही आपले चित्त विचलित होऊ न देता खंबीरपणे लक्ष्याचा पाठलाग केला आणि तेच महत्त्वाचे ठरले. विराटचे हे एकदिवसीय सामन्यातील एकतिसावे शतक आणि आता त्याच्यापुढे आहे तोही भारतीयच - सचिन! सचिनचा 49 शतकांचा एकदिवसीय सामन्यांतील विक्रमही विराट सहज पार करेल, असे त्याच्या सध्याच्या फॉर्मवरून दिसत आहे. या सर्वांनी क्रीडाप्रेमींचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com