भारतीय क्रिकेटचे जादुई वास्तव!

भारतीय क्रिकेटचे जादुई वास्तव!

महेंद्रसिंह धोनीने मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडताना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. मात्र त्याने आपली बॅट म्यान केलेली नाही, हे क्रिकेटप्रेमींचे सुदैवच. 
 

महेंद्रसिंह धोनी नावाच्या रांचीमधल्या एका रांगड्या नवयुवकाने दोनेक दशकांपूर्वी काळा कोट घालून रेल्वेच्या बोगीत तिकिटे तपासण्यातच धन्यता मानली असती, तर भारतीय क्रिकेटचे चित्र आज काही भलतेच दिसले असते. पण त्याच्याच कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचा वेल गगनावेरी पोचला, हे मात्र वास्तव आहे. आजवरचा सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून लखलखता शिरपेच मस्तकावर मिरवणाऱ्या धोनीने अखेर आपली कप्तानाची कॅप खाली ठेवली आहे. कारकिर्दीच्या अखेरच्या काही वर्षांत नेतृत्वाचा सोस मिरवण्यापेक्षा ती जबाबदारी नव्या दमाच्या कर्णधाराकडे सोपवून मन:पूत खेळून घेण्याचा त्याचा इरादा असावा हे तर उघड दिसते आहे. या उमद्या निर्णयाखातर धोनीचे अभिनंदनच करायला हवे. कारण इतका समजूतदार निर्णय करणे भल्याभल्यांना अवघड ठरते. पण धोनी शेवटी धोनी आहे. प्रतिस्पर्ध्याला बेसावध ठेवून खिंडीत गाठणारे धक्‍कादायक निर्णय घेणे, ही त्याची खासियतच होती व आहे. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा शेवटचा निर्णयही त्याने धक्‍कादायक असाच घेतला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने १९९ एकदिवसीय सामने लढले, त्यापैकी ११० जिंकले. म्हणजे विजयाची सरासरी जवळपास साठ टक्‍के झाली.  ‘टी-२०’ फॉरमॅटमध्येही त्याच्या विजयाची सरासरी जवळपास तेवढीच आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विश्‍वचषक जिंकला, चॅंपियन्स करंडकावर आपले नाव कोरले. ‘टी-२०’मध्ये तर त्याचा संघ अजिंक्‍य ठरला. हे सारे अभूतपूर्व आणि देदीप्यमान असेच होते. 

‘एमएस’ या लाडक्‍या आदरार्थी संबोधनाने क्रिकेटजगत धोनीला ओळखते. ‘कॅप्टन कूल’ अशीही एक उपाधी त्याला आहे. त्याने जेव्हा कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा भारतीय क्रिकेट संघातील वातावरण कमालीचे कलुषित होते. प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्या अगम्य प्रशिक्षणानंतर भारतीय संघ मानसिकदृष्ट्या विस्कटलाच होता. पण ‘एमएस’नं धीरोदात्तपणे संघबांधणीचे काम हाती घेतले. अनुभवी, पण दुखरे पाय महत्त्वाचे की नवा दमखम, नवी उमेद महत्त्वाची? हा अवघड निर्णय त्याला घ्यावा लागला.

अखेर खमकेपणाने क्रिकेटचे हित ओळखून त्याने सारी भिस्त नवीन चेहऱ्यांवर टाकली... पाहता पाहता एक जबरदस्त संघ उभा राहिला. हे नि:संशय धोनीचे कर्तृत्व मानावे लागेल. पराभवाने तो कधी खचला नाही, विजयाने कधी मातला नाही. कर्णधारपदाच्या ओझ्याखाली सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजाचे काय झाले, हे साऱ्या क्रिकेटविश्‍वाने पाहिले आहे. धोनीने ही गल्लत केली नाही. त्याचे लक्ष्य निश्‍चित असायचे. तीन वर्षांपूर्वी २०१४ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला, तेव्हाही त्याचे लक्ष्य होते, मर्यादित षटकांच्या खेळात अधिक उंची गाठण्याचे.

आताही नेतृत्व सोडण्याच्या निर्णयात त्याचे लक्ष्य ढळलेले नाही. २०१९च्या विश्‍वचषकापर्यंत कप्तान विराट कोहली अर्थातच तावूनसुलाखून निघालेला असेल, या विचारानेच धोनीने हा निर्णय घेतला असणार. अर्थात फलंदाज म्हणून त्याने आपली बॅट म्यान केलेली नाही, हे योग्यच. कारण त्याच्यात अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. ‘धोनीने निवृत्तीच्या भानगडीत पडू नये, तसा काही निर्णय त्याने घेतला तर मी रांचीत जाऊन त्याच्या घरासमोर आंदोलन करीन,’ असा प्रेमळ दम सुनील गावसकर यांनी जाहीररीत्या भरला, तो खरे तर तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचा सामूहिक उद्‌गार मानायला हवा! त्याहूनही अधिक बोलकी प्रतिक्रिया विराट कोहलीची आहे. तो म्हणाला, ‘एमएस हा माझ्यासाठी आयुष्यभराचा कर्णधार आहे.’

कलाविश्‍वात ‘जादुई वास्तव’ नावाची संकल्पना आहे. म्हणजे एखाद्या काल्पनिक कलाकृतीत वास्तवाचा थोडका रंग भरला, तर त्या कलाकृतीचे मोल कैक पटीने वाढते. त्या अर्थाने कर्णधार एमएस धोनी हे भारतीय क्रिकेटचे जादुई वास्तव आहे, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com