मुलाखत (ढिंग टांग)

मुलाखत (ढिंग टांग)

वातावरण तंग होते, तणावाचे होते, तापलेले होते. साहेबांची म्यारेथॉन मुलाखत घ्यायला आम्ही गेलो होतो. दालनातील स्टुलावर, मस्तकाला हात लावून थिंकरच्या सुप्रसिद्ध पोजमध्ये साक्षात साहेब बसलेले. हनुवटीला आधार देणारी दोन बोटे आणि आक्रसलेल्या भिवया...त्यांची चिंतन-समाधी आम्हाला मोडवेना! साहेब असे थिंकिंग मोडमध्ये, आणि आम्ही असे उभेच्या उभे! मुलाखत कशी होणार? अखेर आम्ही खाकरलो. तसे पाहू गेल्यास आमचे खाकरणे आमच्या चाळीत फेमस आहे. कोपऱ्यावरच्या खोलीतला बापू नेनासुद्धा कायम दचकून जागा होतो. पण इथे? छे! इथे काही उपाय झाला नाही. उधोजीसाहेबांची चिंतन-बैठक काही केल्या मोडली नाही...
"जय महाराष्ट्र! कसला विचार करताय इतका?,‘‘ आमचा पहिला सवाल.
"फुस्स्स्सस...!,‘‘ विश्‍वाची पोकळी भरून टाकणारा एक सुस्कारा.
"सध्या काय चाललंय?,‘‘ आमचा दुसरा (धूर्त) सवाल. मुलाखतीची सुरवात नेहमी हवापाण्याच्या गप्पा किंवा खेळीमेळीने करावी. मुलाखत देणाऱ्यास आधी कंफर्टेबल करावे. मग हळूहळू विषयाला हात घालावा!! आणि इथे तरी आम्ही दुसरे काय करणार? मोबाईल फोन फ्लाइट मोडवर टाकावा, त्याप्रमाणे मुलाखत देणारा चिंतनाच्या मोडमध्ये गेलेला. असे झाले की मुलाखतकर्त्याचा (पक्षी : आमचा) बीमोड होतो. असो.
"सध्या फॉग चल रहा है..,‘‘ हनुवटीखालचा पंजा काढत साहेबांनी दुसरा वैश्‍विक सुस्कारा टाकलान.
"फ-फ-फ-फॉग?,‘‘ प्राणांतिक दचकून आम्ही नकळत किंचाळलो.
"आम्ही "भॉक‘ नाही केलं तुम्हाला? साधं "फॉग‘ म्हणालो!!..असे ओरडताय काय? गाढव कुठले!!,‘‘ आमच्या ओरडण्याने स्टुलावरून अलगद खाली आलेले साहेब सुरवार झटकत ओरडले. आमच्या खाकरण्याप्रमाणेच आमचे अधूनमधून ओरडणे अनेकांना काव आणते. पण तेही एक असो.
"फॉग म्हणालात आपण?,‘‘ आमचा तिसरा सवाल, सवाल नसून शंकासमाधान होते.
"होय, फॉग! फॉग म्हंजे काय? माहिताय ना?,‘‘ साहेबांचा प्रतिसवाल आला.
"फॉग म्हंजे आपलं ते हे...काय बरं? बरंच असतं!..,‘‘ सैपाकघराच्या फडताळात झुरळे मारण्याचे औषध फवारण्याची ऍक्‍शन करत आम्ही म्हणालो. वास्तविक आमच्या मेंदूत सगळे धुके होते.
"फॉग म्हंजे धुकं! कळलं?,‘‘ साहेबांनी शंका निरसन केले. ओहो! धुके!! आमच्या मेंदूतील अज्ञानाचे धुके दूर हटत ज्ञानाचा एक किरण थेट मस्तकात पोचून उजेड पडला.
"पण तरी तुम्ही रिलॅक्‍स दिसताय?,‘‘ आमचा सूर नकळत तक्रारीचा लागला की काय कोण जाणे! साहेब खवळलेच!!
"मग काय करणार आता? अं, काय करणार? हात चोळत बसू की, गुडघे चोळू महानारायण तेलानं अं? रिलॅक्‍स काय? आम्ही इथे भलत्या चिंतेत आहोत, आणि तुम्हाला रिलॅक्‍स दिसतोय? तुमच्या डोळ्यांना कुणी-,‘‘ साहेबांनी ओठांची भेदक हालचाल करत पुढले शब्द गिळले. पण त्याचा अर्थ आमच्या मंद मेंदूत पुरेसा संक्रमित झाल्याने आम्ही घट्ट डोळे मिटले.
"काश्‍मीर प्रश्‍नी भडका उडाला आहे!,‘‘ हमारा चौथा सवाल.
"हो ना, च्यामारी!,‘‘ साहेबांनी जीभ चावली आणि पुन्हा ते थिंकर पोजमध्ये गेले. हनुवटीखाली पुन्हा हात ठेवून ते म्हणाले, ""आम्हाला चिंता वाटते!‘‘
"...पण तुम्हाला चिंता वाटून काय उपयोग?,‘‘ मुलाखत घेणे ही आमच्यासारख्यासाठी सुळावरची पोळी आहे, हेच खरे! नकळत चुकीचा बॉल पडतो...
"तुम्ही मुलाखत घ्यायला आलाय की शिळोप्याच्या गप्पा मारायला? बऱ्या बोलानं जरा बरे प्रश्‍न विचारा!! म्यारेथॉन मुलाखतीत हे असले प्रश्‍न विचारता?,‘‘ डोळे गरागरा फिरवत दातओठ खात साहेब कडाडले.
""क्षमा करा...पुढला प्रश्‍न चांगला आहे, साहेब! कोळंबीची खिचडी चांगली की वालाचं बिरडं?,‘‘ आम्ही.
""ह्याचं उत्तर पुढल्या भागात देऊ!,‘‘ असे म्हणून साहेबांनी पुन्हा एकवार हनुवटीखाली पंजाचा आधार घेत थिंकरची पोज घेतली.
थोड्या वेळाने आम्ही पुन्हा खाकरू! इलाज नाही!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com