इस्राईलची मुजोरी आणि जगाला घोर

निखिल श्रावगे (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

भडका उडालेल्या पश्‍चिम आशियात घाईत घेतलेल्या एका निर्णयाची वा अनवधानाने झालेल्या चुकीची किंमत खूप मोठी असेल, याचे भान अमेरिकेला ठेवावे लागेल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकतीच भेट घेतली. अमेरिका नेहमीच इस्राईलचा खंदा पाठीराखा राहिली आहे. मात्र, या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इस्राईलबाबतीत बदलत असलेल्या धोरणांचे सूतोवाच केले. ‘‘अमेरिकेला द्विराज्य अथवा एका राज्याची संकल्पना यातील काहीही चालेल. हा निर्णय इस्राईल आणि पॅलेस्टाईनला घ्यायचा आहे,’’ असे त्यांनी सांगितले. अमेरिका गेली दोन दशके द्विराज्य संकल्पनेला पाठिंबा देत आहे. द्विराज्य संकल्पना म्हणजे इस्राईललगत स्वतंत्र पॅलेस्टाईनची स्थापना आणि कायमस्वरूपी शांतता व एकोप्याचे प्रयत्न. एक राज्य संकल्पना म्हणजे जेथे ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लामधर्मीय नागरिक एका राज्यात लोकशाही मार्गाने एकत्र नांदतील. पॅलेस्टाईनचा एक राज्य संकल्पनेला विरोध नाही, मात्र एक राज्य पद्धतीत इस्राईलकडून दुय्यम वागणूक मिळेल, अशी त्यांना भीती आहे. इस्राईलचा जमीन आणि अधिकार ओरबाडण्याचा इतिहास पाहता त्यांची ही भीती रास्त आहे. आक्रमक नेतान्याहू आणि त्यांच्या कट्टर उजव्या आघाडी सरकारला द्विराज्य संकल्पनेचा जाच नकोच आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे त्यांना आता स्फुरण चढले आहे. या पट्ट्यातील अमेरिकेच्या संपूर्ण परराष्ट्र धोरणाचा गाभा द्विराज्य संकल्पना राहिला आहे. याच धोरणाच्या जिवावर आंतरराष्ट्रीय गट इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांतता प्रस्थापित करू पाहत आहेत. द्विराज्य संकल्पना या समन्वयाच्या टेकूला ट्रम्प यांनी धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेला पॅलेस्टाईन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने विरोध केला आहे. यातून इस्राईलचा जोर वाढून अरब देशांबरोबरील जुने भांडण चिघळून पश्‍चिम आशियात भडका उडण्याची शक्‍यता गडद झाली आहे.

इस्राईल-पॅलेस्टाईन वाद १९४४ पासून सुरू आहे. पॅलेस्टाईनच्या जमिनीवर सुमारे तीन टक्के ज्यू लोक राहत असताना तेथे इस्राईलची स्थापना करून पाश्‍चात्त्य देशांनी कायमची वात पेटवून दिली. या संघर्षात तीन युद्धे झाली. यातील १९६७ च्या युद्धात इस्राईलने पॅलेस्टाईन भूमीचा पश्‍चिम किनारा, पूर्व जेरुसलेम व जवळपास सर्वच प्राचीन पॅलेस्टाईन आपल्या ताब्यात घेतला. पॅलेस्टाईनला नंतर गाझा पट्ट्यात आणि पश्‍चिम किनाऱ्यावर राज्य करण्यास मुभा दिली गेली. मात्र आजही तेथे इस्राईलचे लष्कर ठाण मांडून आहे. या वादग्रस्त जमिनीवरून पॅलेस्टिनी लोकांना हुसकावून इस्राईलने तेथे आपली वसाहत उभारली. याचे प्रमाण वाढत असताना, गेल्या डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात इस्राईलच्या या डावाला विरोध झाला, तेव्हा अमेरिका आपल्या पाठीशी राहील, अशी इस्त्राईलला अपेक्षा असताना ओबामा प्रशासनाने नकाराधिकार वापरला नाही. त्यामुळे नेतान्याहू व इस्राईलचे पित्त खवळले. 

ओबामा आणि नेतान्याहू यांचे संबंध कायमच ताणलेले होते. मात्र, ट्रम्प यांचा विजय निश्‍चित होताच इस्राईलच्या संसदेने सुमारे सहा हजार घरे या वसाहतीत बांधण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे एकच आगडोंब उसळला असून, एकूणच शांतता प्रक्रियेत खंड पडण्याची चिन्हे आहेत. त्यात जेरुसलेम शहरावरून मोठा वाद आहे. हे शहर ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लामधर्मीयांसाठी पवित्र श्रद्धास्थान आहे. त्यावर आता इस्राईलचा ताबा असून, ती राजधानी आहे. पॅलेस्टाईनला आपली राजधानी म्हणून जेरुसलेमच हवे आहे. अमेरिकेसह सर्व देशांचे इस्राईलमधील दूतावास तेल अवीवमध्ये आहेत. तो दूतावास आपण जेरुसलेममध्ये हलवू शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. तसे केल्यास इस्राईलने बेकायदा बळकावलेल्या जेरुसलेमला अमेरिका मान्यता देईल आणि अरब देशांना हे रुचणार नाही, ज्याचे पर्यवसान मोठ्या संघर्षात होईल. ट्रम्प यांनी इस्राईलच्या संरक्षणासाठी इराणशी झालेला अणुकरार रद्द करून इराणवरील निर्बंध कडक करण्याचा मानस जाहीर केला आहे; तसेच आपला जावई जॅरेड खुशनेर याला इस्राईल-पॅलेस्टिन वादात पंचाची भूमिका देऊन टीका ओढवून घेतली आहे. खुशनेर हे ज्यू असून, ते इस्राईलची बाजू घेतील, अशी भीती अरब देशांना आहे. त्यामुळेच अरब देश पुन्हा पॅलेस्टाईनच्या मागे एकवटू शकतात. त्यांची एकी फोडत, इस्राईलची भलावण, तसेच शांतता स्थापन करताना ट्रम्प, खुशनेर, तसेच त्यांच्या मंत्रिमंडळाची दमछाक होणार आहे. 

१९७४ च्या युद्धात पिछाडीवर गेलेल्या इस्राईलने नंतर १९७८ मध्ये इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष अन्वर सादात यांच्याशी समझोता करून त्यांना सिनाई वाळवंटाचा प्रदेश परत दिला. हे करून इस्राईलने ‘अरब लीग’मधून इजिप्तला फोडून धूर्त खेळी केली. यामुळे इस्राईलच्या विरोधात स्थापलेल्या ‘अरब लीग’मधून इजिप्तची हकालपट्टी झाली. पुढे ऑक्‍टोबर १९८१ मध्ये सादात यांची ‘इजिप्शियन इस्लामिक जिहाद’ (ईआयजे) या दहशतवादी गटाने कैरोमध्ये हत्या केली. ‘अल-कायदा’चा सध्याचा म्होरक्‍या अयमान अल-जवाहिरी, ज्याचा मूळ देश इजिप्त आहे तो याच ‘ईआयजे’चा कट्टर हस्तक! पश्‍चिम  आशियात आणि जगात इतरत्र फोफावलेल्या दहशतवादाचे मूळ कारण हे इस्राईलचा द्वेष आहे. त्यामुळेच इस्राईल आणि दहशतवाद यांचा संबंध जुना आहे. इस्राईलचा हा जमीन हडपण्याचा प्रकार व मुजोरी यामुळे दहशतवादी घटकांना उत्तेजन मिळाले आहे. इस्राईलची सध्याची ही तिरकी चाल बरीच उलथापालथ करू शकते. इस्राईलची तळी उचलून धरल्यामुळे अमेरिकेलाही दहशतवाद्यांचा रोष पत्करावा लागला आहे. ‘जगाच्या नकाशावरून दहशतवाद संपवू,’ अशी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इस्राईल-पॅलेस्टाईन प्रकरण हाताळताना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आधीच पेटलेल्या पश्‍चिम आशियात घाईत घेतलेला एक निर्णय अथवा अनावधानाने झालेली चूक अमेरिकेला आणि जगाला फार काही भोगायला लावू शकते. ट्रम्प याची काळजी घेतील, अशी अपेक्षा तूर्त बाळगूया.

Web Title: Israel's insubordination