डाव्यांचाच वरचष्मा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

केंद्रातील सत्ता हाती आल्यापासून डाव्या आणि उदारमतवादी विचारांच्या शैक्षणिक, तसेच संशोधनात्मक संस्था काबीज करण्याच्या निर्णयाला निदान "जेएनयू'ने तरी "लाल कंदील'च दाखवला आहे. शैक्षणिक, तसेच सांस्कृतिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करण्यासंबंधात किमान आता तरी भाजप व संघ परिवाराने काही धडा घ्यायला हवा

देशाच्या राजधानीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू)तील विद्यार्थी संघटनेवर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून कब्जा करण्याचे भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रयत्न यंदाही विफल ठरले आहेत. हे विद्यापीठ डाव्या, तसेच उदारमतवादी धोरणांबद्दल प्रसिद्ध असून देशभरातील "डाव्या विचारांचा बालेकिल्ला' म्हणून ते गणले जाते. यंदा तेथील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत "अभाविप'ने आपली सारी ताकद पणाला लावल्यामुळे डाव्या विचारांच्या ऑल इंडिया स्टुडंट्‌स युनियन, स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रेटिक स्टुडंट्‌स फेडरशन या तीन संघटनांनी एकजूट करून या निवडणुका लढवल्या आणि डाव्यांची ही एकजूट अभेद्य ठरली.

"अभाविप'ला हा मोठा धक्का आहे. त्याचे कारण म्हणजे केंद्रातील सत्ता हाती आल्यापासून येनकेन प्रकारेण या विद्यापीठाबरोबरच पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न उघडपणे सुरू झाला होता. सत्ता हाती आल्यानंतर अवघ्या दीड वर्षातच "जेएनयू'मधील डाव्या विचारांचा नेता आणि "जेएनयू'मधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला राष्ट्रद्रोहाच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केल्यामुळे तर भाजप सत्तेचा वापर कशा प्रकारे करत आहे, यावर प्रकाश पडला होता. मात्र, हे प्रकरण भाजपच्या अंगाशी आल्याचे पुढे देशभरात कन्हैयाच्या सभांना जमलेल्या अलोट गर्दीमुळे दिसून आले. या साऱ्याचे पडसाद यंदाच्या निवडणुकांत दिसून आले आणि अखेर या संघटनेची महत्त्वाची सारी पदे डाव्या एकजुटीच्या आघाडीनेच जिंकली! मात्र, डाव्या संघटनांना या विजयामुळे समाधान मानून चालणार नाही; कारण डाव्या एकजुटीच्या पाठोपाठ "अभाविप' संघटनेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. "अभाविप'ला यापूर्वी कधीही एवढी प्रचंड मते मिळाली नव्हती. या निवडणुकीत या दोन संघटनांशिवाय "बिर्सा आंबेडकर- फुले स्टुडंट्‌स युनियन' ही तिसरी संघटनाही मैदानात होती आणि या संघटनेचा एकूण कलही हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधातच होता. तरीही डाव्या एकजुटीचा झालेला विजय लक्षणीय होता. केंद्रातील सत्ता हाती आल्यापासून डाव्या आणि उदारमतवादी विचारांच्या शैक्षणिक, तसेच संशोधनात्मक संस्था काबीज करण्याच्या निर्णयाला निदान "जेएनयू'ने तरी "लाल कंदील'च दाखवला आहे. शैक्षणिक, तसेच सांस्कृतिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करण्यासंबंधात किमान आता तरी भाजप व संघ परिवाराने काही धडा घ्यायला हवा.

Web Title: JNU leftists