साधनशूचितेची ऐशीतैशी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी घोषित करण्याऐवजी त्यांची पाठराखण केल्यामुळे ‘पार्टी वुईथ ए डिफरन्स!’ हे भाजपचे ब्रीदवाक्‍य किती फसवे आहे, हेच समोर आले आहे.

काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’च्या काळातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याचा विडा उचलून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आपले ‘पार्टी वुईथ ए डिफरन्स!’ हे ब्रीद गेल्या अडीच वर्षांत खरे करून दाखवण्याचेच ठरवलेले दिसते; अन्यथा अरुणाचल प्रदेशातील ४५० कोटींच्या जलविद्युत प्रकल्पाच्या गैरव्यवहारात अडकलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांची भक्‍कम पाठराखण भाजपने केलीच नसती! त्याच्या जोडीलाच, ‘यासंबंधात बातम्या ‘पेरणारे’ हे या भागात आल्यास, त्यांना जोड्याने मारले जाईल!’ अशी जाज्ज्वल्य भाषा स्वत: रिज्जू यांनी केली आहे. त्यामुळे मोदी आणि भाजप यांनी कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना मंत्रिमंडळात सामावून घेतले आहे, यावरही प्रकाश पडला आहे. केंद्रात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपने विविध राज्यांतील सत्ता कोणत्याही मार्गाने हस्तगत करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू केले होते. त्यातही संघपरिवाराच्या भाषेत ‘पूर्वांचल’ म्हणून ओळख असलेल्या ईशान्येकडील राज्यांवर भाजपचा डोळा असल्याचे गेल्या वर्षभरात तेथे झालेली पक्षांतरे आणि राजकीय उलथापालथ यावरून स्पष्ट झाले होते. मात्र, या साऱ्या परिसरात भाजपचे स्थान नगण्यच होते आणि फारशी बडी नेतेमंडळीही भाजपकडे नव्हती. त्यामुळेच या परिसरातून निवडून आलेल्या रिज्जू यांना भाजपमध्ये मोठे स्थान मिळाले आणि शिवाय केंद्रात गृहखात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांची वर्णी लागली. मात्र, सत्ता हाती येताच त्यांनी त्या माध्यमातून गैरव्यवहारांनाच प्राधान्य दिल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. अरुणाचल प्रदेशातील वीजटंचाई लक्षात घेऊन ‘यूपीए’ सरकारनेच तेथे एका महत्त्वाकांक्षी वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उभारणीचा निर्णय घेतला होता. मात्र, आता काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष यांनी केलेल्या आरोपांनुसार रिज्जू यांनी त्या प्रकल्पात नको इतके लक्ष घातले आणि आपल्या नात्यागोत्यातील मंडळींनाच संबंधित कंत्राटे मिळतील, याची दक्षता घेतली! खरे तर हे आरोप इतके गंभीर आहेत की सदैव ‘साधनशुचिते’च्या गप्पा मारणाऱ्या भाजपने रिज्जू यांना तत्काळ मंत्रिपदावरून दूर करून, या आरोपांची चौकशी घोषित करायला हवी होती. त्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ‘पार्टी वुईथ ए डिफरन्स!’ हे भाजपचे ब्रीदवाक्‍य किती फसवे आणि जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारे आहे, यावरच शिक्‍कामोर्तब झाले आहे. 
अरुणाचल प्रदेशातील या प्रकल्पात झालेल्या कथित गैरव्यवहारांची गुंतागुंत ही लक्षात घेण्याजोगी आहे. खरे तर हे प्रकरण उघडकीस आले ते सार्वजनिक उपक्रम दक्षता अधिकाऱ्याने केलेल्या प्राथमिक चौकशीमुळे! रिज्जू यांनी स्वत: या प्रकल्पातील कंत्राटदार गोबोई रिज्जू - जो मंत्रिमहोदयांचा चुलत भाऊ असल्याचे निष्पन्न झाले आहे- यास पैसे देण्यासंबंधात संबंधितांना पत्र लिहिल्याचे या अधिकाऱ्याने आपल्या अहवालात नमूद केल्यामुळे या प्रकरणास वाचा फुटली. त्यानंतर बुधवारी एका वर्तमानपत्राने हा जो कोणी गोबोई आहे, त्याच्याशी संबंधित दक्षता अधिकाऱ्याचे झालेले संभाषणच प्रकाशित केले आहे. ‘भय्या का हेल्प चाहियो तो... हमको बोलिये सर!’ असे गोबोई म्हणाल्याचे त्यावरून दिसते. यावरून रिज्जू आणि हा गोबोई यांचे संबंध स्पष्ट होतात. अर्थात, या गोबोईशी आपले कोणतेही रक्ताचे नाते नाही आणि या प्रकरणी पूर्वीच्या सरकारनेच पैसे अदा केले आहेत, असा पवित्रा घेऊन मंत्रिमहोदयांनी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय पातळीवरून चौकशी करूनच भाजपने ‘दूध का दूध...’ काय आहे, ते दाखवून देण्याची गरज आहे.

‘यूपीए’ सरकारातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसद दणाणून सोडत कामकाज बंद पाडणाऱ्या भाजपने आपल्या पक्षांतील नेतेगणांवर तसेच आरोप होताच कोलाटंउडी घेत, ‘केवळ आरोप असताना राजीनामा घ्यायचा काय’, असा सवाल केला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे असा पवित्रा घेणाऱ्यांमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली व नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू हे आघाडीवर आहेत. त्यांच्या बोलण्या-वागण्यात कमालीचा तुच्छतावाद आहे आणि आताही आपल्या या जुन्या विधानांची पुनरुक्‍ती करण्यातच या दोघांबरोबर पक्षप्रवक्‍ते श्रीकांत शर्मा हेही दिसत आहेत. चुकीची बिले सादर करून या जलविद्युत प्रकल्पात सुमारे साडेचारशे रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, हा सारा वाद ऐरणीवर येण्यास भाजपमधील अंतर्गत कलहच कारणीभूत आहे की काय अशी शंका, याप्रकरणी बाहेर आलेले पुरावे बघता सहज घेता येते. संबंधित कंत्राटदाराला पैसे देण्यासंबंधात रिज्जू यांनी ऊर्जा खाते सांभाळणाऱ्या पीयूष गोयल यांना लिहिलेले पत्रही बाहेर आल्यामुळे रिज्जू यांच्या ‘कोटीच्या कोटी उड्डाणांना’ आळा घालण्यासाठी भाजपतर्फेच ही माहिती ‘लीक’ करण्यात आली की काय, अशीही चर्चा राजधानीत सध्या सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर या साऱ्या कथित गैरव्यवहाराची चौकशीच जाहीर करायला हवी, तरच ‘पार्टी वुईथ ए डिफरन्स!’ हे आपले ब्रीद भाजपला खरे करून दाखवता येईल.