जनतेचा गायक! (श्रद्धांजली)

जनतेचा गायक! (श्रद्धांजली)

चेन्नई असो की बंगळूर, आणि म्हैसूर असो की तंजावर... केवळ या महानगरांतीलच नव्हे, तर अवघ्या दक्षिण भारतातील संगीतप्रेमींच्या हृदयांचा ठाव गेली चार दशके घेणारे "संगीतसूर्य' डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांच्या निधनाने संगीतातील एक महान पर्व अस्तंगत झाले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची चर्चा करताना पंडित भीमसेन जोशी यांचे नाव समोर आले की भले भले गायक जशा आपल्या कानाच्या पाळ्या पकडतात, अगदी तेवढेच तोलामोलाचे गायक म्हणून बालमुरलीकृष्ण यांचे नाव कर्नाटक संगीत विश्‍वात आदराने घेतले जाते. संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीत हे आपल्या घराण्यापुरतेच मर्यादित ठेवले जाण्याच्या काळात बालमुरलीकृष्ण यांनी ताल आणि लय यांच्या बंदिशीत बंदिस्त झालेले संगीत दक्षिण भारतातील घराघरांत नेले आणि आपल्या अवीट सुरांची मोहिनी साऱ्या भारतवर्षावर घातली.


मात्र, दक्षिण भारतवगळता देशाच्या अन्य भागांतील जनतेला बालमुरलीकृष्ण यांची ओळख पटली ती 1988 मध्ये. तोपावेतो टीव्हीच्या शेकडो वाहिन्या घराघरांत घुसायच्या होत्या. अशा वेळी घरातील दूरदर्शनवरून लोकसेवा संचार परिषदेमार्फत जनतेपुढे आलेल्या "मिले सूर मेरा तुम्हारा...'चे सूर पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात घराघरांत घुमले आणि त्या पाठोपाठ बालमुरलीकृष्ण यांच्या तमीळ सुरांबरोबरच त्यांचे दर्शनही होऊ लागले. भारताला खऱ्या अर्थाने बालमुरलीकृष्ण यांची ओळख या राष्ट्रीय एकात्मतेच्या सुरावटीतून घडणे, हा खरे तर योगायोग. बालमुरलीकृष्ण यांचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या 15व्या वर्षीच 72 रागांवर प्रभुत्व मिळवलेले असतानाही ते केवळ शास्त्रीय संगीताच्या जडजंबाळ व्यापात अडकून पडले नाहीत. शिवाजी गणेशन यांच्या "थिरूलायादाल' या चित्रपटासाठी त्यांनी गायलेले "ओरू नालू पोथुमा' हे गीत त्यांच्या लोकप्रियतेतील मैलाचा दगड ठरले आणि पुढे चित्रपटांतील अनेक भूमिका त्यांच्याकडे चालत आल्या आणि त्या त्यांनी आपल्या गायकीबरोबरच अभिनयानेही गाजवल्या.
बालमुरलीकृष्ण हे पारंपरिक संगीताचे पाईक होतेच; पण सर्जनशीलता आणि अष्टपैलूत्व यांच्या जोरावर त्यांनी परंपरांच्या लाटांवर स्वार होत कर्नाटकी संगीतात वेगळ्या परंपराही निर्माण केल्या. याचे कारण, त्यांनी कायम वेगळा विचार केला आणि अनेकांना आपल्या नव्या सुरावटींचे शिक्षणही दिले. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रांतील एक गुरूपरंपरा पडद्याआड गेली असली तरी, त्यांचे स्फूर्तिदायक सूर आपल्याबरोबर कायमच राहतील.
..........................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com