केस रुपेरी, मने रंगली

madhav gadgil
madhav gadgil

केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.

 व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल दोनशे पंचवीस वर्षांपूर्वीच्या पुण्यातल्या रंगपंचमीचे वर्णन करणारे गीत सांगते : आले पुण्याला विजयी महादजी शिंदे महाख्यात जगांत सावजी । राज्यावरी माधवराव पेशवे होते सवाई सुख फार आठवे । शिंद्यांनी बहु रंग याच दिवसी केला असे केशरी। सारे लोक गुलालही उधळती धास्ती न कोणावरी ।। तेव्हा महादजी शिंदे होते पासष्ट वर्षांचे, तर सवाई माधवराव अवघे वीस. पण सगळ्या गाण्याच्या सुरातून स्पष्ट दिसते, की सोहळ्याला रंगवत आणि स्वतः रंगत होते ते महादजी; त्यांच्यापुढे सवाई माधवराव अगदी फिके होते.

महादजींबद्दल केवळ इतिहासात वाचतो, पण माझ्या भाग्याने उत्तरवयात रंगत राहिलेल्या एका भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला अनेक वर्षे लाभला. हे होते दिग्गज पक्षितज्ज्ञ सलीम अली. मी शाळेत असतानाच पक्ष्यांच्या ओढीमुळे त्यांची ओळख झाली होती, पण जेव्हा त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष संशोधन सुरू केले, तेव्हा ‘तुरळक कोठे केस रुपेरी, डोइस टक्कल छान, अवघे पाऊणशे वयमान’ हे त्यांचे अगदी चपखल वर्णन होते. पण रुपेरी केस सोडले, तर बाकी अगदी खणखणीत होते. जन्मभर पक्ष्यांच्या छंदातून त्यांनी अफाट ज्ञान कमावले होते, मग पासष्टाव्या वर्षी सुरवात करून पुढच्या दहा वर्षांत भारतीय उपखंडातल्या पक्ष्यांच्या दोन हजार जाती-उपजातींचे सांगोपांग विवरण करणारे दहा खंड लिहिले होते. मला म्हणाले, ‘माधव, हे मोठे काम पार पडले. आता आयुष्य पुरं रंगात आलं आहे. यापुढे देशभर पक्षी बघत मनमुराद हिंडायचे.’ पुढची सात-आठ वर्षे त्यांच्याबरोबर रानावनांत खूप भटकलो. त्या वयातही ते पक्षी न्याहाळत तुरुतुरु चालायचे, मला अगदी नवनव्या अशा पक्ष्यांच्या खुब्या समजावत राहायचे.

एकदा आम्ही दोघे आणेमलय पर्वतराजीतल्या अभयारण्यात गेलो होतो. जगभर निसर्गप्रेमी लोकांचा एक समाज आहे, त्यांच्यातल्या काहींना पद्धतशीर अभ्यासाचा छंद आहे. या सगळ्यांच्या दृष्टीने सलीम अली आणि त्यांच्या रुपेरी केसांखालचे ज्ञानभांडार मोठा आदराचा विषय होता. त्यामुळे सगळीकडेच मोठ्या प्रेमादराने आमचे स्वागत व्हायचे. आणेमलयलाही तिथले उत्साही वनाधिकारी सामोरे आले आणि त्यांनी सगळीकडे भटकायची व्यवस्था केली. जंगलात एकेठिकाणी तेव्हा अजून चालू असलेल्या जंगलतोडीसाठी हत्तींचा एक तळ बसविला होता. हत्तींच्या मातृप्रधान समाजांमध्ये नर गैरमहत्त्वाचे असतात, एका कळपातून दुसऱ्या कळपात फिरत राहतात. हत्तिणी मात्र कायमच्या एकत्र राहतात आणि सगळ्या मिळून कसोशीने चिल्लापिल्लांचे रक्षण करतात. दहा हजार वर्षांपूर्वी माणसाचे वर्चस्व अजून प्रस्थापित व्हायचे होते, त्या वेळी पंचखंडांवर गजराजाचे आधिपत्य होते. त्यांचे मोठमोठे कळप ऋतुमानानुसार शेकडो मैल हिंडत असायचे. नेमके कुठे केव्हा जावे याचे प्रचंड अनुभवजन्य ज्ञान वयस्कर माद्यांकडे असायचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कळप हिंडत राहायचे. म्हणून गजसमाजात ज्येष्ठ हत्तिणींना खास मान होता.

आणेमलयातल्या तळावरचे हत्ती दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी पाठवले जायचे; ते सायंकाळी पुन्हा एकत्र जमायचे. अशी पुनर्भेट झाली, की मोठ्या खुशीने चित्कार काढत एकमेकांना सोंडेने कुरवाळत भेटायचे. स्पष्ट दिसायचे, की त्यांच्या लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या मुशीत घडविलेल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार ज्येष्ठ हत्तिणींचे स्वागत विशेष जिव्हाळ्याने केले जायचे. सलीम अली मोठे मार्मिक विनोद करायचे; मला म्हणाले, ‘माझेही असेच स्वागत होते, नाही का रे?’
हत्तींच्याहून अगदी वेगळे असतात हरणांचे अप्पलपोटे कळप. हरणे एकटी दुकटी असली, तर शत्रूंना सहज बळी पडतात, म्हणून एकत्र जमा होतात. पण याच्या पलीकडे त्यांच्या कळपात काहीही सहकारी प्रवृत्ती, आचरण नसते. अशा कळपांत एक-दोन दांडगट नर इतरांवर अरेरावी करत असतात. पण अशा स्वार्थाधिष्ठित समाजात वयपरत्वे कमकुवत झाले की खाली ओढले जाणे अटळ असते आणि उतारवयात त्यांची दुर्दशा होते. मानवी समाज अंशतः हरणांसारखे आहेत आणि अंशतः हत्तींसारखे. आपल्या समाजात संघर्ष-स्पर्धा भरपूरच आहेत. परंतु लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या ओघात मानवी समाजांना ‘एकमेकां करू साह्य, अवघे धरू सुपंथ’ असा भक्कम सहकाराधिष्ठित पायाही लाभलेला आहे. अशा सहकारात जे खुल्या दिलाने इतरांना वाटले, इतरांबरोबर उपभोगले तर वृद्धिंगतच होते, अशा विद्याधनाची, साहित्य, संगीत, कला अशा सौंदर्याविष्कारांची खास महत्त्वाची भूमिका आहे. साहजिकच सलीम अली, मंगेश पाडगावकर, किशोरी आमोणकर यांसारख्या प्रतिभाशाली ज्येष्ठांना समाजात मानाने वागवले जाते.

आज आधुनिक माहिती- तंत्रज्ञानामुळे अशा प्रतिभेचे वरदान लाभलेल्या व्यक्तींपलीकडे जाऊन सर्वसामान्य व्यक्तींनाही ज्ञाननिर्मितीत, सौंदर्योपासनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होऊ लागली आहे. राहुल देशपांडेंसारखे श्रेष्ठ गायक स्वतःचे वेबवरचे लोकप्रिय ब्लॉग चालवतातच, पण शिवाय अनेक हौशी कवी आपापल्या, खूपदा उत्तम दर्जाच्या, कविता स्वतःच्या ब्लॉगवर प्रकाशित करत रसिकांची दाद मिळवतात. दुसरे रसिक आपापल्या ब्लॉगवर वामनपंडितांच्या ‘वेणुसुधे’पासून नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’मधील परश्‍याच्या प्रेमगीतांपर्यंत नानाविध, काव्य सगळ्यांनी खुलेपणाने सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा म्हणून चढवू लागले आहेत. जसा काव्याचा तसाच विद्येचाही छंद रंजक आहे. वेबवरचा मुक्त सर्वसमावेशक ‘विकिपीडिया’ असा छंद जोपासण्याची संधी आहे. आज पाणलोट क्षेत्र विकास हा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. यात मुरलेले हजारो नागरिक महाराष्ट्रभर, नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रात विखुरलेले आहेत. त्यांना इंग्रजी येत असो नसो, ते आपापला स्मार्टफोन वापरत मराठी ‘विकिपीडिया’ वाचू शकतात, त्यात लिहू शकतात. सध्या मराठी ‘विकिपीडिया’त पाणलोट क्षेत्र विकासाबद्दल काहीही व्यवस्थित साहित्य उपलब्ध नाही. ‘विकिपीडिया’त लेख थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने विकसित होत जातात. तेव्हा जसे मराठी काव्यरसिक आपले ब्लॉग वापरताहेत, तसे ग्रामीण विकासाची आणि तत्सबंधी ज्ञानाची आस्था असलेल्यांनी असे लेख लिहण्यात सहभागी होऊन हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याला योगदान करावे. कोणीही आबालवृद्ध स्त्री-पुरुष, अल्पशिक्षित, तसेच उच्चशिक्षित हे करू शकतील. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ब्लॉग, ‘विकिपीडिया’ हे नवनिर्मिती करत जीवन रंगवत ठेवणारे वयाला खास अनुरूप असे नवयुगाचे छंद सामोरे आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com