बनवू नादमधुर बासरी

madhav gadgil
madhav gadgil

विज्ञानातून झालेले आकलन व आधुनिक तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेली माहिती यांच्या बळावर गडचिरोलीसारख्या वनाच्छादित प्रदेशात बांबूपासून बासरी निर्मितीसारखे विविध कुटीरोद्योग उभारून रोजगार निर्माण करता येतील.  

सा हित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशू पुच्छ विषाणहीन! साहित्याची, संगीताची, कलेची चाड नसलेला मनुष्य बिनशेपटाचा, बिनवशिंडाचा पशू आहे. सौंदर्यदृष्टी ही मानवाला निसर्गाने दिलेली खास देणगी आहे. याचे मूळ माणसाच्या स्वरसमृद्ध गळ्यात आहे. आपल्या कंठाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे जीभ अशा चपलतेने हलू शकते की आपण इतर पशूंच्या अनेक पट वेगवेगळे सूर काढतो; नानाविध सूर एकाला एक जोडत शब्द, वाक्‍ये रचतो, संभाषण करतो. पन्नास हजार वर्षांपूर्वी शेकोटीभोवती रंगलेल्या गप्पांच्या कोलाहलात भाषा उपजली. दूरवरच्या व्यक्तीला साद देताना कोलाहलाचे नादात रूपांतर झाले. साद लांबवर पोचायची, तर प्रत्येक स्वर स्पष्ट वेगळा ऐकू आला पाहिजे, स्वर लांबवत ताना घेतल्या पाहिजेत, लयबद्ध संदेश पुन्हा पुन्हा आळवला पाहिजे. या खटपटीतून मंजुळ, नादमधुर गायन साकारले.

चौतीस हजार वर्षांपूर्वी मानव शिळांवर प्राण्यांची चित्रे रंगवू लागला, हस्तिदंतातून अप्सरांची शिल्पे कोरू लागला आणि याच काळात वाद्यवादन करू लागला. मानवाचा कंठ एक वायुवाद्य आहे; आणि साहजिकच जगातले सर्वांत पुरातन वाद्य गिधाडाच्या हाडाने बनविलेल्या बासरीच्या रूपातले वायुवाद्य आहे. हाडांचे अवशेष टिकतात, वनस्पतींचे जास्त सहज कुजून जातात. तेव्हा चौतीस हजार वर्षांच्या आधीही बांबू किंवा वंश अथवा बांसाने बनविलेली बासरी वाजवली जात असणे पूर्ण शक्‍य आहे. मेघदूतात कालिदास वर्णन करतो : वंशामधुनी वारा भरता उमटे मंजुळ रव. असे मधुर स्वर ऐकून भारताच्या बांबूविपुल वनप्रदेशांत बासरी घडविली गेली असणार. अशी बासरी बनवणे सोपे आहे, कारण बांबूच्या लांब-लांब तंतूंमुळे अगदी हलकी, पण बळकट व जिच्यापासून पाळण्यापासून तिरडीपर्यंत सगळे काही बनवणे जमते अशी वस्तू निर्माण झाली आहे.  

फेब्रुवारीत आपण सौंदर्याच्या दोन वेगवेगळ्या आविष्कारांचे सोहळे साजरे करतो; ‘व्हॅलेंटाइन’चा शृंगारसोहळा आणि रामन यांच्या प्रकाशकिरण रेणूंवरून विखुरताना क्वान्टम सिद्धान्ताच्या भाकिताप्रमाणे त्यांची कंपनसंख्या बदलू शकते हे दाखवून देणाऱ्या शोधनिबंधाच्या प्रकाशनाच्या वर्षदिनाचा विज्ञान सोहळा. विज्ञान आहे मानवाचा निसर्गनियम समजावून घेण्याचा खटाटोप. चंद्राच्या कलांसारखी डोळ्यांत भरणारी, नियमबद्ध घटना जगात दुसरी कोणतीच नाही. चौतीस हजार वर्षांपूर्वीच्या चित्रांच्या, शिल्पांच्या, वाद्यांच्या जोडीनेच चंद्रकोरींची चित्रे काढलेली हाडे सापडतात. यांत शुक्‍ल पक्षातल्या बिजेपासून पुनवेपर्यंत आणि कृष्ण पक्षातल्या प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंतच्या चंद्राच्या कळा ओळीने काढलेल्या आहेत. आकृतिबंधांचे सौंदर्य व्यक्त करण्याच्या आनंदातून चित्रकला, शिल्पकला, संगीत अवतरले, तर सुंदर आकृतिबंधांचा अर्थ लावण्यातल्या आनंदातून विज्ञान अवतरले. इतिहासकाळात शृंगारपोषक वादन आणि विज्ञान जोडीनेच सुरू झाले. अनेक प्रतिभाशाली वैज्ञानिक कला-संगीतप्रेमी रसिक असतात. रामन यांनी हौसेने फुलपाखरे, पिसे, माणिक मोती, रेशमी खण आणि संगीत वाद्ये यांचा संग्रह केला होता. त्यांना ध्यास होता प्रकाशलहरींचा, ध्वनिलहरींचा. १९६८मध्ये रामनांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी झकास व्याख्यान दिले; आकाशाचा निळा रंग कुठून आला? हा विषय का निवडला? रामन सांगतात की निसर्गाबद्दलचे अफाट कुतूहल ही त्यांच्या संशोधनामागची प्रेरणा आहे. विखुरण्याचे प्रमाण प्रकाशलहरींची लांबी व त्यांना विखुरणाऱ्या रेणूंचा आकार यांच्या परस्परसंबंधावर अवलंबून असते. वातावरणातले प्राणवायू, नत्रवायूंसारखे रेणू निळ्या रंगाच्या आखूड लहरी जास्त प्रमाणात विखुरतात, म्हणून दिवसा आकाश निळे भासते. रामन सुचवतात, की मुलांनो, तुम्ही स्वतःच सोपी सोपी निरीक्षणे करा. घरीच छोटेखानी स्पेक्‍ट्रॉस्कोप बनवा आणि निळ्या आकाशाचा वर्णपट- स्पेक्‍ट्रम तपासून पाहा.  येत्या विज्ञान दिनाला ध्वनिलहरींवरचा असाच प्रकल्प करता येईल. माझे मित्र गिरीश रानडे इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे तज्ज्ञ आहेत; त्यांना बासरीवादनाचा छंद आहे. त्यांनी विचार केला की वेबवरून माहिती मिळवून सुरेल बासरी बनवू. मग योग्य लांबीचा बांबू निवडून पेराजवळ फुंकायचे भोक पाडले. अशा बासरीत फुंकले की तिच्यातून सर्वात जास्त लांबीचे, म्हणजेच कमी कंपनसंख्येचे, शास्त्रोक्त संगीताच्या परिभाषेत मंद्र सप्तकातील पंचम स्वर उमटतात. आज उपलब्ध झालेल्या स्मार्टफोनचा सेन्सर वापरून त्या स्वराची कंपनसंख्या समजते; त्यावरून बासरीची पट्टी ठरवता येते. आता प्रश्न आहे की बोटाने उघडझाप करतो ती सूर निर्माण करणारी भोके, अथवा स्वररंध्रे कुठे कुठे पाडायची. दुसऱ्या एका सॉफ्टवेअरला त्या बांबूच्या नळीची पट्टी, तिची लांबी, व्यास व जाडी, केवढ्या आकाराची आणि किती, ६, ७ की ८ भोके पाडायची ही माहिती पुरवलीत की ते सॉफ्टवेअर ती बरोबर कुठे पाडावी हे सुचवते. ती ठीक ठाक पाडली की झाली तयार अडीच सप्तकांच्या पल्ल्याची सुरेल बासरी ! रानड्यांनी स्वतः तयार केलेली अशी बासरी खुशीत वाजवून दाखवली.   

आज महाराष्ट्रातल्या वनसंपन्न गडचिरोली जिल्ह्यात शांतिपूर्ण क्रांती घडते आहे. इथे हजारांहून अधिक गावांना सामूहिक वनाधिकार मिळाले आहेत आणि या ग्रामसभा तिथला विपुल बांबू नीट सांभाळत चांगले उत्पन्न मिळवताहेत. वनाधिकार मिळेपर्यंत इथले अनेक जण गाव सोडून गुजरातपर्यंत जाऊन हमाली करून पोट भरत होते. आज सगळे वर्षभर सुखाने गावातच राहताहेत. कारण आता ग्रामसभांनी बांबूच्या उत्पन्नातून ग्रामविकासाची, वनविकासाची उपयुक्त कामे काढून सर्वांना बारमहा हक्काचा, उत्पादक रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आज या गावागावांत स्मार्ट फोन पोचले आहेत. करमणूक-गप्पाटप्पांपुढे जाऊन त्यांचा उपयोग करायला शिकायला तिथले तरुण-तरुणी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी विज्ञान आणि संगीताचा मिलाफ असे बासऱ्या बनवायचे तंत्र अगदी सुयोग्य विषय आहे. हे तंत्र शिकून शालेय प्रकल्पांच्या जोडीने ही मंडळी चांगला कुटीरोद्योग उभारू शकतील. हा निसर्गसंपत्तीचा वारसा व नव्याने उपलब्ध झालेले ज्ञानभांडार यांचा मेळ जुळवणारा सयुक्तिक कौशल्यविकास होईल. मग मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत ‘कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनाच्या कधी मनातून, कधि वाऱ्यातून कधि ताऱ्यांतून, झुळझुळतात तराणे’ हे प्रत्यक्षात उतरून हा निसर्गरम्य प्रदेश सौंदर्याचा, विज्ञानाचा आणि त्याबरोबर आर्थिक सुस्थितीचा आस्वाद घेईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com