उचला भाले शिकारिला !

माधव गाडगीळ (निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ)
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

दीड कोटी वर्षांपूर्वी कावळे काटेरी भाल्यांची शस्त्रे वापरू लागले; मानवाने क्षेपणास्त्रे शोधून काढली. आज जगात खळबळ उडवून देत असलेल्या उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे आणि अणुबाँब या शस्त्रास्त्रांच्या उत्क्रांतीचाच परिपाक आहेत. 

भाले, पट्टस, खड्‌ग, ढाल, तलवारी ही हत्यारे किती।
म्याने, पालखिया, रथादि सकळे ही वाहने पूजिती।।

हे आहे मराठेशाहीतल्या दसऱ्याच्या पूजेचे वर्णन.हत्यारांमध्ये अग्रक्रमाचा मान दिला आहे भाल्यांना; आणि भाले हेच मानवाचे आणि आपल्या पूर्वज पशु-पक्ष्यांचे आद्यतम आयुध आहे. वाळव्या मातीचे कण वापरत वारुळे बांधतात; कावळे काड्या, गवत, लोखंडी तारा वापरत घरटी बांधतात. पण एखादी वस्तू घेऊन, तिच्यावर काही तरी कारागिरी करून ती वेगळ्याच विशिष्ट कामासाठी वापरणे, म्हणजेच उपकरणे, साधने, हत्यारे घडवणे आणि वापरणे हे त्यापुढचे पाऊल आहे. हत्यार म्हणजे हननाचे, मारण्याचे साधन आणि जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या ओघात कावळे हे आदिम हत्यारी दीड कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या रंगमंचावर अवतरले. यातले सर्वात डोकेबाज शिकारी आहेत आपल्या जंगली कावळ्यांसारखेच दिसणारे, पण खालची चोच वर वाकलेले ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेच्या बेटांवरचे न्यू कॅलेडोनिया कावळे. आपली बाकदार चोच वापरत ते झाडांच्या काटक्‍या आणि डहाळ्या तोडून तासतात, केवड्याची काटेरी कडा असलेली पाने नेटकेपणे फाडतात आणि या भाल्यांनी किड्यांची, अळ्यांची शिकार करतात. त्यांचा सांस्कृतिक विकास अथक चालू आहे असे दिसते; ते केवड्याची पाने नवनव्या तऱ्हांनी फाडत आणि एकमेकांकडून शिकत शिकत अधिकाधिक प्रभावी शिकारी बनताहेत. डोके चालवून ते नव-नवी आयुधे बनवतात; शास्त्रज्ञांनी एका उंच नळीत खाद्य आणि नळीबाहेर लोखंडी तारा ठेवल्या. कावळ्यांनी हुशारीने तारा वाकवून त्यांच्या आकड्या बनवल्या आणि त्या आकड्यांनी नळीतले खाद्य उचलून मटकावले. कावळ्यांसमोर एक रबरी साप ठेवला, तेव्हा आधी दुरून त्याला तारांनी टोचत त्याच्यापासून काही धोका नाही याची त्यांनी खात्री करून घेतली आणि मगच जवळ जाऊन त्याला चोचीत पकडला. 

आपले सोयरे चिंपांझी झाडाच्या नेटक्‍या फांद्या तोडून, दातांनी चावून त्यांचे टोकदार भाले बनवतात. ढोल्यांत लपून बसलेली गोलॅगो माकडे त्यांचे आवडते सावज आहेत. अशा गोलॅगोना भाल्यांनी ढोसून, ढोसून ते जखमी करतात, बाहेर पडायला भाग पाडत त्यांची शिकार करतात. माद्यांहून सशक्त चिंपांझी नर हे भाले बनवायच्या भानगडीत फारसे पडत नाहीत, पण माद्या अनेकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या न्यायाने भाल्यांचा वापर करत शिकार साधतात! हे आचरण सेनेगल अरण्यातील काही विशिष्ट टोळ्यांतच आढळते; तो त्यांच्या संस्कृतीचा खास वारसा असावा. पन्नास लाख वर्षांपूर्वी चिंपांझींच्या आणि मानवांच्या कुळींची फारकत झाली; तेव्हा ५० लाख वर्षांपूर्वीपासूनच मानवाचे नानाविध जातींचे सगळे पूर्वज भाले वापरत सावजांना भोसकत असावेत, परंतु या काळातल्या लाकडी भाल्यांचे अवशेष शिल्लक नाहीत. मात्र तीन लाख वर्षांपूर्वी आपल्या अगदी जवळच्या नात्यातले निअँडर्थाल भाल्यांना अणकुचीदार दगडांची टोके बसवायला लागल्याचा घट्ट पुरावा उपलब्ध आहे. 

हत्याऱ्यापासून दूरवरच्या सावजावर किंवा शत्रूवर हल्ला चढवणे ही केवळ आपल्या मानवजातीची करामत आहे. कौटिल्य सांगतो, की भाल्याच्या वापराच्या हातात धरून अमुक्त किंवा दूर फेकत मुक्त अशा दोन तऱ्हा आहेत. सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी मानवांनी भाले वापरत दूरवरच्या हल्ल्यांची सुरवात केली असावी असा अंदाज आहे. मग ६४ हजार वर्षांपूर्वी धनुष्य-बाण वापरात आले. त्या पुढचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे इसवी सनाच्या नवव्या शतकात बंदुकीच्या दारूचा चिन्यांनी लावलेला शोध आणि तेराव्या शतकात त्यांनीच विकसित केलेले रॉकेट अथवा अग्निबाण. हे अग्निबाण भारतात पोचले आणि म्हैसूरचा टिपू सुलतान ते युद्धात वापरत होता. १७८० मध्ये इंग्रज - म्हैसूर सेनेची पहिली लढाई झाली. त्यात टिपूच्या सैन्याने केलेल्या अग्निबाणांच्या माऱ्याने इंग्रज फौज चक्रावून गेली, धूम पळाली. पण हा पराभव स्वीकारताना इंग्रजांनी टिपूने वापरलेले, पण न फुटलेले अग्निबाण गोळा करून मायदेशी पाठवले. इंग्रजांचा दारूगोळ्याचा कारखाना वूलवर्थ गावी होता. त्या कारखान्याला जोडून दारूगोळा अधिकाधिक परिणामकारक बनवण्याचे संशोधन चालायचे. त्या प्रयोगशाळेत सापडलेल्या या अग्निबाणांचा अभ्यास करून त्यांना कसे तोंड द्यायचे याचे डावपेच त्यांनी रचले; स्वतः बनवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, टिपूला शास्त्रीय संशोधन हा विषयच ठाऊक नव्हता. तेव्हा इंग्रजांबरोबरच्या १७९२च्या पुढच्या लढाईत टिपूचे युद्धतंत्र ‘जैसे थे’ होते. इंग्रजांचे पुढे गेले होते. म्हणून ‘थांबला तो संपला’ या न्यायाने दुसऱ्या लढाईत इंग्रजांनी टिपूचा धुव्वा उडवला. मराठ्यांची पण हीच गत होती. इतिहासाचार्य राजवाडे सांगतात, की एवढ्या बुद्धिमान नाना फडणविसांच्या संग्रहात इंग्रजांकडून पकडलेल्या दुर्बिणी, होकायंत्रे होती, पण त्यांचा उपयोग काय, त्याचा त्याने काहीही विचार केल्याची नोंद नाही.

मानवी जीवनात अशी कळीची भूमिका बजावणाऱ्या आयुधांबद्दल, उपकरणांबद्दल त्याच्या मनात साहजिकच कृतज्ञतेची भावना निर्माण होते; दसऱ्याची आयुधपूजा हा या भावनेचाच एक आविष्कार आहे. आधुनिक काळात रशिया या कट्टर नास्तिक देशात त्यांच्या एक मेच्या उत्सवात जे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन होते, तीही एक प्रकारची आयुधपूजाच आहे. पण आज उत्तर कोरियाच्या अणुबाँबनी आणि क्षेपणास्त्रांनी जी खळबळ उडवून दिली आहे; आणि आपल्या रस्त्यांवर वाहनांच्या दाटीवाटीने, रस्त्यांतल्या खड्ड्यांनी, अपघातांनी जो हाहाकार मांडला आहे तो पाहताना प्रश्न पडतो की मानव आपल्या आयुधांचा-वाहनांचा स्वामी न राहता गुलाम तर बनत नाही ना?