कसे थोपवूया रक्तपिपासू डास?

कसे थोपवूया रक्तपिपासू डास?

आपल्या जीवसृष्टीतल्या सग्यासोयऱ्यांविरुद्ध निष्कारण निकराची लढाई पुकारायची आणि त्याच वेळी आपल्या परिसरात परकी, कृत्रिम रसायने ठेचून भरायची, या दुहेरी प्रमादामुळे आपण नवनव्या कर्करोगांना, ॲलर्जींना बळी पडू लागलो आहोत.

‘मुं बई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय? मुंबईच्या रस्त्यांमध्ये झोल झोल, रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल, खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल, मुंबई, तू माझ्या संगं गोड बोल!’ नेमेची येणाऱ्या पावसाबरोबर नेमेची घाईगडबडीतल्या दुरुस्तीच्या खराब कामांमुळे लागलीच पुन्हा पडणाऱ्या खड्ड्यांवर टीका-टिप्पणी करणारा रेडिओ जॉकी मलिष्काचा व्हिडिओ गेल्या वर्षी ‘व्हायरल’ झाला होता. लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला असा हात घातल्यावर महानगरपालिका साहजिकच खडखडून उठली. म्हणजे रस्त्यांची कामे नीट करायला लागली असं नाही, तर मलिष्काच्या घरावर छापा घालून तिच्या घरात डासांच्या अळ्या सापडल्या म्हणून तिच्यावर खटला भरायला सज्ज झाली. काही नगरसेविकासुद्धा सरसावल्या आणि त्यातल्या एकीने टीव्हीवरती मलिष्काच्या चुरचुरीत व्हिडिओला ‘तुझ्या घरात झाल्यात डासांच्या अळ्या, कशाला करतेस कागाळ्या’ असे पिळपिळीत उत्तर दिले. आता मलिष्काने घरात डासांच्या अळ्या नक्कीच होऊ देऊ नयेत, पण कदाचित त्या शे-दोनशे असतील; त्याच्या अब्जावधीपट अळ्या आपल्या शहरांच्या आसपासच्या नद्यांत आणि तळ्यांत बागडताहेत.

डासांना नव्याने उपलब्ध झालेला खास आवडीचा निवारा म्हणजे जलपर्णी माजलेले, संथ वाहणारे अथवा स्तब्ध पाणी. शहरांतली दाटीवाटी आणि सांडपाण्यावर ‘उपचार’ करणारी खिळखिळीत यंत्रणा, यामुळे वस्त्यांजवळच्या पाण्यात नायट्रोजन, फॉस्फरस अशी पोषकद्रव्ये ठासून भरलेली असतात. या पौष्टिक माध्यमात जलपर्णीच्या खाली फोफावणाऱ्या सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी हा डासांच्या अळ्यांचा आवडता आहार आहे; त्यामुळे अशा परिसरात डास उदंड माततात. पण त्यांना एका आव्हानाला तोंड द्यायला लागते, कारण त्यांच्या अळ्यांना मधूनमधून हवेचा श्‍वास घ्यायला लागतो आणि जलपर्णीच्या दाटीखाली त्यांना पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोचताच येत नाही. पण जलपर्णी ज्यांच्या आधारावर तरंगत असते, त्या हवा भरलेल्या छोट्या छोट्या फुग्यांत नाकापुढची नळी खुपसता आली तर तेथून श्‍वास घेणे शक्‍य आहे. उत्क्रांतीच्या ओघात अशाच खुबीने श्‍वास घेणारी डासांची ‘मान्सोनिया’ नावाची एक प्रजाती अवतरली आहे; आणि आज भारतात जिकडेतिकडे रक्तपिपासू ‘मान्सोनिया’ डासांचे पेव फुटले आहे. सुदैवाने मान्सोनिया हिवताप, डेंगी फैलावत नाहीत, पण भारताच्या काही प्रांतांत ते पाय फुगवून हत्तीसारखा बनवणारा एक वेगळाच रोग फैलावतात.

पण ‘मान्सोनिया’ आज महाराष्ट्रात रोग फैलावत नसले, तरी त्यांचा चावा नकोसा वाटतो. डासांच्या चाव्यापासून बचावाचे पूर्वापार स्वस्त सोपे साधन म्हणजे मच्छरदाण्या. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीपर्यंत अशा मच्छरदाण्या सगळीकडे सर्रास वापरात होत्या; आजही गडचिरोलीसारख्या हिवतापग्रस्त जिल्ह्यात त्या मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत. परंतु, भारतीय नागरी जनतेने अलीकडे जी एक नवी नखरेबाज जीवनशैली स्वीकारली आहे, त्यात मच्छरदाण्यांना स्थान नाही. पण याच आधुनिक युगात डासांचा उपद्रव तर वाढतोच आहे. मग काय करायचे? आधुनिक रासायनिक उद्योग पर्यावरणाच्या बिघाडाच्या अशा अनेक समस्यांचा फायदा घ्यायला सरसावले आहेत आणि आजच्या जगात नव्यानव्या कृत्रिम रसायनांची भर टाकताहेत. आता आपल्याला अन्नातली, दुधातली कीटकनाशकांसारखी प्रदूषक रसायने टाळणे खूपच अवघड आहे; त्यासाठी ही रसायने निर्माण करण्यामागे जे जबरदस्त आर्थिक हितसंबंध आहेत त्यांना सगळ्या समाजाने एकजुटीने तोंड द्यायला हवे.

पण हे राहू द्या, आपण अगदी स्वखुशीने प्रदूषक कृत्रिम रसायने वापरत राहतो, त्वचेवर डासाचे चावे टाळणारी तेले फासतो आणि घरातून डास हाकलण्यासाठी वेगवेगळी वेटोळी जाळतो, नाही तर निरनिराळ्या द्रवांच्या वाफा पसरवतो. आता एका डासाचे वजन असते अडीच मिलिग्राम, एका माणसाचे असते त्याच्या दोन-तीन कोटी पट. त्यामुळे डास ज्या रसायनांना सहजतेने बळी पडतात, त्यांचा चटका आपल्याला लागलीच बसत नाही. पण सगळ्या जीवसृष्टीची रासायनिक रचना अखेर एकच आहे, म्हणून डासांना जे विष आहे ते आपल्यासाठीही विषच आहे. ताबडतोब नाही, परंतु वर्षानुवर्षे आपण अशी विषे कातडीवर फासत राहिलो किंवा त्यांच्या वाफा हवेतून फुप्फुसात पोचवत राहिलो, तर त्यांचे अनेक दुष्परिणाम होणे अटळ आहे.  म्हणतात की आधुनिक युग हे माहितीचे युग आहे, पण या माहिती युगात पदार्पण करणारा माणूस हा जगातला सगळ्यात शिताफीने खोटेनाटे बोलणारा प्राणीसुद्धा आहे. आपल्याला जाहिराती फसव्या असतील याची अपेक्षा असते, पण अनेकदा विज्ञान म्हणून मिरवणारी, विशेषतः दीर्घकालीन परिणामांचे भाकीत करणारी माहितीसुद्धा फसवी असते. याचाच अलीकडचा अनुभव म्हणजे बीटी कपाशी. बीटी वाणामुळे बोंड अळीचा उपद्रव कायमचा टळला, आता कीटकनाशके वापरायचे काही कारण उरणार नाही, असा प्रचार केला जात होता. पण हे धादांत चुकीचे ठरले आहे आणि आज बोंड अळी पुन्हा उफाळली आहे. डासांना हाकलणाऱ्या वाफांच्या परिणामांबद्दलही अगदी तोकडी, उत्पादकांनी पंधरा दिवसांच्या अभ्यासाच्या आधारे पुरवलेली माहिती उपलब्ध आहे; त्यातून दीर्घकालीन परिणामांबद्दल काहीही निष्कर्ष काढणे अर्थशून्य आहे. उलट वेगवेगळा पुरावा सांगतो की, अशा रसायनांच्या दीर्घकालीन वापरातून नानाविध व्याधी, विशेषतः निरनिराळ्या ॲलर्जी आणि कर्करोग उफाळण्याची दाट शक्‍यता आहे.  
आधुनिक युगात अतोनात बोकाळलेल्या ॲलर्जी ही काय भानगड आहे? प्राण्यांच्या उत्क्रांतीयात्रेच्या आरंभापासूनच त्यांच्यावर नानाविध जीवजंतू हल्ला करत आलेले आहेत आणि हे आव्हान स्वीकारत निसर्गाने प्राण्यांना रोगजंतूंशी लढायला सज्ज असलेली इम्यून सिस्टिम विकसित करून दिली आहे. आता कुठलीही यंत्रणा वापरात राहिली तरच ती तंदुरुस्त राहते, नाही तर तिच्यात बिघाड होऊन ती काहीतरी अद्वातद्वा वागायला लागते. म्हणूनच थोड्याफार प्रमाणात रोगजंतूसुद्धा आपल्या परिसरात असणे हे आरोग्याला घातक नाही, तर पोषकच आहे. या रोगजंतूंना तोंड देता देता आपली इम्यून सिस्टिम सचोटीने काम करत राहते. पण पूर्ण बेकार ठेवले तर ती उगीचच तलवार उपसते; आणि रोगजंतू भेटत नसले तर शरीरात घुसणाऱ्या वेगवेगळ्या परक्‍या, कृत्रिम रसायनांशी झुंजायला लागते. यातून निरनिराळ्या ॲलर्जी उपटतात. खूप अंशी निर्जंतुक झालेल्या युरोप-अमेरिकेत अशा ॲलर्जी ही खूप मोठी भेडसावणारी समस्या बनली आहे आणि डोळे मिटून पाश्‍चात्य जीवनशैली स्वीकारणारी भारतीय नागरी जनताही याला बळी पडते आहे. ॲलर्जीचे सगळ्यात वाईट परिणाम होताहेत आपल्या श्‍वसन इंद्रियांवर आणि अलीकडे झपाट्याने वाढणारा फुप्फुसाचा फायब्रोसिस- फुप्फुसातल्या द्राक्षांच्या घोसांसारख्या फुग्यांचे ताठर बनणे- हा यातलाच एक ‘आविष्कार’ आहे. यामागे आपल्या घरातील हवा वर्षभर रोज दहा-बारा तास डासांना हाकलण्यासाठी विषाच्या वाफांनी भरून ठेवण्याचे मोठे ‘योगदान’ असावे. याबद्दल नेटके अभ्यास उपलब्ध नाहीत, पण म्हणून दुसरे, साधे पारंपरिक पर्याय उपलब्ध असताना विषाची परीक्षा घेत राहणे हे काही खास शहाणपणाचे नक्कीच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com