देवाजीच्या मनात भरले भुंगेरे

madhav gadgil
madhav gadgil

सारी जीवसृष्टी एकात्म आहे. सर्व प्राचीन संस्कृती व आधुनिक विज्ञान बजावते, की मानवजात चराचर सृष्टीचा अविभाज्य घटक आहे; आणि सर्व संयम सोडून या सृष्टीवर आघात केल्यास उत्तराखंडच्या, केरळच्या महाप्रलयांसारखे संकट ओढवू शकते.

कुसुमाग्रज आळवून गेले, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणाकरा। आधुनिक विज्ञानाने दाखवून दिले आहे की सारी जीवसृष्टी एकात्म आहे. जे जे जगतो ते आपण सारे, विषाणू, जीवाणू, बुरशी, शेवाळी, वड-पिंपळ, किडे-मकोडे, मासे-देवमासे आणि माकडे-माणसेसुद्धा चार अब्ज वर्षांपूर्वी अवतरलेल्या आदिमायेची लेकरे आहोत. आपल्याला यातील अनेक जीवकुळी क्षुद्र वाटत असोत, पण आपण त्यांच्याच आधाराने पृथ्वीतलावर प्रस्थापित झालो आहोत. तुरळक अपवाद वगळता ५० कोटी वर्षांपूर्वीपर्यंत सगळी भूमी खडकाळ, वैराण, निर्जीव होती. मग तिच्यावर प्रविष्टली बुरशी व शेवाळी; त्यांच्या दगडफुलांच्या युतीने हळूहळू खडकांची भुकटी होत माती बनली. या मातीत वनस्पतीसृष्टी फोफावली आणि त्यापाठोपाठ या नव्या मुबलक खाद्याचा समाचार घेणारे कीटक प्रथम ४० कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर अवतरले. कीटक हा खास काटक व चपट्या अंगयष्टीमुळे कुठेही लीलया शिरकाव करून घेत वेगवेगळ्या परिस्थितींशी सहज जुळवून घेणारा प्राणिवर्ग आहे. त्यांनी पाण्यात श्वसनासाठी वापरत असलेल्या कल्ल्यांचे पंखात रूपांतर केले; आज ९० टक्के कीटकजाती एकतर उडू शकतात किंवा उडणाऱ्या पूर्वजांचे वंशज आहेत. हवाई मार्गाने भराभर पसरू शकणारे कीटक वनस्पतींचे भक्षक, पण जोडीनेच पराग खाता-खाता परागीकरण करणारे सहकारी, प्राण्यांची विष्ठा आणि अवशेषांचे भक्षक, स्वतःहून आकाराने मोठ्या प्राण्यांचीही शिकार करणारे मांसाहारी अशा विविध परिभूमिका बजावू लागले व संख्येत आणि वैविध्यात त्यांनी इतर सर्व प्राणिवर्गांना मागे टाकले.

जेबीएस्‌ हाल्डेन या गेल्या शतकातल्या अग्रगण्य जीवशास्त्रज्ञाचा कीटकांबद्दलचा मजेदार किस्सा आहे. जेबीएस्‌ हाल्डेन एका भोजन समारंभात कॅन्टरबरीच्या आर्चबिशपांच्या शेजारी बसले होते. धर्मगुरूंनी विचारले, ‘हाल्डेनजी, आपल्याला जीवसृष्टीची प्रचंड जाण आहे. सांगा, ही जीवसृष्टी निर्मिताना ईश्‍वराच्या मनात काय होते?’ हाल्डेन म्हणाले, ‘मी मनकवडा नाही, पण एवढे नक्की - ईश्‍वराला कीटक, विशेषतः भुंगेरे अथवा बीटल अतिशय भावायचे! अहो, जगात भुंगेऱ्यांच्या जितक्‍या चित्र-विचित्र तऱ्हा आहेत, तितक्‍या दुसऱ्या कोणत्याही जीवकुळीच्या नाहीत!’ आजपावेतो शास्त्रज्ञांनी जगात जिवांच्या एकूण ८० लाख व कीटकांच्या १० लाख जाती आहेत, असा अंदाज केला आहे. सगळ्या कीटकांमध्ये भुंगेऱ्यांचे जबडे जोरकस व हरहुन्नरी आहेत; शिवाय त्यांच्या पुढच्या पंखांचे एका टणक कवचात रूपांतर झालेले आहे, त्यामुळे ते सहज चिरडले जाऊ शकत नाहीत. या गुणवैशिष्ट्यामुळे ३१ कोटी वर्षांपूर्वी उपजलेले भुंगेरे हे जगातले सर्वांत वैविध्यपूर्ण कीटककुल आहे; आज त्यांच्या चार लाख जाती आहेत.

हाल्डेन महोदयांनी देवाजीच्या मनात खास भरले असावेत असे सुचवलेले हे भुंगेरे, खासकरून यांच्यातले चकचकीत, निळ्या-हिरव्या रंगांचे देखणे स्कॅरब बीटल इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत पवित्र मानले होते. शाकाहारी पशूंच्या शेणात वनस्पतींचे बरेच अवशेष शिल्लक असतात आणि त्यामुळे हे शेण हाही एक पौष्टिक आहार ठरतो. स्कॅरब बीटल अशा शेणाचे झकास गरगरीत चेंडू बनवतात. मग त्यांच्या जोड्या जमिनीत बीळ खणतात आणि तो शेणगोळा गरगरत नेत, त्यात अंडी घालून, त्या बिळात पुरतात. काही दिवसांनी त्या शेणावर पोसलेली भुंगेऱ्याची शेकडो पिले मोठी होऊन बाहेर येतात आणि आपले झगमगणारे पंख उभारून उड्डाण करतात. हे सगळे नाट्य इजिप्तवासीयांच्या मनात ठसले होते. रा ही त्यांची एक प्रमुख देवता होती. त्यांचा समज होता की हा रा उगवल्यापासून मावळेपर्यंत सूर्यदेवाला ढकलत आकाशाच्या आरपार घेऊन जातो. मग रात्री नष्ट झालेला सूर्य दुसऱ्या दिवशी पहाटे, राच्या कृपेने पुनर्जन्म घेतो आणि खेप्री, अथवा अरुणदेवाच्या रूपात पुन्हा प्रकट होतो. स्कॅरब भुंगेऱ्यांचे जीवननाट्य हे याच आकाशातील नाट्याचे जमिनीवरील प्रतीक आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि म्हणून त्यांनी स्कॅरब भुंगेऱ्यांना पावित्र्य बहाल केले होते.

या स्कॅरब भुंगेऱ्यांतील एक गट, दांडगे शवभक्षी स्कॅरब हे शेणाऐवजी प्राण्यांच्या मांसावर जगतात. जंगलात एखाद्या पशूचा मृतदेह पडला की काही तासांतच या भुंगेऱ्यांच्या झुंडी उडत तिथे पोचतात. त्यांच्या जोड्या एकमेकांशी भांडत मृतदेहाखालच्या निरनिराळ्या टापूंवर कब्जा करतात आणि तिथे बिळे खणतात. मग त्यांच्या जबरदस्त जबड्यांनी ते मांसाचे मोठे लचके तोडून मृतदेहाखाली खणलेल्या बिळांत नेऊन कोंबतात व त्यावर अंडी घालतात. त्यातून बाहेर आलेल्या अळ्या त्या मांसावर वाढतात आणि काही आठवड्यांत त्यांची प्रजा प्रौढ होऊन पंख फुटून नव्या मृतदेहाच्या शोधात उड्डाण करते. लखलखणाऱ्या पंखांच्या दांडग्या भुंगेऱ्यांचा असा उडणारा थवा हे आकर्षक दृश्‍य आहे. हाल्डेन महोदयांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्क्रांतीशास्त्रात महत्त्वाचे योगदान करणारे माझे मित्र विल्यम हॅमिल्टन या दांडग्या भुंगेऱ्यांच्या प्रेमात पडले होते आणि या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाने आपल्या मृत्युपत्रात दफनासाठी पैशांची अजब तरतूद करून ठेवली होती. हे पैसे वापरून मृत्यूनंतर त्यांचे शव पोचवायचे होते ब्राझीलच्या घनदाट सदाहरित वर्षावनात. तिथे ते एका लोखंडी जाळीत गुंडाळून जमिनीवर ठेवून द्यायचे होते. या जाळीचे काम होते त्या मृतदेहाला तरसांसारख्या शवभक्षक पशूंपासून वाचवणे; ते राखून ठेवायचे होते ॲमेझॉनच्या जंगलातल्या दांडग्या शवभक्षी स्कॅरब बीटलांना खाण्यासाठी. विल्यम हॅमिल्टननी मृत्युपत्रात लिहून ठेवले होते की मी मरणार नाही, या भुंगेऱ्यांच्या संततीच्या रूपात पुनर्जन्म घेईन आणि माझ्या खास प्रेमातल्या ॲमेझॉनच्या घनदाट अरण्यातल्या जीवजालाचा एक अंश बनून उडत राहीन!  

जगातील सर्व प्राचीन संस्कृती मानत होत्या आणि विज्ञानही पक्के सांगते, की आपण सारे जीव एका चेतनसृष्टीचा अंश आहोत; आपण काही या जीवसृष्टीत एकटे-दुकटे नाही; एका जीवजालातील दुवे आहोत. आपल्या पचनेंद्रियांत लक्षावधी सूक्ष्मजीव नांदत असतात आणि त्यांच्या कृपेने आपण आपला आहार पचवू शकतो, वेगवेगळी पोषकद्रव्ये शोषू शकतो; आपले व्याधींपासून संरक्षण करू शकतो. पिके, फळझाडे हीसुद्धा अशाच रीतीने नानाविध जिवाणूंच्या सहकार्यानेच मातीतील पोषकद्रव्ये शोषून घेऊ शकतात, वाढू शकतात आणि आपल्याला अन्न पुरवू शकतात. पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकत आपण आनंदाने उठतो, हरित तृणाच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालिचे बघत हर्षभरित होतो. आपले जिणे जीवौघाचे पाणी आहे, मानवांचे वैयक्तिक जीवन मर्यादित असले तरी हा जीवौघ अखंड वाहतच राहतो. या सृष्टीत आपण काय भूमिका बजावणार हे आपणच ठरवायचे आहे. आपण आपली खासियत असलेल्या ज्ञानसंपत्तीच्या, तंत्रज्ञानाच्या बळावर सगळ्या सृष्टीवर कुरघोडी केली आहे खरी, पण हे वर्चस्व स्थापल्यावर सगळा संयम सोडून चराचरावर आघात करत राहायचे, की काहीतरी विवेकाने सृष्टीत काळजीपूर्वक हस्तक्षेप करायचे हे आपणच ठरवावयाचे आहे. सारा विवेक, सारा संयम सोडून वागल्यावर काय हाहाकार उडतो हे नुकत्याच केरळात मातलेल्या, मोठ्याने मानवनिर्मित अशा महाप्रलयाने आपल्या लक्षात आणून दिले असेल, अशी आशा करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com