शह-काटशहात मनसेचे झाले वांगे ! (अग्रलेख)

मनसे
मनसे

मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे भाजपने आकांडतांडव करण्याचे काहीच कारण नव्हते. पण, उद्धव यांच्या या अनपेक्षित खेळीमुळे या तथाकथित मित्रपक्षांचे संबंध विकोपाला गेल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या धक्‍कातंत्राबद्दल प्रसिद्ध होते आणि त्यांनी विरोधकांनाच नव्हे, तर स्वपक्षीयांना दिलेल्या जोरदार धक्‍क्‍यांचीही अनेक उदाहरणे सांगता येतील. त्याच धक्‍कातंत्रात आपणही कुशल असल्याचे उद्धव ठाकरे यांनी, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील सात नगरसेवकांपैकी सहा जणांना आपल्या छावणीत परत आणून दाखवून दिले. मात्र, त्यामुळे मनसेपेक्षाही जास्त मिरच्या झोंबल्या त्या भारतीय जनता पक्षाला! त्याला राज्याच्या सत्तेतील शिवसेना व भाजप यांच्यात गेले काही महिने सुरू असलेल्या सुंदोपसुंदीबरोबरच, या पक्षांचे कुरघोडीचे राजकारणही कारणीभूत आहे. अर्थात, याला पार्श्‍वभूमी आहे ती नांदेड महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या एका पोटनिवडणुकीची.

नांदेड महापालिका जिंकण्याच्या गमजा करणाऱ्या भाजपच्या पदरी दारुण पराभव आला, त्याच दिवशी मुंबईतील एक पोटनिवडणूक जिंकल्यामुळे मराठवाड्यातील पराभवाचे दुःख विसरून भाजपच्या काही नेत्यांच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारले. त्याचे कारण या एका विजयामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेना व भाजप यांच्यातील बळ अवघ्या एका आकड्याच्या फरकावर येऊन ठेपले, हे होते. त्यामुळे भाजपचे किरीट सोमय्या यांच्यासारख्या वाचाळवीरांनी देशातील या सर्वांत धनाढ्य महापालिकेवर कब्जा करण्याच्या बाता सुरू करून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांच्या काटशहामुळे हे सारेच उलटेपालटे होऊन गेले. अर्थात, या शह-काटशहाच्या राजकारणात बसल्या जागी वांगे झाले ते मनसेचे! उद्धव यांनी एकाच दगडात भाजप व मनसे या दोहोंनाही जखमी करताना, आपण राजकीय डावपेचांत "कच्चे लिंबू' नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे संतापाचा तीळपापड होऊन मनसेचे कार्यकर्ते फुटलेल्या सहा जणांना मुंबईत फिरू न देण्याच्या धमक्‍या देत आहेत, तर भाजपच्या बोलक्‍या पोपटांना यात "घोडेबाजार' झाल्याचे दिसू लागले असून, त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सत्तेचा वापर करून मनसे नगरसेवकांच्या या "घरवापसी'ला लगाम घालण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केल्याचे चित्र आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारे होणारी सदस्यांची पळवापळवी महाराष्ट्राला नवी नाही. खरे तर भाजपनेच गेल्या विधानसभा निवडणुकीपासून विविध पक्षांतील नेत्यांना स्वपक्षात मानाचे स्थान, तसेच पदे देत आपणही या कलेत पारंगत असल्याचे दाखवून दिले होते. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपने अन्य पक्षांच्या नगरसेवकांना पावन करून घेऊन त्यांना उमेदवारीही दिली होती. 1980 मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासूनच "चाल, चलन और चारित्र्य' अशी भाषा करत आपले वेगळेपण दाखवून देणाऱ्या या पक्षाने निवडणुका जिंकण्यासाठी भाडोत्री उमेदवार आणताना, या सत्तातुरांच्या चारित्र्याची जराही फिकीर बाळगली नव्हती. त्यावर टीका होताच, "आमच्या पक्षात आल्यावर सगळे पावन होतात!' अशी भाषा वापरली होती. या पार्श्‍वभूमीवर खरे तर मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यावर भाजपने आकांडतांडव करण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, उद्धव यांच्या या अनपेक्षित खेळीमुळे मुंबई महापालिका ताब्यात घेण्याच्या प्रदीर्घकाळच्या भाजपच्या स्वप्नाचा चुराडा झाला आणि त्यामुळेच मनसेच्या या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत.

अर्थात, व्हाया मनसे भाजपला असा धोबीपछाड देण्याचा डाव काही एका रात्रीत बिलकूलच शिजला नव्हता. मनसेत असतानाच दिलीप लांडे हे विभागप्रमुख म्हणून शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले, तेव्हाच या "घरवापसी'ची बीजे रोवली गेली असणार, हे उघड आहे. शिवाय, आता शिवसेनेच्या नावाने खडे फोडणाऱ्या मनसेने तेव्हा हा पाठिंबा विनातक्रार स्वीकारला होता. त्यामुळे उद्धव व राज यांनी संगनमताने तर या कटाची आखणी केली नव्हती ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, त्यात तथ्य असतेच तर मनसैनिकांच्या धमकावणीनंतर या सहा नगरसेवकांना पोलिस संरक्षण घ्यावे लागले नसते. एक मात्र खरे, उद्धव यांच्या धक्‍कातंत्रामुळे आता राज्याचे राजकारण एका वेगळ्याच वळणावर जाऊन उभे राहिले आहे.

सत्तेच्या मोहापोटी एकत्र आलेल्या शिवसेना व भाजप यांचे मनोमिलन अशक्‍य असल्याचेच हे चिन्ह आहे. त्यातच "विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी भाजपने पैशांच्या थैल्या मोकळ्या सोडल्या असून, त्याचबरोबर सत्तेमुळे हाती आलेल्या पाशवी ताकदीचा वापरही जोमाने सुरू आहे,' असे टीकास्त्र शिवसेनेने सोडले आहे. त्यामुळे 25 वर्षे युती असताना आणि युती तुटल्यावरही सत्तेसाठी एकत्र आल्यावर, कधी नव्हे इतके या तथाकथित मित्रपक्षांचे संबंध आता विकोपाला गेले आहेत. त्यामुळे मराठी माणसाला पडलेला प्रश्‍न मात्र अगदीच साधा आहे. "शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार टिकेल; कारण अनेक "अदृश्‍य हात' आमच्या पाठीशी आहेत, असे सांगणारे मुख्यमंत्री ही रोजच्या रोज होणारी टीका का सहन करत आहेत आणि तेच शिवसेनेला सत्तेतून दूर का करत नाहीत?' दिवाळीनंतर भाजपचे फटाके फुटतील असे सांगितले जाते, तेव्हा याचे उत्तर मिळेल काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com