फुले पडती का शेजारी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

महाराष्ट्राच्या राजकारणाला यापुढे येणारी फुले शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाहीत, याची दक्षता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात घेतल्याचे दिसते. आता महाराष्ट्रात खास करून युतीच्या राजकारणात भाजपचा म्हणजेच पर्यायाने फडणवीस यांचाच शब्द चालतो, हेही यातून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला यापुढे येणारी फुले शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाहीत, याची दक्षता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात घेतल्याचे दिसते. आता महाराष्ट्रात खास करून युतीच्या राजकारणात भाजपचा म्हणजेच पर्यायाने फडणवीस यांचाच शब्द चालतो, हेही यातून स्पष्ट झाले आहे.

अवघ्या आठवडाभरापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक झाड लावले होते आणि त्यास पाणी साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले होते! तेव्हा आता युतीच्या झाडास भरभरून फुले येतील, असे चित्र उभे राहिले होते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या रूपाने अशी दहा फुले शुक्रवारी आलीही; पण त्याचवेळी "फुले का पडती शेजारी?‘ असा अनुभव शिवसेनेला आला! शिवसेनेने एका कॅबिनेट मंत्रिपदाचा आग्रह धरल्याचे सांगितले जात होते. त्याचवेळी "आम्ही लाचार नाही.‘ अशा गर्जनाही झाल्या. संयुक्‍तपणे लावलेल्या त्या झाडास कॅबिनेट मंत्रिपदाची एक-दोन नव्हे, तर चक्‍क सहा फुले आली. मात्र, त्यातील एकही फूल "मातोश्री‘च्या अंगणात पडले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. उद्धव यांनी लावलेल्या झाडास फडणवीस खतपाणी घालायला तयार असले, तरी त्याचवेळी त्या झाडाच्या फांद्या वाढणार नाहीत, फळेही फारशी मिळणार नाहीत, तरीही झाड आपलंच असल्याचे समाधान मात्र दाखवावे लागेल, अशी तजवीज करण्याचे काम त्यांनी केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना आधी ठरले तसेच झाले, असे सांगून समाधानी असल्याचे दाखवत आहे. यातले समाधान किती खरे हे हळूहळू समजेलच. मात्र युतीच्या राजकारणात भाजपचा आणि पर्यायाने फडणवीस यांचाच शब्द चालतो, यावर शिक्कामोर्तब करण्याचे कसब मुख्यमंत्र्यांनी दाखवले.
फडणवीस यांच्या हाती राज्याची सूत्रे आली, तेव्हा त्यांच्या क्षमतेविषयी अनेकांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. त्यात अर्थातच भाजपचे काही नाराजवंतही होते. मात्र, अवघ्या सव्वा वर्षात त्या नाराजवंतांना घरी बसावे लागले आणि डावपेचांतही तरबेज झाल्याचे फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. शिवसेनेला केवळ दोन राज्यमंत्रिपदे देऊन त्यांनी "रासप‘चे महादेव जानकर यांना थेट कॅबिनेट दर्जा बहाल केला. त्याशिवाय, आपल्याच पक्षातील चार नव्या आणि सध्या राज्यमंत्री असणारे प्रा. राम शिंदे यांनाही कॅबिनेट मंत्रिपदी बसवले. हे सारे उघड्या डोळ्यांनी बघण्यात शिवसेनेचा वाघ समाधानी असेल तर वाघाचा स्वभावच बदलला असावा.
मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक व राजकीय समतोलही साधला आहे. नितीन गडकरी यांनी सोलापूरचे सुभाष देशमुख यांच्यासाठी आग्रह धरला होता. त्यांना कॅबिनेट दर्जा देतानाच फडणवीस यांनी चातुर्याने विदर्भातील गडकरी यांचे विश्‍वासू आमदार मदन येरावार यांनाही सामावून घेतले. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव करणारे त्यांचे नातू संभाजी निलंगेकर यांनाही कॅबिनेट दर्जा देऊन, त्यांनी लातूर-बीड परिसरातील जनतेला खूष करून टाकले. हा अप्रत्यक्षरीत्या पंकजा मुंडे यांना शह देण्याचा प्रयत्न असू शकतो. अर्थात, "विनायक मेटे यांना मंत्री करून आपल्याच जिल्ह्यात आपल्याला प्रतिस्पर्धी का उभा करता,‘ या त्यांच्या सवालाची दखल घेऊन फडणवीस यांनी पंकजाताईंना अंशतः दिलासाही दिला आहे. शिवसेनेने अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील जुने कार्यकर्ते आणि जळगावातील फर्डे वक्‍ते गुलाबराव पाटील यांची निवड केली. एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला, तेव्हा याच गुलाबरावांनी फटाके फोडले होते. आता ते मंत्री झाल्यामुळे खडसे अधिकच संतापले असणार! एकूणच फडणवीस यांना नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भक्‍कम साथ असल्याचे स्पष्ट झाले. 

या शह-काटशहात शिवसेनेची अवस्था मात्र समाधानाचे हसू दाखवण्याखेरीज पर्यायच नाही, अशी झाली. आपल्या गर्जना फुकाच्याच ठरल्याचे पक्षाला निमूटपणे पाहावे लागले. यात शिवसेनेच्या वाट्याला काही आले असेल तर गृह राज्यमंत्रिपद. काल दिवसभर भाजपच्या ताठर भूमिकेनंतर तयार झालेला तणाव निव्वळ तेवढ्याने निवळला. हे राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीचे निदर्शक आहे. युती चालवणे ही दोघांचीही गरज आहे. भांडत का असेना हा संसार चालवण्याची मजबुरी आहे आणि त्यात वरचष्मा भाजपचा राहणार हे सहन करण्याला पर्याय नाही. बाकी अधूनमधून डरकाळ्या मारायला कोणाची आडकाठी नसतेच. विस्ताराचा अर्थ असाच आहे.

Web Title: Main Editorial