ऊर्जारूपाचा उत्सव

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

श्रीगणेशाचं रूप ही प्रचंड ऊर्जा आहे. कार्यप्रवृत्त होण्याचा उत्स्फूर्त संदेश हे आद्यदैवत सदोदित देत असतं. गणेशाच्या चार हातांचं प्रतीक सांगतं ः प्रारंभापासून तुमच्या शक्तीचा विस्तार करा, यश तुमचं आहे. गणेशाचं विशाल मस्तक अखंड ज्ञानार्जनाचं सूचक आहे

आता अगदी उद्याच श्रीगणरायाचे आगमन होत आहे. त्याच्या स्वागतासाठी निसर्गानं केव्हापासूनच तयारी सुरू केली आहे. पानाफुलांनी बहरून येणारा श्रावणमास श्रीगणेशाच्या आगमनासाठी देखण्या पायघड्या अंथरून सज्ज झाला आहे. नद्यानाल्यांतून धावणारं पाणी गणरायाला घेऊन येण्यासाठी जणू सामोरं निघालं आहे. उंचावरून कोसळणारे धबधबे चमचमत्या तुषारांसवे हसू लागले आहेत. आकाशाच्या गाभाऱ्यात इंद्रधनुष्याच्या कमानी उभ्या राहत आहेत. गणेशाच्या आगमनाचा आनंदगंध वाऱ्याच्या लाटांनी रानोमाळ पोचविला आहे. पक्ष्यांच्या कंठांना जणू मंगलारतीचे पारदर्शी शब्द मिळाले आहेत; आणि भल्या पहाटेपासूनच ते स्वर फुलांसारखे उमलून येऊ लागले आहेत. ढोल-ताशांचा नाद पकडून झाडंझुडपं बेभान होऊन नाचू लागली आहेत. सूर्यकिरणांच्या रेशीमवर्खी पताका सगळीकडं दिमाखात फडकू लागल्या आहेत. वैभवशाली परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं यंदाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष. या लोकोत्सवाचा हा मानाचा तुरा डौलानं लहरू लागला आहे!

"पुढच्या वर्षी लवकर या' अशी प्रेमळ साद गणरायानं ऐकल्यामुळं बच्चेकंपनी विलक्षण खूश आहे. पूजा-मंत्रपाठांच्या मंगलध्वनींनी आणि आरत्यांच्या सश्रद्ध समूहस्वरांनी हा लोकोत्सव दिवसेंदिवस रंगत जाईल. गावोगावच्या देखण्या सजावटींनी आकाशातल्या चांदण्याही जमिनीवर उतरून आल्याचा आभास होत राहील. गणरायाला स्मरून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे प्रारंभ होतील. लोककल्याणाचा मंत्रघोष सर्वत्र निनादत राहील.

श्रीगणपती आणि प्रारंभ यांचं नातं यशाशी जोडलेलं आहे. "श्री' हा शब्द "प्रारंभ' या कल्पनेशी पुरेपूर एकरूप झालेला आहे. "श्रीगणेशा' हा शब्द "प्रारंभा'ला आपण सहज वापरतो. कोणत्याही मंगल कार्यारंभी सर्वप्रथम श्रीगणेशाला आवाहन केलं जातं. आधी गणेशाची प्रतिष्ठापना होते. पूजेचा हा पहिला मान श्रीगणरायाचाच असतो. गणराय सुखसमृद्धी देणारा, दुःखहरण करणारा आणि आरंभलेल्या कार्यात यश देणारा आहे.

श्रीगणेशाचं रूप ही प्रचंड ऊर्जा आहे. कार्यप्रवृत्त होण्याचा उत्स्फूर्त संदेश हे आद्यदैवत सदोदित देत असतं. गणेशाच्या चार हातांचं प्रतीक सांगतं ः प्रारंभापासून तुमच्या शक्तीचा विस्तार करा, यश तुमचं आहे. गणेशाचं विशाल मस्तक अखंड ज्ञानार्जनाचं सूचक आहे. त्याचा संदेश आहे ः कार्याची सुरवात करतानाच त्याच्या सर्व बाजू माहिती करून घ्या, तुमच्या ओंजळीत यशाचाच प्रसाद पडणार! गणेशाचे नेत्र सूक्ष्म निरीक्षण करण्याच्या क्षमता विकसित करण्याचं प्रतीक आहे. छोट्या पैलूंचा शोध घ्या; पाहा, यशाचा मुकुट तुमच्याच शिरावर झळकणार! सुपासारख्या कानांचा अर्थ आहे ः ऐकाल ते तपासून घ्या. तुमचं अंतर्मन तुम्हाला कृतीची दिशा सांगेल; आणि यश तुमच्याच दिशेनं येईल! मोठं पोट सांगतं ः भलं-बुरं सगळं सामावून घ्या. गणरायाचं आसन स्थैर्याची, धीरोदात्त राहण्याची महती पटवून देतं. गणेशाच्या या प्रेरणादायी, मंगल रूपाचं चिंतन करून नवनवीन उद्दिष्टांचा संकल्प आपण सारे कृतीत आणू.