ही वाट दूर जाते...(पहाटपावलं)

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 27 जुलै 2017

रस्ता म्हटलं की त्यांना वळणं असणारच. चढ-उतार, डावी-उजवी दिशा असं आणखी बरंच काही रस्त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असतं. रस्त्यांना खाचखळगे असतात. रस्ते कुठं ना कुठं उखडलेले असतात. त्यांवर चिरांचे ओरखडे असतात

एक पत्ता शोधत होतो. नकाशा हाताशी असल्यामुळे अपेक्षित भागात सहज पोचलो. पुढं काही वळणं होती. ती मात्र नकाशावर दिसत नव्हती. तिथून ये-जा करणाऱ्या एक-दोघांना विचारलं; पण त्यांच्या चेहऱ्यांवर पसरलेलं "नेमकं कुठं बरं?' अशा अर्थाच्या प्रश्‍नांचं जाळं उगाचच अधिक गुंतागुंतीचं होत असल्याचं जाणवलं.

रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करून गप्पांत रंगलेल्या एका गटापुढं पत्त्याचा शोध घेणारा प्रश्‍न केला. "काही माहिती नाही; आम्ही नवीनच आहोत इथं' असं उत्तर मिळालं. चिकाटीनं चौकशीचा पाठपुरावा करताना, एक माहीतगार मिळाले. मला अपेक्षित असलेलं ठिकाण त्यांना ठाऊक होतं. तिथं जायची वाट जणू त्यांच्या जिभेवरच होती. मान आणि हात यांची कधी सुसंगत; तर कधी विसंगत कवायत करीत ते डावी-उजवी वळणं आणि त्यांत अधेमधे असलेले सरळ रस्ते एकामागून एक सांगत होते. त्यांनी सांगितलेल्या दिशांच्या वाटांची आकलनात्मक रेखा माझ्या चेहऱ्यावर उमटली नसल्याचं त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. मग आधीचंच निवेदन शब्द बदलून ते सांगत राहिले. थोडंफार समजल्याच्या खुणा चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना धन्यवाद देऊन वाट धरली. अखेर, अपेक्षित ठिकाण सापडलं एकदाचं.

पत्ता लिहिलेला कागद हातात घेऊन एखादं ठिकाण शोधणं तसं कठीणच असतं. अशा वेळी पायांना कधी चकवा लागतो, ते कळत नाही. एखाद्यापुढं पत्त्याचा कागद धरला, तर हमखास प्रश्‍न येतो ः जवळची खूण काय? "ते ठाऊक असतं, तर तुमचा वेळ घेतला नसता!' असा "बाणेदारपणा' मनातल्या मनात निमूटपणे लपवून पुन्हा दुसऱ्या माहीतगाराचा शोध घ्यावा लागतो. "शहरं' किती वाट्टेल तशी वाढत चालली आहेत', असल्या "समजूतदार' विचारांचं वादळ डोक्‍यात घेऊन पत्ता शोधायच्या मोहिमेवर निघायचं, म्हणजे साधी गोष्ट असते की काय?

काय असेल ते असो, रस्ता म्हटलं की त्यांना वळणं असणारच. चढ-उतार, डावी-उजवी दिशा असं आणखी बरंच काही रस्त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असतं. रस्त्यांना खाचखळगे असतात. रस्ते कुठं ना कुठं उखडलेले असतात. त्यांवर चिरांचे ओरखडे असतात. सरळ वाटणारा रस्ता क्षणात वळण घेतो. कधी मोठं वळण, कधी छोटं वळण. घाटरस्ता असला, तर वळणंच वळणं. उंच कडे किंवा खोल दऱ्या यांना बरोबर घेऊन रस्ता धावत असतो. रस्त्याच्या आजूबाजूला निसर्गरम्य ठिकाणं असतात. ओढे-नाले, धबधबे, झाडंझुडपं, मोठे जलाशय असं बरंच काही रस्त्याला वेढून टाकत जातं. एखाद्या विचाराची वाट मनात जागी झाली, की आपणही काही काही शोधायला निघतो. हा प्रवास नित्य सुरूच असतो.

आयुष्यभराची सारी भ्रमंती त्यासाठीच असते. काही सापडतं. काही हाती येऊनही पुन्हा गायब होतं. कित्येक वाटा अशाच असतात. अवघड. लांबलचक. चकवा देणाऱ्या. हुरहूर लावणाऱ्या. मनातल्या विचारांची वाट आडवळणांची, अवखळ आणि दूर दूर जाणारी असते. तिचं अंतर मोजायचं परिमाण अजून आपल्याला सापडायचं आहे!

Web Title: malhar arankalle writes about life

टॅग्स